राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघ (Tiger) तुम्ही आजपर्यंत प्राणी संग्रहालयात किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पाहिला असेल. मात्र तुम्हाला पर्यंटनाची आवड असेल आणि वाघाचा रुबाब पाहायचा असेल तर तुमच्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba National Park)हा उत्तम पर्याय आहे. आज जागतिक पर्यटन दिन आहे. त्यानिमित्ताने वाघ पाहण्यासाठी आणि जंगल सफारी करण्यासाठी उत्साही असणाऱ्या पर्यटकांसाठी आज आपण ताडोबा अंधेरी या व्याघ्र प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
चंद्रपूर जिल्ह्यात 1955 पासून वाघांचे सवंर्धन करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. ताडोबा हे अभयारण्य 623 चौकिमी क्षेत्रफळावर विस्तारलेलं आहे. ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पात 200 पेक्षा जास्त वाघ वास्तव्यास आहेत. यासह या व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना बिबट्या, चितळ , सांबर, रान गवा,हरिण, अस्वल, लांडगा, कोल्हा, मोर, या सारखे प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी पाहण्याचा आनंद घेता येतो.
1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ पाहण्यासाठी पर्यंटकांना पावसाळा सोडून भेट द्यावी लागते. पावसाळ्यात हे अभयारण् पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. ताडोबाचे कोअर आणि बफर असे दोन झोन करण्यात आले आहेत. दरम्यान,दोन्ही झोन 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी हा प्रकल्प खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अपवादात्मक परिस्थिती वगळता वाघाचे दर्शन होतेच. अभयारण्यात फिरण्यासाठी वन विभागाकडून जिप्सी आणि बस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दिवसातून दोन वेळा सफारीचे आयोजन करण्यात येते.
सफारी विषयी माहिती
ताडोबा जंगलातील पहिली सफारी सकाळी 6 वाजता सुरु होते ती 10 वाजे पर्यंत असते आणि दुसरी सफारीही दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. तसेच वाघ पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या जिप्सीमध्ये जास्तीत जास्त 6 लोकांना आणि 2 मुलांना परवानगी दिली जाते.
तिकीट दर किती?
ताडोबामध्ये वाघ पाहायला येणाऱ्या पर्यटकांना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कमी तिकीट दर आकारला जातो . तर शनिवार रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तिकीट दर जास्त आकारला जातो. कोअर झोनसाठी जर तुम्ही दोन महिने आधी बुकिंग करत असाल तर तुम्हाला एका जिप्सीसाठी एका जिप्सी 4600 रुपये आकारले जातात. त्यामध्ये 1000 रुपये प्रवेश शुल्क, 600 रुपये गाईडचे चार्जेस आणि 3000 रुपये हे जिप्सीचे भाडे आकारले जाते. तसेच शनिवार रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी एका सफारीसाठी 5600 रुपये तिकीट दर आकारला जातो. तसेच तत्काळ बुकींसाठी तुम्हाला हेच दर 7600 ते 11600(शनिवार रविवार, सुट्टीचा दिवस) रुपयांपर्यंत आकारले जाते
बफर झोनसाठी तिकीट
बफर झोनसाठी तिकीट बूक करत असाल तर तुम्हाला एका जिप्सीसाठी 5000 रुपये आकरले जातात. तसेच शनिवार रविवारसाठी तुम्हाला 6000 रुपये तिकीट द्यावे लागते. तसेच जर तुम्हाला संपूर्ण दिवस फोटोग्राफी करायची असेल तर तुम्हाला एका व्यक्ती साठी 37200 रुपये दर आकारला जातो. तसेच तुम्हाला ऑनलाईन तिकीट बूक करण्यासाठी आणि ताडोबा अभयारण्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.