"मला विम्याची काही एक गरज नाहीये… मी काही एवढ्यात मरणार नाहीये रे.. मस्त ठणठणीत प्रकृती आहे माझी!,"अरे हवाय कोणाला तो पैसा !!! आपण स्वतःच नाही राहिलो, तर पैसे मिळाला काय आणि जळाला काय, कोणी पाहिलंय..",मला बाबा, त्या पॉलिसीतलं काही कळत नाही.. मरणाची भीती दाखवून पैसे उकळायचे धंदे आहेत या कंपन्यांचे.., हे बघ.. मला माझ्या कंपनीनं 2-4 नाही तर चक्क 10 लाखांचं लाईफ-कव्हर दिलंय, शिवाय 5 लाखांचं हेल्थ इन्शुरन्स …So मला तरी विम्याची गरज नाहीये.
"या महिन्यात नाही जमणार, मॅडम… एकतर माझ्याकडे वेळही नाहीये आणि अमाऊंट देखील जरा कमी आहे. पण पुढच्या महिन्यात नक्की करून टाकू पॉलिसीच काम.. मी कुठे पळून जाणार आहे का…. !!!"
आपल्याला बहुसंख्य लोकांना “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” खरेदी करायला कधीच वेळ नसतो, मात्र “पॉलिसी न घेण्याची १०० कारणे” मात्र त्यांच्याकडे कायम तयार असतात. वास्तविक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणं, हे सुशिक्षित आणि संवेदनशील प्रौढ जीवनामधलं महत्वाचं कर्तव्य आहे. “CoviD-19”ने जगभरामध्ये घातलेले मृत्यूचे तांडव भारतीयांनी देखील अगदी जवळून पाहिलय. वेदनाही जाणवल्या. जवळच्यांचे मृत्यू पाहिले. ऑक्सिजन सिलेंडरपासून ते ॲम्ब्यूलन्ससाठीच्या लागलेल्या रांगा बघितल्या. अगदी स्मशानामधले ट्रॅफिक देखील अनुभवले. हेल्थ इन्शुरन्स आणि विशेषतः टर्म इन्शुरन्सचे महत्व जाणवायला सुरुवात झाली. तरी देखील आजही भारतामधील एकूण इन्शुरन्स-पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी केवळ २०% लोकसंख्या इन्शुअर्ड अर्थात पॉलिसीधारक आहे. आणि हे एक अतिशय निराशाजनक सत्य आहे.
चला बघुयात, काय कारणं असतील या आर्थिक उदासीनतेची!
1) आपल्याकडील बहुसंख्य लोकांना धोका समजतच नाही. पॉलिसीधारक व्यक्तीच्या पश्चात केवळ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी त्याच्या कुटुंबाला “सन्मानजनक आर्थिक स्थिरता” प्रदान करते. मात्र “मृत्यू ही एक अटळ घटना आहे” हे माहित असून देखील लोकं त्याबद्दल बोलणे टाळतात. आपण अमरपट्टाच घेऊन जन्माला आलो आहोत, अशा विचाराने, “लाईफ इन्शुरन्स” हा पैशाचा अपव्यय असल्याचे गृहीत धरतात.
2)बरेच लोकांना, विशेषतः तरुण व्यक्तींना स्वतःच्या सुदृढ आरोग्याबाबत, निरोगी असण्याबाबत विश्वास असतो. त्यांच्या मते, त्यांना लाईफ कव्हरची गरज नाहीये. मात्र अपघात काय किंवा मृत्यू काय, सांगून येत नाही. पण एकतर या शक्यतेचा विचार ते करीत नाहीत. किंवा विचार जरी केला तरी, लाईफ इन्शुरन्सचे संरक्षण घेण्यास चाल-ढकल करीत राहतात. परिणामी जेव्हा लाईफ-कव्हर घेण्याची वेळ येते, तेव्हा एकतर इन्शुरन्स मिळेलच, याची खात्री नसते. किंवा लाईफ-कव्हरसाठीची प्रीमियमची रक्कम खूप जास्त असते.
3)“पॉलिसी खरेदीसाठी पैसे नाहीत किंवा वेळ नाही”, हे सर्वात सोपे कारण. ज्या वयामध्ये सुयोग्य इन्शुरन्स पॉलिसी घेणे, किफायतशीर असते, तेव्हा “आज घेऊ, उद्या घेऊ, पैसे नाहीत” अशी असंख्य कारणे आपण शोधत राहतो. जसजसे वय वाढते, तशी आयुष्याची जोखीम अर्थात risk देखील वाढते. तेव्हा इन्शुरन्स कंपन्या “लाईफ कव्हर” देण्यासाठी जास्त प्रीमियम आकारतात. बाकी आता २०२३ मध्ये, पॉलिसी खरेदीसाठी “वेळ नाही” ही सबब निव्वळ मनोरंजकच !!! Thanks to WWW अर्थात इंटरनेट!!! डिजिटलायझेशनच्या युगात “एका क्लिकवर” सर्वच्या सर्व इन्शुरन्स कंपन्यांची प्रॉडक्ट्स, त्यांचे फीचर्स, प्रिमिअमचे दर, त्यांची तुलना आणि अगदी खरेदीही शक्य झाली आहे. वेळ, श्रम आणि वित्त या सगळ्यांचीच बचत. कोणाला भेटणे नाही, आणि लांबच लांब चर्चाही नाहीत.
4)आजकाल बहुसंख्य एम्प्लॉईजना त्यांच्या एम्प्लॉयरकडून लाईफ-कव्हर, हेल्थ कव्हर दिलेलं असते. मात्र ग्रुप पॉलिसीद्वारे ऑफर केलेले कव्हर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केव्हाही पुरेसे नसते. याखेरीज विशेषतः प्रायव्हेट सेक्टरमधील एम्पलॉईज कंपनी सोडल्यावर, बदलल्यावर लाईफ कव्हर गमावतात. कारण एम्प्लॉयरकडून दिले गेलेले लाईफ-कव्हर पोर्टेबल नसते. जेव्हा स्वतःसाठी इन्शुरन्स पॉलिसी हवी होती, हे जाणवतं, तोवर प्रीमियम महाग झालेले असतात. आणि Post CoviD-effect किंवा जागतिक मंदी (recession) सारख्या अकल्पित घटनांनी भारलेल्या या कालखंडामध्ये नोकरीची तरी शाश्वती कुठे आहे?
5)“न कर्त्याचा वार शनिवार” म्हणतात. इन्शुरन्स पॉलिसी खरेदीची टाळाटाळ करणाऱ्या बहुतेक व्यक्ती “मला त्यातलं काही कळत नाही” ही सोपी वहिवाट पकडतात. चला एक वेळ समजून चालू, की मार्केट-लिंक्ड प्रॉडक्ट्स समजण्यामध्ये गफलत होतही असेल. मात्र, एका साध्या टर्म प्लॅनची निवड करून ते आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देऊ शकतात.
6)पॉलिसी न घेण्याचं कारण शोधत बसण्यापेक्षा “इन्शुरन्स” सारखं “फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट” घेऊन प्रत्येक व्यक्ती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करून सुनिश्चित भविष्य नक्कीच देऊ शकतो. विचार करून तर पहा!