आरोग्य विमा तुमच्या वैयक्तिक आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी बाब आहे. त्यामुळे तर तुम्ही न चुकता प्रिमियम भरत असाल. मात्र, जेव्हा विम्याची गरज पडते तेव्हा जर तुमचा दावा विमा कंपनीने नाकारला तर तुमची अवस्था कशी होईल, याचा विचार करा. विमा पॉलिसी (Health Insurance Claim) खरेदी करत असताना नियम आणि अटी बारकाईने पाहून घेण्याची जबाबदारी तुमची असते. मात्र, अनेक जण खोलात जाऊन हे नियम आणि अटी वाचत नाहीत. पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कशाचा नाही, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला असायला हवी. अन्यथा मग दावा नाकारला गेल्यावर पश्चाताप होईल. या लेखामध्ये आपण पाहूया, विम्याचा दावा नाकारला जाण्याची कोणती कारणे आहेत.
खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे -
आरोग्य विमा काढताना कंपनी तुमच्याकडून वैयक्तिक माहिती घेते. जसे की, तुमचे वय, व्यवसाय, पूर्वीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या, उत्पन्न यासारखी माहिती कंपनी घेत असते. मात्र, प्रिमियम वाचवण्यासाठी तुम्ही जर खोटी माहिती दिली तर तुमचा विम्याचा दावा पुढे जाऊन नाकारला जाण्याची शक्यता जास्त आहे. वाढत्या वयानुसार प्रिमियमही जास्त भरावा लागतो. मात्र, काही जण कमी वय दाखवतात. त्यासाठी खोट कागदपत्रेही देतात. मात्र, असे केल्याने तुम्ही स्वत:ची आणि कुटुंबाची सुरक्षा धोक्यात घालत असता. तुमचा दावा रद्द करण्याचे आयते कारण कंपनीला देऊ नका. अचूक माहिती द्या आणि सुरक्षित राहा.
विम्याची रक्कम संपुष्टात आली असेल तर -
जेव्हा तुम्ही आरोग्य विमा खरेदी करता तेव्हा ठराविक रक्कम म्हणजेच सम इन्शुअर्ड ठरलेली असते. समजा, तुमची सम इन्शुअर्ड ३ लाख आहे. तीन लाख रुपये रकमेचा लाभ तुम्ही आधीच घेतला असेल तर तुम्हाला त्या वर्षात पुन्हा लाभ घेता येणार नाही. वैयक्तिक किंवा संपूर्ण कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर अशी कोणतीही पॉलिसी तुम्ही घेतली असेल तर सम इन्श्युअर्ड रकमेची मर्यादा असते. त्यामुळे कुटुंबात किती सदस्य आहे, त्याची आरोग्य स्थिती यानुसार पुरेशा रकमेची विमा योजना खरेदी करावी. अन्यथा अपुऱ्या रकमेमुळे तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागतील.
विम्यात समाविष्ट नसलेल्या गोष्टी -
आरोग्य विमा खरेदी करताना विमा कव्हरमधून अनुवांशिक आजार, पुर्वीपासून असलेले आजार समाविष्ट केलेले नसतात. त्याची एक यादीच नियम आणि अटींमध्ये असते. तर यामध्ये कशाचा समावेश आहे आणि कशाचा नाही याची संपूर्ण माहिती घ्या. समजा, विमा पॉलिसीमध्ये पूर्वीपासून धमन्यांचे आजार जसे की हृदयरोग समाविष्ट नसेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याला हृदयरोगाचा त्रास झाला. अशा वेळी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा विम्याचा दावा कंपनी नाकारू शकते. कारण ते कंपनीच्या नियमामध्ये नाही. मात्र, तुम्हाला याची माहिती हवी. सोबतच काही आजारांसाठी प्रतिक्षा कालावधी असतो. या प्रतिक्षा कालावधीमध्ये तुम्हाला त्या आजारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर विमा कंपनी दावा मंजूर करणार नाही. त्यामुळे विमा पॉलिसी घेतानाच हे सर्व पाहून घ्यावे. ज्या विमा कंपनीचा प्रतिक्षा कालावधी कमी आहे, त्या कंपनीची पॉलिसी घेण्यास तुम्ही पसंती दिली पाहिजे.
कालमर्यादा -
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही ठराविक अवधीच्या आत विमा कंपनीकडे दावा करावा लागतो. अनेक कंपन्यांनी २४ तासांची मर्यादा ठेवली आहे. मात्र, यामध्ये प्रत्येक कंपनीच्या नियमानुसार बदल असू शकतो. जर तुम्ही या ठराविक काळात कंपनीला दाव्याचा अर्ज केला नाही तर विमा कंपनी तुमचा दावा मंजूर करणार नाही. रुग्णालयामध्ये विमा विभाग असतो. त्याद्वारे तुम्ही विमा कंपनीला कळवू शकता. अन्यथा विमा कंपनीच्या कॉल सेंटरवर कॉल करुनही तुम्ही दावा करू शकता.