एकीकडे यूरोपमधील देश 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा विचार करत असताना, भारतात आठवड्याला 70 तास काम करण्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याचे 70 तास काम करायला हवे, असे मत व्यक्त केले होते. त्यापाठोपाठ कर्नाटक सरकारने देखील दिवसाला 14 तास काम करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता.
कर्नाटक सरकारने कामाचे तास वाढविण्यासंदर्भात आणलेल्या या प्रस्तावावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. कामाचे तास वाढवावे की नाही, याविषयी दोन्ही बाजूंनी मते मांडली जात आहेत. मात्र, खरचं दिवसाचे कामाचे तास वाढवले तर त्याचा फायदा होईल की तोटा? याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
अनेक देशात 4 दिवसांचा कामाचा आठवडा
सर्वसाधारणपणे अनेक देशांमध्ये आठवड्याचे 40 तास काम करण्याचा नियम असतो. बहुतांश कंपन्यांमध्ये दिवसाला कमीत कमी 8 तास व आठवड्याला 5 दिवस काम करावे लागते. जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड, स्विडन सारख्या देशांमध्ये कामाचा आठवडा 4 दिवसांचा करण्यावर विचार सुरू आहे. अनेक कंपन्यांनी हा नियम लागू देखील केला आहे.
मात्र, भारतातील कायदे हे कर्मचाऱ्यांऐवजी कंपन्यांच्याबाजूला अधिक झुकलेले असल्याचे पाहायला मिळते. भारतातील असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागते. तर ज्या आयटी कंपन्यांचा कामाचा आठवडा 5 दिवसांचा असतो, तेथे कर्मचाऱ्यांना दररोज अतिरिक्त तास काम करावे लागते. आरोग्य व सुरक्षा क्षेत्रात काम करणारे कर्मचारी देखील दररोज 10 ते 12 तास काम करताना पाहायला मिळतात.
दररोज 14 तास काम करण्याचे फायदे काय?
उत्पन्नात वाढ | दररोज 14 तास काम करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. यामुळे त्यांना अतिरिक्त वेळ काम करण्याचे जास्त पैसे मिळू शकतात. जास्त वेळ काम केल्यास जास्त वेतनही मिळू शकते. |
करिअरसाठी फायदेशीर | अनेकांकडून जास्त तास काम न करण्यामागे कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर वेळ घालवायला न जमणे, इतर छंद न जोपासता येणे अशी कारणे दिली जातात. ‘वर्क लाईफ बॅलेन्स’ हे प्रमुख कारण असते. मात्र, ‘काम हेच आयुष्य’ असल्याचा सल्ला त्यांच्या क्षेत्रात प्रगती केलेले अनेकजण देतात. यामुळे नवीन कौशल्य शिकण्यास मदत मिळते. तसेच, करिअरमध्येही पुढे जाण्यासाठी फायदा मिळतो. |
नोकरीची सुरक्षितता | सध्याच्या काळात नोकरीची सुरक्षितता कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कर्मचारी कामप्रती अधिक सर्मपित असतात, त्यांची नोकरीची सुरक्षितता अधिक असते. |
कंपन्यांसाठी फायदेशीर | कामाचे तास वाढविण्यामागे कर्मचाऱ्यांऐवजी सर्वाधिक फायदा हा कंपन्यांचा असतो. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. वेळेवर काम पूर्ण केल्यास आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते. याशिवाय, अतिरिक्त कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च देखील वाचतो. |
दररोज 14 तास काम करण्याचे फायदे तोटे काय आहेत?
आरोग्यावर परिणाम | जास्त वेळ काम करण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम पाहायला मिळू शकतो. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे कंपन्यांना पुन्हा नवीन कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण यावर पैसे खर्च करावा लागतो. |
वर्क लाइफ बॅलेन्स | कर्मचारी वर्गाच्या तोंडी ‘वर्क लाइफ बॅलेन्स’ हे वाक्य सर्रास पाहायला मिळतो. काम करताना वैयक्तिक आयुष्य व व्यावसायिक जीवनात संतुलन साधणे अवघड असते. त्यामुळे दररोज 14 तास काम करावे लागल्यास याचा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम दिसून येतो. |
रोजगाराच्या कमी संधी | एकच व्यक्ती 14 तास काम करत असल्यामुळे इतरांसाठीच्या रोजगाराच्या संधी कमी निर्माण होतात. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढू शकते. |
उत्पादकतेत घट | 14 तासाच्या कामामुळे सुरुवातीला वाढलेली उत्पादकता मात्र हळूहळू कमी होताना दिसून येते. कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे तेवढ्याच योग्यतेने काम होईल असे नाही. याउलट कमी वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामाचा प्रकार, क्षेत्र यानुसार योग्य कामाची वेळ ठरवणे आवश्यक आहे. |