Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जागतिक पर्यावरण दिन : पैसे आणि पर्यावरण बचतीचे अनमोल मार्ग

जागतिक पर्यावरण दिन : पैसे आणि पर्यावरण बचतीचे अनमोल मार्ग

World Environment Day 2022 : रविवार दि. 5 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या पर्यावरण दिनानिमित्त आपण असे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेणार आहेत; ज्याने तुमचे पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही कमी होईल.

वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला हानी पोहचत आहे. रस्त्यांवर वाढत जाणारी वाहने, विजेचा अतिवापर यामुळे नैसर्गिक संसाधनांवर ताण येत आहे. तसेच यांच्या अतिवापराने प्रदूषणाच्या पातळीतही वाढ होत आहे. जगातील प्रदूषणावर तर आपण एकटे उपाय नाही करू शकत पण आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही यासाठी जागतिक पर्यावरण दिना (World Environment Day 2022) निमित्त स्वतःपासून सुरुवात करू शकतो. या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रदूषण ही होणार नाही आणि आपली आर्थिक बचत ही होईल, अशा काही उपाययोजना आपण जाणून घेणार आहोत.

वीज बिल कमी येण्यासाठी एलईडीचा वापर 

बल्ब आणि ट्यूबलाईट्स (Bulb, Tubelights) या घरातल्या प्रकाशासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत. बल्ब नेहमी एलईडी (LED) प्रकारचे वापरावेत. तसंच ट्यूबलाईट्सच्या ऐवजी सीएफएल बल्ब (CFL Bulb) वापरावेत किंवा सीएफएल/एलईडी प्रकारच्या ट्यूबलाइट्सही मिळतात. त्यांच्या वापरामुळे प्रकाश तर दर्जेदार मिळतोच. शिवाय मुख्य म्हणजे वीज कमी खर्च होत असल्याने बिल कमी येतं. उदाहरणार्थ नेहमीचे 4 ट्यूबलाईट किंवा बल्ब हे 48 वॉट वीज घेतात आणि याचा प्रति युनिट दर 6 रुपये आहे. त्याऐवजी तुम्ही नेहमीच्या  बल्बऐवजी LED लाईट लावल्या तर ही एलईडी लाईट फक्त 20 वॉट वीज घेते. यामुळे विजेचा वापर कमी होतो आणि पर्यायाने वीज बिल कमी होते.

5 स्टार उपकरणांचा वापर

फ्रीज, एसी किंवा अन्य उपकरणांना त्यांच्या वीज वापरानुसार 1 ते 5 स्टार असं रेटिंग दिलेलं असतं. 5 स्टार रेटिंग (5 Star Rating) असलेल्या उपकरणांसाठी कमी वीज खर्च होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामुळे बिलही कमीच येतं. त्यामुळे अशी उपकरणं खरेदी करताना त्यांचं स्टार रेटिंग पाहूनच खरेदी करावीत. उदाहरणार्थ जर तुम्ही 1.5 टन 3 स्टार रेटिंगचा AC असेल तर त्यासाठी 1615 किलोवॅट (KWH) वीज लागेल आणि याचा वर्षाचा खर्च 18,604 रुपये येईल. याऐवजी 5 स्टार रेटिंगचा एसी AC असेल तर त्यासाठी 1465 किलोवॅट(KWH) वीज खर्च होऊन 16,877 रुपये वार्षिक खर्च येईल. यातून तुम्ही 1727 रुपयांची बचत करू शकता.  

विजेसाठी सौरऊर्जेचा वापर

जर तुमचे स्वतःचे घर असेल तर तुम्ही सौर ऊर्जा पॅनेल लावण्याचा विचार करू शकता. पण हा उपाय थोडा खर्चिक असला तरी कायमचा उपाय असेल. सौर ऊर्जा प्रकल्प बसवायचा झाला, तर सुरुवातीला गुंतवणूक जास्त करावी लागते; मात्र नंतर वीज बिल कमी येतं. जास्त प्रमाणात वीजनिर्मिती झाली, तर अतिरिक्त वीज ग्रिडला विकणंही शक्य होतं. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी (Solar Power Project) सरकारी अनुदान मिळतं, तसंच कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध होतं.

वाहनांसाठी नैसर्गिक वायूचा वापर

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना सीएनजी (CNG - Compressed Natural Gas) वापरता येऊ शकेल. याने थोड्याफार प्रमाणात वायू प्रदूषण होते. पण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. जर तुम्ही दररोज 50 किलोमीटर प्रवास करत असाल तर महिन्याला (23 दिवस) 1150 किलोमीटर प्रवासासाठी तुम्हाला CNG चे 2388.78 रुपये खर्च येईल. पण याऐवजी तुम्ही पेट्रोल वापरले तर 5509.19 रुपये आणि डिझेलसाठी 3834.56 रुपये खर्च येईल.

कार शेअरिंग आणि बचत

कार शेअरिंग (Car Pooling) पर्यावरण आणि खिसा दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. कार शेअरिंग केल्याने प्रदूषण नियंत्रणात येईलच शिवाय पैसे ही वाचतील. उदाहरणार्थ जर तुम्ही टॅक्सीने (कॅबने ) प्रवास करत असाल तर एकट्याचे बिल 200 रुपये होईल, तेच जर शेअरिंगने प्रवास केला तर प्रवासाचे तेवढेच भाडे चौघांमध्ये विभागले जाईल.

ई-वेस्ट रिसायकल करून मिळवा पैसे 

भारतातील 82 टक्के ई-वेस्ट हे वैयक्तिक वापरातून तयार होत असल्याचे ग्लोबल ई-वेस्टने (Global E-Waste) सांगितले आहे. जर एखादी इलेक्ट्रिक वस्तू नवीन घेतल्यावर जुनी वस्तू तशीच पडून राहते. यापेक्षा जुनी वस्तू देऊन डिसकाऊन्टमध्ये नवीन वस्तू घेणे फायद्याचे ठरू शकते. तसेच आपल्या जुन्या वस्तू विकून टाकाव्यात जेणेकरून त्या वस्तुचे चांगले पार्ट वापरता येऊ शकतात.

घरात वीज आणि पैशांची अशी बचत करा

घरात वावरताना अनेक छोट्याछोट्या गोष्टींमधून तुम्ही वीज आणि पैशाची बचत करू शकता. यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही दिवे, पंखे विनाकारण सुरू राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर, डिमर, मोशन सेन्सर आदींचा वापर उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे आवश्यकतेनुसार त्याचा वापर होऊ शकेल. कॉम्प्युटर, टीव्ही आदींच्या स्क्रीनसाठी जास्त वीज खर्च होते. त्यामुळे वापरानंतर स्क्रीन्स बंद करण्याची काळजी घ्यावी. तसेच, फोन आणि कॅमेरा चार्ज केल्यानंतर चार्जर प्लगमधून काढून ठेवावा. तो प्लगमध्येच असेल, तर वीज जास्त खर्च होते.

उपकरणं वापरताना घ्यावयाची काळजी 

1. मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी (Microwave Oven) उपकरणं फ्रीजवर ठेवू नयेत. कारण त्यामुळे वीज जास्त प्रमाणात खर्च होते. फ्रीजवर थेट सूर्यप्रकाश पडेल अशा  ठिकाणी ठेवू नये. फ्रीजच्या आजूबाजूची हवा खेळती असली पाहिजे. तसंच, गरम असलेले खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. ते सामान्य तापमानाला आल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावेत. कारण गरम पदार्थ थंड करण्यात फ्रीजची बरीच ऊर्जा खर्च होते. परिणामी बिल जास्त येतं.

2. उन्हाळ्यात एसीऐवजी सीलिंग फॅन (Sealing Fan) किंवा टेबल फॅन वापरायला प्राधान्य द्यावं. पंख्यासाठी प्रति तास 30 पैसे एवढा खर्च येतो, तर एसीसाठी प्रति तास 10 रुपये खर्च होतो. एसी वापरायचा असेल, तर त्याचं तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं ठेवावं. तसंच, एसी असलेल्या खोलीचं दार बंद राहील, याची काळजी घ्यावी. म्हणजे वीजबिल कमी येईल. तसेच दार बंद ठेवल्याने गारवाअधिक काळ राहील आणि तुम्ही एसी AC लवकर बंद करू शकता. 

रोजच्या जगण्यात अशाप्रकारे थोडा जरी बदल केला आणि स्वतः वरीलप्रमाणे काही बचतीच्या सवयी लावून घेतल्याने तुमचे पैसे तर वाचणारच आहेत. याशिवाय पर्यावरणाला हानी सुद्धा होणार नाही. पैसे आणि पर्यावरण या दोन्हीची काळजी घेणे काळाची गरज आहे. कारण या दोन्ही गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर त्यामुळे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.