Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startups Funding : कसा उभारला जातो स्टार्टअप्ससाठी निधी? प्री-सीड आणि सिरीज एबीसीडी राऊंड फंडिंग काय?

Startups Funding : कसा उभारला जातो स्टार्टअप्ससाठी निधी? प्री-सीड आणि सिरीज एबीसीडी राऊंड फंडिंग काय?

Startups Funding : स्टार्टअप ही झपाट्यानं वाढत जाणारी संकल्पना आहे. अलिकडच्या काळात नोकऱ्यांचं कमी होणारं प्रमाण आणि प्रत्येकाला वेगळं काहीतरी करण्याची इच्छा यामुळे या स्टार्टअप्समध्ये वाढ होताना दिसतेय. मात्र यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी. काय आहे याचं एकूण गणित? पाहू...

स्टार्टअप इंडियानुसार, सरकारी विभाग डीपीआयआयटीवरच (Department for Promotion of Industry and Internal Trade) 1 लाखांहून जास्त स्टार्टअप नोंदणीकृत आहेत. स्टार्टअपचा विषय निघाला की आपोआपच आणखी एक बाब समोर येते, ती म्हणजे फंडिंग. कधी सीड फंडिंग (Seed funding) तर कधी राउंड ए फंडिंग. अशावेळी अनेकांच्या मनात हाच प्रश्न येतो, की निधीचा हा वेगळा राउंड (ABCD राऊंड फंडिंग) नेमका आहे तरी काय? तो कधी होतो, कसा होतो?

प्रोटोटाइप समजून घ्या

प्रोटोटाइप हा कोणत्याही कंपनीच्या वास्तविक उत्पादन किंवा सेवेसारखंच आहे. मात्र मोठ्या प्रमाणात नाही तर अगदी कमी प्रमाणात. जसं की, कार उत्पादक कंपनी पहिल्यांदा कारचा प्रोटोटाइप बनवते. म्हणजेच फक्त एकच कार बनवते. नंतर ती खऱ्या कारसारखीच असते. असं करण्याचं कारण म्हणजे उत्पादनात आवश्यक असलेल्या सुधारणा करता याव्या, जे उत्पादन बाजारपेठेत गेलंय त्यासंदर्भात तक्रारी येवू नयेत, हा त्यामागचा उद्देश असतो.

प्री-सीड फंडिंग

कोणतंही स्टार्टअप आधी आपल्या संकल्पनेवर काम करतं. त्यानंतर प्रोटोटाइप तयार करतो. अशावेळी प्री-सीड फंडिंग उभारला जातो. ही अशी स्थिती असते, ज्यावेळी गुंतवणूक अत्यंत कमी असते. तुमची संकल्पना चांगली असेल, बाजारपेठेत टिकणारी, प्रतिसाद मिळणारी असेल तर गुंतवणूकदार पैसे गुंतवतात. नंतरच्या काळात आपले पैसे अनेक पटींनी वाढणार असल्याची या गुंतवणूकदारांना खात्री असते. सुरुवातीला पैशांची कमतरता असल्यानंच अशाप्रकारचं फंडिंग गरजेचं असतं.

सीड राउंड फंडिंग

पहिले दोन टप्पे तर झाले. आता जेव्हा इनोव्हेटरची आपल्या प्रॉडक्टसंदर्भातली संकल्पना तयार होऊ लागते, प्रोटोटाइप तयार होत असतो आणि प्रॉडक्ट बाजारात जाण्यासाठी तयार असतं, तेव्हा सीड राउंड फंडिंग उभारण्यात येतं. या फंडिंगमधून मिळालेल्या पैशाचा वापर प्रामुख्यानं आपलं प्रॉडक्ट बाजारात आणणं आणि व्यवसाय सुरू करणं यासाठी केला जात असतो.

अनुदानही मिळेल

फंडिंगच्या या टप्प्यात उत्पादन (Production), विपणन (Marketing), ग्राहक संपादन (Customer acquisition), यंत्रसामग्री (Machinery) आणि इतर विविध ऑपरेशनल खर्चासाठी निधी उभारण्यात येतो. एंजेल इन्व्हेस्टर, इनक्यूबेटर आणि इतर गुंतवणूकदार या टप्प्यावर फक्त पैसेच गुंतवत नाहीत. इतरही सहाय्य मिळतं. जसं की सरकारी योजनांतर्गत अनुदान स्टार्टअप्सला मिळू शकतं.

सिरीज ए राउंड फंडिंग

स्टार्टअपमधून प्रत्यक्ष उत्पादन आणि व्यवसाय सुरू होतो त्यावेळी हा व्यवसाय वाढवण्याच्या हेतूनं, नफा कमावण्याच्या उद्देशानं सिरीज ए राउंड फंडिंग उभारला जातो. फंडिंगच्या या टप्प्यात स्टार्टअपच्या ग्राहकांची संख्या किंवा यूझर्स, कंपनीच्या सोशल मीडिया पेजची स्थिती म्हणजे ते किती जणांपर्यंत पोहोचलंय, कंपनीचं उत्पन्न अशा सर्व बाबी गुंतवणूक पाहत असतो. कंपनीचा कंपनीचा व्यवसाय किती वेगानं वाढतोय, संबंधित प्रॉडक्टला किती मागणी आहे, याचाही विचार केला जातो. बिझनेस व्हेंचर कॅपिटल फंडही या स्तरावर गुंतवणूक करतात. म्हणजेच, मोठे गुंतवणूकदार जेव्हा कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लागतात तो हा टप्पा असतो.

राउंड सी आणि डी

स्टार्टअप जोर धरू लागतं म्हणजेच व्यवसाय झपाट्यानं वाढायला लागतो, त्यावेळी याप्रकारचं फंडिंग होतं. एखाद्या स्टार्टअपचा विस्तार एका शहर किंवा जिल्ह्यापुरता असेल तर ते मर्यादित स्वरुपातलं स्टार्टअप म्हणावं सागेल. पण जर का त्याचा विस्तार विविध राज्यांत किंवा देशभर होत असेल तर राउंड बी स्वरुपाचं फंडिंग गरजेचं असतं. त्यानंतर राउंड सी आणि नंतर राउंड डी असं फंडिंग होत असतं. म्हणजेच जसजसा विस्तार होतो तसतशी पैशांची गरज भासते. ती या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.