Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Consumer Spending: लोक बचत जास्त आणि खर्च कमी करत आहेत का? याचे काय परिणाम होणार?

Consumer Spending

Image Source : https://www.freepik.com/

कोरोना महामारीनंतर जास्तीत जास्त खर्च करण्याचा ट्रेंड वाढलेला दिसून आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा लोक खर्च कमी करून बचतीकडे वळताना पाहायला मिळत आहे.

गेल्याकाही महिन्यांमध्ये ग्राहकांच्या खर्च व बचतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर जास्तीत जास्त खर्च करण्याचा ट्रेंड वाढलेला दिसून आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा लोक खर्च कमी करून बचतीकडे वळताना पाहायला मिळत आहे. खर्च कमी करण्यामागे बेरोजगारी, महागाई, मंदी अशी अनेक कारणे दिसून येतात. याशिवाय, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढणाऱ्यांचाही आकडा वाढत चालला आहे.

बचत जास्त आणि खर्च कमी

कोरोना महामारीनंतरच्या काळात लोकांच्या आयुष्यात अनेक  बदल पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काही महिन्यानंतर लोकांकडून प्रवास, लग्झरी वस्तू, कपडे अशा गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले. यामागचे प्रमुख कारण होते YOLO (you only live once) ही संकल्पना.

आयुष्य हे कायमस्वरुपी नाही, असा विचार करत अनेकजण मोठ्या प्रमाणात खर्च करत होते. भविष्याबाबत कोणतीही शाश्वतता नसणे, हे यामागचे कारण होते. मात्र, मागील काही दिवसात खर्च कमी करून बचतीचा ट्रेंड वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सोने, रिअल इस्टेट, शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. 

खर्च कमी करण्याचे कारण काय? 

महागाई वाढती महागाई हे खर्च कमी करण्याचे प्रमुख कारण आहे. भारतातील महागाई दर हा जवळपास 4.50 ते 5 टक्क्यांदरम्यान आहे. उत्पन्न कमी असल्याने अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळले जात आहे. वस्तू व सेवांच्या वाढलेल्या किंमतीमुळे लोकांकडून खर्चात कपात केली जात आहे. याशिवाय, तरूण वर्गाकडून मिनिमलिस्ट लाइफस्टाइलला प्राधान्य दिले जात आहे. ज्यामुळे जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवरच पैसे खर्च केला जातो.
सुरक्षितता सुरक्षित भविष्य व निवृत्तीनंतरचे आरामदायी आयुष्य, यासाठी लोक खर्च टाळून जास्तीत जास्त बचतीला प्राधान्य देत आहे. भविष्यातील कोणत्याही आर्थिक समस्येला सामोरे जाता यावे यादृष्टीने गुंतवणूक केली जात आहे. कोरोना साथीसारखी स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास आर्थिक स्थिती भक्कम असावी, असा यामागे प्रमुख उद्देश आहे.
बेरोजगारी वाढत्या महागाईसोबतच बेरोजगारी देखील मोठी समस्या आहे. ग्राहकांकडून स्थिर उत्पन्न नसल्याने कपडे, प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च करणे टाळले जात आहे. याशिवाय, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढणाऱ्यांचा आकडाही वाढला आहे. 
मंदीजगभरातील अनेक देशांमधील वाढती महागाई व बेरोजगारीमुळे सातत्याने मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक देशांमधील ब्रिटन, जापान सारखे देशी मंदीच्या सावटाखाली आहेत. अनेक देशातील जीडीपी वाढीचा दर मंदावला आहे. त्यामुळे भविष्यात मंदी आल्यास याला सामोरे जाण्यासाठी जास्तीत जास्त बचत करण्याचा पर्याय अवलंबवला जात आहे.

खर्च कमी केल्याने काय परिणाम होतील?

लोकांनी बचत जास्त व खर्च कमी केल्याचा मार्ग अवलंबवल्याने अर्थव्यवस्थेवरही परिणाम पाहायला मिळत आहे. पर्यटन, एफएमसीजीसह अनेक क्षेत्रांना याचा फटका बसत आहे. आर्थिक वाढीसाठी ग्राहकांकडून वस्तूंवर जास्तीत जास्त खर्च करणे आवश्यक असते. खर्चात कपात झाल्यास उत्पादनात घट पाहायला मिळू शकते. यामुळे बेरोजगारीचा आकडा वाढू शकतो. तसेच, आर्थिक वाढ थांबेल व बाजारात मंदी येऊ शकते.