Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Generic Medicine: जेनेरिक औषधे स्वस्त का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण

Generic medicine

Generic Medicine: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला तर संपूर्ण घराचे बजेट बिघडते आणि कमाईचा मोठा हिस्सा औषधांवर खर्च होतो. अशा परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी अनेकजण जेनेरिक औषधांवर भर देतात. चला तर जाणून घेऊया जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषधांमध्ये काय फरक असतो? तसेच जेनेरिक औषधे स्वस्त का मिळतात.

Generic Medicine: 'आरोग्य हीच खरी संपत्ती' असे म्हटले जाते. त्यामुळे आरोग्याला हानी होणार असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी किंवा खर्च करताना मागेपुढे पाहिले जात नाही. डॉक्टरांकडून सांगितली जाणारी औषधे आपण निमूटपणे विकत घेतो आणि त्यातून बरे होण्यासाठी प्रयत्न करतो. पण काहीवेळेस या आजारपणमुळे पैशांचाही ताण येतो. महागड्या औषधांमुळे अनेकांना उपचार घेणे परवडत नाही. यातून गोरगरिब रुग्णांची सुटका व्हावी म्हणून सरकारने जेनेरिक औषधांच्या वापरावर भर देण्यास सुरूवात केली आहे. पण ही जेनेरिक औषधे म्हणजे काय? या दोन्ही औषधांमध्ये फरक काय आहे आणि ती स्वस्त का मिळतात. याची माहिती आपण घेणार आहोत. 

जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषधांमध्ये काय फरक असतो?

जेनेरिक औषधे ही ब्रॅण्डेड औषधांसारखीच असतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, असे आढळून आले आहे की, ब्रॅण्डेड कंपन्यांचे API किंवा कच्चा माल देखील जेनेरिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्त्रोतांमधून आलेला असतो. जेनेरिक औषधांचा परिणाम मूळ औषधाप्रमाणेच होतो. ज्याप्रमाणे जेनेरिक औषधांचे मूळ औषधांसारखेच सकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषधांमधील मुख्य फरक म्हणजे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंगचा असतो. त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्येही फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या औषधांच्या किमतीतही खूप फरक आहे.

जेनेरिक औषधे स्वस्त का आहेत?

पेटंट ब्रॅण्डेड औषधांची किंमत या कंपन्या ठरवत असतात. त्यांच्या संशोधन, विकास, विपणन, जाहिरात आणि ब्रॅण्डिंगवर (Research, Development, Marketing, Advertising and Branding) भरपूर पैसा खर्च केला जातो. तर, जेनेरिक औषधांचे थेट उत्पादन केले जाते. त्यांच्या टेस्ट आधीच झालेल्या असतात. जेनेरिक औषधांच्या किमती सरकारच्या मध्यस्थीने निश्चित केल्या जातात आणि त्यांच्या जाहिरातीवर विशेष असा खर्च केला जात नाही. सरकारकडून प्रधानमंत्री जन औषधी योजनासुद्धा राबविली जात आहे. त्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात औषधे पुरवली जात आहेत. 

जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषधांमध्ये फरक कसा ओळखायचा?

जेनेरिक औषधांची नावे कंपनीच्या ब्रॅण्डनुसार न ठरवता ती त्यातील औषधांच्या गुणधर्मानुसार दिली जातात. जेनेरिक औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या कंटेंटची पूर्ण माहिती मेडिकल स्टोअर्सना असते आणि ते ग्राहकांनाही त्याबद्दल सांगू शकतात. जेनेरिक औषधे ओळखण्यासाठी कंटेंटच्या नावावरून इंटरनेटवर शोध घेता येतो. याव्यतिरिक्त, जेनेरिक औषधांच्या किमती ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूपच कमी असते. 

(Source: https://navbharattimes.indiatimes.com)