Financial Inclusion: भारतामध्ये आर्थिक समावेशकता ही अद्यापही कागदावरच असल्याचे ओडिशा राज्यातील एका घटनेतून समोर आले आहे. अशिक्षित, मागास जनतेला आर्थिक सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्याचा दावा सरकार करत असताना एका महिलेला पेन्शन काढण्यासाठी अनवाणी पायांनी भर उन्हात चालत जाण्याची वेळ आली. सत्तरीपार या वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने प्लास्टिकच्या तुटलेल्या खुर्चीचा सहारा घेत ही महिला उन्हातून वाट तुडवत आहे. यासंबंधित व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दखल घेतली.
कॉमन सर्व्हिस सेंटर्स आणि बँक मित्र या सुविधेद्वारे खेडोपाड्यात बँकिंग सुविधा पोहचल्या आहेत. मात्र, ओडिशामधील या घटनेने विकासाचे वास्तव समोर आणले. 17 एप्रिल रोजी ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यात ही घटना घडली. बँकेतून पेन्शन काढण्याकरिता पायी चालत जाणाऱ्या महिलेचे नाव सुर्या हरिजन (Surya Harijan) असे आहे. या महिलेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. दरम्यान, बँकेत पोहचूनही महिलेला पेन्शन मिळाली नाही. निर्मला सितारामन यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाला जाब विचारला.
सुर्या हरिजन या महिलेचा मोठा मुलगा परराज्यात स्थलांतरित मजूर आहे. तर लहान मुलगा इतरांकडे गुरेचराईचे काम करतो. कुटुंबाकडे दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. ते एका झोपडीमध्ये राहतात. या महिलेकडे जमीन अथवा इतर कोणतीही मालमत्ता नाही.
निर्मला सितारामन यांचे ट्विट
ANI वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यावर निर्मला सितारामन यांनी प्रतिक्रिया दिली. "व्हिडिओमध्ये बँक मॅनेजर उत्तर देताना दिसत आहे. मात्र, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस (DFS) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि मानवतेच्या भावनेतून यावर तोडगा काढवा. बँक मित्र द्वारे सुविधा का पुरवण्यात येत नाही" असा सवाल त्यांनी विचारला.
निर्मला सितारामन यांच्या ट्विटला स्टेट बँक ऑफ इंडियाने उत्तर दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, हा व्हिडओ पाहून आम्हाला दु:ख झाले. सुर्या हरिजन नामक महिला वृद्धापकाळात मिळणारी पेन्शन काढण्यासाठी गावातील कॉमन सर्व्हिस पॉइंट येथे जात असते. मात्र, वृद्धापकाळाने त्यांच्या बाटांचे ठसे CPC सेंटरमध्ये मॅच होत नाहीत. (Doorstep Banking) त्यामुळे महिला Jharigaon येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेली. तेथे त्यांना बँक मॅनेजरने तत्काळ पेन्शन अदा केली. यापुढे महिलेची पेन्शन थेट घरी नेऊन दिली जाईल, असा निर्णय बँक मॅनेजरने घेतल्याचे ट्विट स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहे. वृद्ध महिलेला व्हिलचेअर पुरवू, असेही बँकेने म्हटले आहे.
बँक मॅनेजरचे उत्तर काय?
सुर्या हरिजन या महिलेला बँकेत आल्यानंतर पेन्शन देण्यात आली. महिलेची बोटं नीट नसल्याने ठसे जुळत नाहीत. त्यामुळे महिलेला 3 हजार रुपयांची पेन्शन मॅन्युअली देण्यात आली आहे. या अडचणीवर आम्ही लवकरच तोडगा काढू असे बँक मॅनेजरने म्हटले.
घरपोच पेन्शन देता येते का? (Can bank gives doorstep pension facility)
आर्थिक समावेशकता आणण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत घरपोच पेन्शन देण्याचीही तरतूद आहे. डोअरस्टेप बँकिंग सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वित्तीय संस्थांना 31 डिसेंबर 2017 आणि 30 एप्रिल 2020 अशा दोन अंतिम तारखा दिल्या होत्या. मात्र, अद्यापही ही सेवा पूर्णपणे भारतभर सुरू झाली नाही. नवीन खाते उघडणे, पैसे काढणे, जमा करणे, विमा, कर्ज, गुंतवणूक, सरकारी योजनांचा लाभ यासह इतरही अनेक सुविधा बँक मित्र या सुविधेद्वारे घरपोच मिळू शकते. काही ठराविक भागांमध्येच ही सुविधा सुरू आहे.
अनेक राज्यांतील गावोगावी कॉमन सर्व्हिस सेंटर्स पोहचली आहेत. मात्र, घरापर्यंत बँकिंग सेवा अद्यापही पूर्णपणे पोहचली नाही. इंडियन पोस्टद्वारेही घरपोच पेन्शन देण्यात येते. सर्वच बँकांना घरपोच सुविधा देणे अनिवार्य नाही. मात्र, भविष्यात त्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात. काही शाखांना डोअरस्टेप सुविधा देणे अनिवार्य आहे तर इतर बँक शाखांना ‘best effort basis’ वर सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.