Mutual Fund Investment Myths: कोणत्याही गोष्टीची नव्याने सुरूवात करताना भीती वाटते. काय होईल, कसे होईल, जमेल का? असे अनेक प्रश्न मनात येतात. प्रत्येकाला असा अनुभव एकदा तरी आलाच असेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही काही जण असेच घाबरतात. तसेच गुंतवणुकीबद्दल काही चुकीच्या संकल्पना डोक्यात घर करून बसल्यानेही भीती वाटते.
मात्र, नीट माहिती घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. जोखीम येथेही आहे. मात्र, कमीत कमी जोखीम घेऊन अगदी 100 रुपयांपासून SIP सुरू करू शकतात. मात्र, हे सर्व करण्याआधी मनातील भीती जायला हवी. नवख्या गुंतवणूकदारांना नक्की कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते पाहूया.
म्युच्युअल फंडमध्ये खूप जोखीम असते
म्युच्युअल फंडमध्ये खूप जोखीम असते असा काहींचा समज असतो. SIP सुरू करायची असेल तर पैशांची मोठी रिस्क घ्यावी लागेल, असे वाटते. मात्र, तसे नाही. नक्कीच गुंतवणूक करताना जोखीम असते. (Mutual Fund Investment myths) तुम्ही कमीत कमी जोखीम घेऊन गुंतवणूक सुरू करू शकता. अल्प कालावधीत जास्त धोके दिसू शकतात. मात्र, दीर्घकालावधीत जोखीम कमी होऊन चांगला परतावा मिळू शकतो.
म्युच्युअल फंड म्हणजे स्टॉकमधील गुंतवणूक असते
म्युच्युअल फंड म्हणजे फक्त कंपन्यांच्या स्टॉकमध्ये (इक्विटी) गुंतवणूक असते, असे अनेकांना वाटते. मात्र, हे खरे नाही. म्युच्युअल फंडच्या अनेक योजना आहेत. सगळ्या योजना कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करत नाहीत. तुमचे गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार तुम्ही योजना निवडू शकता. डेट फंड योजनामध्ये इक्विटी योजनांपेक्षा कमी जोखीम असते.
जर तुम्हाला शेअर मार्केटमधील जोखमीपासून लांब राहायचे असेल तर तुम्ही डेट फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. ज्या फंड योजना गुंतवणुकदारांचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावतात त्या योजनांना इक्विटी फंड योजना असे म्हणतात. (Mutual Fund Investment myths) तसेच इक्विटी मधील सर्वच योजनांमध्ये जास्त जोखीम नसते. लार्ज कॅप फंड योजनांमधील जोखीम कमी असते. मात्र, स्मॉल कॅप फंड योजनांमध्ये ही जोखीम जास्त असते. जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर या योजना तुम्ही टाळू शकता.
म्युच्युअल फंड क्लिष्ट असतात
नागरिकांमध्ये आणखी एक असा समज आहे की, म्युच्युअल फंड योजना, त्यातील गुंतवणूक सर्वकाही किचकट आहे. मात्र, कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच करताना किचकट वाटू शकते. मात्र, नंतर त्याची भीती जाते. नीट माहिती घेऊन आणि अभ्यास करून शिकता येईल. तरीही डोक्यावरून जात असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. मात्र, गुंतवणुकीस केलेली टाळाटाळ महागात पडू शकते.
म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करण्यासाठी जास्त पैसे हवे
म्युच्युअल फंड योजनांत SIP सुरू करण्यासाठी जास्त पैसे हवेत, असा समज काही जणांचा आहे. मात्र, तुम्ही कमी म्हणजे 100 रुपयांपासूनही एसआयपी सुरू करू शकता. शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यासाठी SIP खूप गरजेची आहे. कोणतीही एसआयपी सुरू करण्याआधी आर्थिक ध्येय काय? जसे की, मुलांचे शिक्षण, नवी गाडी, घर, परदेशवारी साठी पैसे हवेत हे निश्चित करावे. मग त्या गुंतवणुकीला अर्थ मिळेल. अन्यथा मध्येच गरज लागली की पैसे काढून घेणार नाहीत.
म्युच्युअल फंड म्हणजे लॉटरी जॅकपॉट
एखाद्या योजनेतून कमी कालावधीही चांगले रिटर्न मिळू शकतात. मात्र, पैशांची थोडी वाढ झाली की लगेच पैसे काढून घेऊ नये. तुमचे गुंतवणुकीचे ध्येय पूर्ण होईपर्यंत योजनेत पैसे टाकत राहा. SIP गुंतवणूक ही 100 मीटरची रेस नाही तर लांब पल्ल्याची मॅरेथॉन आहे. तात्पुरत्या लाभाला बळी पडू नका.
निश्चित परताव्याची गॅरंटी देता येत नाही. मात्र, दीर्घकाळात म्युच्युअल फंड चांगले रिटर्न देण्याची शक्यता असते. इतिहासातील विविध योजनांचा अभ्यास केला असता सरासरी 12% परतावा म्युच्युअल फंड मधून मिळाल्याचे समोर आले आहे. यापेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो. तरच संपत्ती निर्माण होईल. गरजा तर पूर्ण होतीलच पण उतारवयातील चिंताही मिटेल.