हिडेंनबर्ग अहवालानंतर प्रचंड पडझड झालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सवरचे दृष्टचक्र संपल्याचे संकेत आहेत. आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेत अदानी ग्रुपमधील सर्वच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर वधारले. या तेजीने गुंतवणूकदारांना प्रचंड दिलासा मिळाला. अदानींच्या शेअर्समध्ये अचानक तेजी का आली याबाबत शेअर मार्केटमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
आज शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट धडकली होती. आठ सत्रानंतर दोन्ही निर्देशांकात वाढ झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 449 अंकांनी वधारला आणि तो 59411 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 147 अंकांच्या तेजीसह 17450 अंकांवर बंद झाला. आजच्या सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्सला प्रचंड मागणी दिसून आली.
आजच्या तेजीच्या लाटेत अदानी एंटरप्राईजेसचा शेअर आघाडीवर होता. आज अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 15% ने वधारला. मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अदानी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये 15% वाढ झाली होती. सलग दोन सत्रात हा शेअर 30% वधारला आहे. तेजीच्या लाटेत अदानी ग्रुपची मार्केट 7.50 लाख कोटींनी वाढली आहे.
हिंडेनबर्ग या अमेरिकी संस्थेने 24 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रुपबाबत अहवाल जाहीर केला होता. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली होती. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये या अहवालानंतर प्रचंड घसरण झाली होती. मागील महिनाभर ही पडझड सुरुच होती. यात काही शेअर 70% पर्यंत कोसळले. अदानी समूहात एलआयसीसह अनेक बड्या गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. त्यांना शेअर मार्केटमधील घसरणीने नुकसान सोसावे लागले. मात्र सहा आठवड्यानंतर आज पहिल्यांदाच सर्वच शेअर तेजीसह बंद झाले.
आजच्या सत्रात अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 14.70% तेजीस 1564.55 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट अॅंड स्पेशल इकॉनॉमिक झोन या शेअरमध्ये 1.61% वाढ झाली. तो 602.15 रुपयांवर बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 4.99% वाढ झाली आणि तो 509.80 रुपयांवर स्थिरावला. अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये आज 4.85% वाढ झाली आणि तो 713.20 रुपयांवर बंद झाला. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 5% तेजीसह 674.65 रुपयांवर स्थिरावला. अदानी पॉवरचा शेअर 4.98% वाढीसह 153.75 रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मरचा शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. बाजार बंद होताना अदानी विल्मरचा शेअर 4.99% तेजीसह 379.45 वर बंद झाला.
अदानी ग्रुपने ताबा मिळवलेल्या तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. एसीसी या कंपनीचा शेअर 2.14% तेजीसह 1769.40 वर बंद झाला. अंबुजा सिमेंटचा शेअर 3.32% वधारला आणि तो 353.40 वर बंद झाला. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये आज 4.99% वाढ झाली आणि तो 199.75 वर बंद झाला.
अदानी ग्रुपच्या 10 शेअर्समध्ये मागील महिनाभरात झालेल्या घसरणीने कंपन्यांचे बाजार भांडवल 11 लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. हिंडेनबर्ग अहवाल बाजारात धडकण्यापूर्वी अदानी ग्रुपची मार्केट कॅप 19.2 लाख कोटी इतकी होती. हिंडेनबर्गने केलेले आरोप अदानी ग्रुपकडून फेटाळण्यात आले आहेत.
'या' कारणांमुळे अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत
- हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अडचणीत आलेला अदानी समूह कर्जफेडीबाबत आक्रमक पावले उचलत आहे.
- अदानी ग्रुपच्या शेअर्समधील आजच्या तेजीमागे कंपनीला सिंगापूरमध्ये गुंतवणूकदारांचा कंपनीला मिळालेला भरघोस प्रतिसाद आहे.
- सिंगापूर आणि हॉंगकॉंगमध्ये अदानी ग्रुपने आयोजित केलेल्या ‘फिक्स्ड इन्कम रोड शो’मध्ये गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
- याशिवाय अदानी ग्रुपबाबत सकारात्मक घडामोडी शेअर्सला तेजीच्या वाटेवर नेण्यास फायदेशीर ठरल्या.
- इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार दोन गुंतवणूकादारांनी अदानी ग्रुपला 800 मिलियन डॉलर्सची तातडीची कर्ज सुविधा देण्याचे मान्य केले.
- या सुविधेने अदानी ग्रीन एनर्जीचे सप्टेंबर 2024 पर्यंत कर्ज फेडले जाईल.
- आणखी एक सकारात्मक घडामोड घडली. अदानी ग्रुपने कर्जफेडीबाबत सर्व कर्जदारांना आश्वस्त केले.
- एका सोव्हरेन फंडाकडून 3 बिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर झाल्याचे अदानी ग्रुपने धनकोंना अवगत केल्याचे बोलले जाते.
- मात्र अदानी ग्रुपकडून या दोन्ही गोष्टींना दुजोरा देण्यात आलेला नाही.