भारत सरकार सर्व स्टार्टअप्सना सुविधा देऊ इच्छितं मात्र त्यांचं नियमन करू इच्छित नाही, असं मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते. दुसरीकडे, भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत म्हणाले, की जर एखाद्या स्टार्टअपचं बिझनेस मॉडेल (Business model) चांगलं आणि मजबूत असेल, तर निधीची कमतरता भासणार नाही. सरकार स्टार्टअप्ससाठी इतकं काही करण्याचं काय कारण असेल, हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र याचं एक कारण असू शकतं, ते म्हणजे अनेक स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये (Singapore) नोंदणीकृत आहेत. असं का, तर त्याचीही काही कारणं आहेत.
Table of contents [Show]
तब्बल 8000पेक्षा जास्त स्टार्टअप सिंगापूरमध्ये नोंदणीकृत
ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास असं दिसतं, की सुमारे 8000 स्टार्टअप सिंगापूरमध्ये रजिस्टर होते. त्यांची संख्या वाढतच जात होती. त्यामुळे आज तो आकडा वाढला असावा. मात्र प्रश्न असा आहे, की स्टार्टअप्स सिंगापूरला का येतात? त्यांना सिंगापूरमध्ये असं काय मिळतं, की ते तिथं आपला व्यवसाय नोंदवतात आणि तो भारतात करतात.
व्यवसाय करणं सोपं
'इज ऑफ डुइंग बिझनेस' हे महत्त्वाचं कारण आहे. सिंगापूरमधले स्टार्टअपसाठी व्यवसायाशी संबंधित सर्व कामं करणं सोपं आहे. व्यवसाय सुरू करणंच नाही तर तो बंद करणंही सोपं आहे. आपल्याकडे मात्र हे अवघड काम आहे. सिंगापूरमध्ये बाहेरून पैसे येण्याची प्रक्रियाही जलद होते. भारतात या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. विलीनीकरण आणि अधिग्रहणासाठीही चांगलं वातावरण तिथं आहे. 2020मध्ये इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर होता, तर 190 देशांच्या यादीत भारत 63व्या क्रमांकावर होता.
संरक्षण कायद्याची मदत
सिंगापूरमध्ये त्यांच्या कंपनीची नोंदणी करणाऱ्या स्टार्टअपना सिंगापूरकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन दिलं जातं. याचा फायदा स्टार्टअपला होतो. हे देखील एक कारण आहे, की जगातल्या अनेक कंपन्यांनी त्यांची मुख्यालयं सिंगापूरमध्ये स्थापन केली आणि नंतर जगभरात व्यवसाय केला.
दुहेरी कर आकारणीचा त्रास नाही
प्रचंड कर भरावा लागणं ही भारताच्या दृष्टीनं अत्यंत नकारात्मक बाब आहे. अनेक उद्योजक यामुळे भारताला पसंती देत नाहीत. तर भारतातले उद्योजकही जाहीरपणे याबाबत नाराजी दर्शवतात. विचार करा, एखाद्याला एकाच उत्पन्नावर दोनदा कर भरावा लागला, तर कसं वाटेल? सर्व कंपन्या त्यांच्या निव्वळ नफ्यातून लाभांश देतात. कर भरल्यानंतरच निव्वळ नफा मिळतो. त्याचवेळी, भागधारकांना लाभांशावर पुन्हा कर भरावा लागतो. म्हणजेच एकाच उत्पन्नावर दोनदा कर आकारला जातो. सिंगापूरमध्ये मात्र ही डोकेदुखी नाही, त्यामुळे कंपन्यांना फायदा होतो.
कॉर्पोरेट टॅक्स कमी
सिंगापूरमध्ये कंपन्यांवर कॉर्पोरेट कर खूप कमी आहे. तो जवळपास 0-17 टक्क्यांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे, भारतात कॉर्पोरेट कर 30-35 टक्के आहे. भांडवली नफा कर देखील गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी मोठी डोकेदुखी बनत चालला आहे. सध्या, भारतात भांडवली नफा कर 10-20 टक्क्यांपर्यंत आहे, तर सिंगापूरमध्ये हा कर आकारलाच जात नाही.