नवे आर्थिक वर्ष सुरू झाले असून जागतिक बँकेने भारताचा विकास दर किती असेल याबाबत अंदाज वर्तवला आहे. सुरुवातीला भारताचा विकासदर 6.6% राहील असे वर्ल्ड बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर पुन्हा सुधारित अंदाज वर्तवला. यानुसार भारताचा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विकासदर 6.3 टक्के राहील, असे म्हटले आहे. जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती अनुकूल नसल्याने विकासदराचा अंदाज पहिल्यापेक्षा कमी वर्तवला आहे.
जागतिक मंदीचा भारतावर परिणाम
आशिया खंडात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांवर आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-चीन वाद, जागतिक पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांमुळे जागतिक मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, सेवा, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपन्यांनी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नोकरकपातीचा धडाका लावला आहे. येत्या काही दिवसांत जगभरात 5 लाख कर्मचारी नोकऱ्या गमावू शकतात, असे भाकीतही वर्तवले जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज सावधपणे वर्तवला आहे.
भारतातील स्थिती काय?
महागाईमुळे मागील सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरवाढ केली आहे. त्यामुळे गृह, वाहन, वैयक्तिक आणि इतरही प्रकारचे कर्ज महाग झाली आहेत. मागील वर्षी मे पासून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी बँकेने 250 बेसिस पॉइंटने व्याजदर वाढवला आहे. "महाग कर्ज आणि नागरिकांच्या घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
चालू खात्यातील तूट कमी होईल
मागील आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.9% राहील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला होता. त्या तुलनेत यावर्षीचा अंदाज कमी आहे. GDP त्या तुलनेत चालू खात्यातील तूट यावर्षी 2.1 टक्क्यांनी कमी होईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारतामधून सेवांची आणि वस्तूंची निर्यात वाढत असल्याने चालू खात्यातील तूट कमी होईल, असे बँकेने म्हटले आहे. जागतिक स्थिती आव्हानात्मक असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर बाह्य गोष्टींचा जास्त परिणाम झाला नाही, असे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.
अमेरिका युरोपातील बँकिंग क्षेत्र
मागील काही दिवसांमध्ये अमेरिका आणि युरोपातील बँकिंग क्षेत्र धोक्यात आले आहे. स्वित्झलँडमधील क्रेडिट स्वीस, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेसह अनेक बँका अडचणीत आल्या. याचा परिणाम भारतीय बँकिंग आणि गुंतवणुकीवर होऊ शकतो. अल्पकाळासाठी ज्या परदेशी गुंतवणुकदारांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आहे, ते बाजारातून पैसे काढून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी भारतीय बँकिंग क्षेत्र सुस्थितीत असल्याचे जाणकारांचे मत आहे.