जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची चिन्हे आता दिसू लागली आहेत. मोठमोठ्या दिग्गज कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी जागतिक आर्थिक मंदीची लाट येऊ शकते असे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्थिक क्षेत्रात होत असलेले हे बदल काही विकसनशील देशांच्या पथ्यावर पडणार असल्याचे देखील अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. जगभरातील पुरवठा व्यवस्थेतील बदलांचा फायदा भारत आणि भारतासारख्या इतर देशांना होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) केलेल्या एका सर्वक्षणात हे निरीक्षण नोंदवले गेले आहे. या सर्वेक्षणात जगभरातील विविध देशातील अर्थशास्त्रज्ञ सामील झाले होते. WEF ने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की आर्थिक वाढ आणि चलनवाढीची स्थिती सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलू शकते. जागतिक अर्थव्यवस्थेत होऊ घातलेले बदल आणि त्याचे परिणाम यावर जगभरातील अर्थतज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत.
Economists split on likelihood of global recession, expect cost of living to remain acute: WEF
— Breaking News (@FastNews77) May 2, 2023
Over two-thirds of economists think central banks will struggle to bring inflation to target rates this year#News #DailyNews #LiveNews #WorldNews#World pic.twitter.com/3TtZVpazBY
जगभरात आतापासूनच आर्थिक मंदीचे सावट दिसू लागले आहे. पुढील काही काळ हे चित्र कायम असेल असेही या निरीक्षणात म्हटले गेले आहे. त्यामुळे या वर्षी जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. परंतु काही अर्थतज्ज्ञांनी मात्र याबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले आहे. मागणी आणि पुरवठा यांतील तफावत सध्या वाढत असल्यामुळे जागतिक मंदी सदृश्य वातावरण तयार झाले आहे असे काही जाणकारांचे म्हणणे आहे, परंतु ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
सध्याच्या आर्थिक घडामोडींना मुख्यत्वे बँकांची आर्थिक बेशिस्त कारणीभूत आहे, असे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. बँका अपयशी ठरल्या म्हणजे आर्थिक स्थिती बिघडली असे होत नाही. वेळीच धोरणात्मक निर्णय घेतल्यास यातून बँका आणि अर्थव्यवस्था सुरळीत बाहेर पडू शकतात असे निरीक्षण देखील यात नोंदवले गेले आहे.
उद्योगधंद्यांची वाढ मंद गतीने सुरु असून, येणाऱ्या काळात जगभरात ही वाढ वेग धरले असेही काहींचे म्हणणे आहे. मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असल्यामुळे पगारदार कर्मचारी चिंताग्रस्त आहेत, त्यांच्या जीवनशैलीवर या आर्थिक मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. असे असले तरी भारतासारख्या देशात किरकोळ महागाई निर्देशांक आता कमी होताना दिसतो आहे. मनुष्यबळ अधिक असलेल्या देशांमध्ये आर्थिक मंदीचा फारसा परिणाम जाणवणार नाही असे देखील अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे देश राहतील फायद्यात
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या विशेष सर्वेक्षणात असे म्हटले आहे की पुरवठा साखळीतील बदल प्रामुख्याने सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा, वाहने, औषध, अन्न, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिसून येत आहेत.
पुरवठा साखळीत होणाऱ्या बदलाचा सर्वाधिक फायदा दक्षिण आशिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन आणि अमेरिका यासारख्या देशांना होणार आहे. तसेच भारत, तुर्की, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मेक्सिको, थायलंड आणि पोलंड या देशांना अधिक फायदा होईल असे या अहवालात म्हटले आहे.