रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. 19 मे) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ग्राहकांना मंगळवारपासून बँकांमधून एक्सचेंज करून घेता येणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना बँकेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी पॅनकार्ड किंवा आधारकार्ड असा कोणताही पुरावा द्यावा लागणार नसल्याचे सांगितले आहे.
आरबीआयने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेताना ग्राहकांना त्या 23 मे पासून बँकेतून बदलून मिळतील, असेही सांगितले होते. पण याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम होता की, नोटा बदलून देताना ग्राहकांना आधारकार्ड किंवा पॅनकार्ड पुरावा म्हणून द्यावा लागेल. पण एसबीआय बँकेने 2000 रुपयांची नोट बदलून घेताना कोणताही पुरवा घ्यावा लागणार नाही, असे म्हटले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना 2000 रुपयांची नोट बदलून घेताना कोणताही पुरवा सादर करावा लागणार नाही. एसबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (ऑपरेसन्स) एस. मुरलीधरन यांनी याबाबत एसबीआय बँकेच्या सर्व शाखांना तसे पत्र देखील पाठवले आहे.
एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, आरबीआयने 19 मे पासून 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. पण ही नोट 30 सप्टेंबरपर्यंत व्यवहारात वापरता येणार आहे. आरबीआयने सर्वसामान्यांना 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत त्यांच्याकडील नोटा बँकेतून एक्सचेंज करून घेण्यास किंवा बँकेत जमा करण्यासाठी मुदत दिली आहे.
आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करताना त्याची कारणे देखील दिली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत चलनातून 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. 2018-19 पासून 2000 रुपयांच्या नोटेची छपाईदेखील बंद करण्यात आली होती. 2016 मध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणून सरकारने 2000 रुपयांची नोट आणली होती. या नोटेचे आयुष्य 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आरबीआयने 5-6 वर्षांच्या कालावधीनंतर आता 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.