महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) आज जयंती. एक उत्तम राजा, ज्याने मराठा साम्राज्याचा विस्तार करून त्याची दहशत आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रजांच्याही मनावर कोरली. हे स्वराज्य विस्तारताना त्यांना मदत मिळाली ती जिवाभावाच्या मावळ्यांची. 1674 साली महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर स्वराज्याची घडी बसवली गेली.
स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा, प्रजेचे प्रश्न वेळीच सोडवले जावे यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्यामध्ये 8 मंत्री समाविष्ट होते. जे महाराजांना राज्यकारभारा विषयक मोलाचा सल्ला देतं असतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की आर्थिक सल्ले देण्यासाठी महाराजांचे अर्थमंत्री कोण होते. चला तर याबद्दल जाणून घेऊयात
महाराजांचे अर्थमंत्री कोण होते?
तसं पाहायला गेलं तर, स्वराज्यात सगळीच कामं सगळ्यांना करण्याची मुभा होती. मात्र कामात सुसुत्रता आणण्यासाठी महाराजांनी काही खाती तज्ज्ञ मंत्र्यांना दिली होती. राज्यकारभारातील आर्थिक सल्ले देण्यासाठी अष्टप्रधान मंडळात रामचंद्र निळकंठ बावडेकर (Ramachandra Nilkantha Bawadekar) कार्यरत होते.
रामचंद्र पंतांचा जन्म 1650 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील कोळवण (Kolavan) गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला. ते नीळकंठ सोनदेव बहुतकर यांचे धाकटे पुत्र होते. रामचंद्र पंतांचे आजोबा 'सोनोपंत' आणि काका 'आबाजी सोनदेव' हे शिवरायांच्या जवळचे होते. महाराजांच्या दरबारात रामचंद्र पंतांनी स्थानिक महसूल जिल्हाधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली व पुढे जाऊन ते अर्थमंत्री झाले.
1672 पूर्वी रामचंद्र पंत हे शिवाजी महाराजांच्या प्रशासनात कारकून म्हणून कार्यरत होते. 1672 मध्ये त्यांना आणि त्यांचा मोठा भावाला महाराजांनी महसूल मंत्री म्हणजेच मुजुमदार या पदावर बढती दिली. 1674 मध्ये राज्याभिषेक समारंभात, मुझुमदारांच्या पदाचे नाव 'अमात्य' ठेवले गेले आणि रामचंद्र पंत यांना ही पदवी देण्यात आली.
स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमाखर्च तपासणे आणि तो राजांना सादर करणे ही जवाबदारी रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडे होती. या कामाचे वार्षिक वेतन म्हणून पंतांना 12,000 होन इतके वेतन दिले जात होते. 1674 ते 1680 या काळात शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतांनी अर्थमंत्री (Finance Minister) म्हणून काम केलं. याशिवाय संभाजी महाराज, राजाराम महाराज, दुसरे शिवाजी महाराज, दुसरे संभाजी महाराज यांच्यासोबत ही रामचंद्र पंतांनी काम केलं. या सर्वांना आर्थिक आणि प्रजेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पंतांनी मदत केल्याचे दाखले इतिहासात दिले जातात.
राजकारणावर लिहिलं होतं पुस्तक
रामचंद्र पंत अमात्य हे मराठा इतिहासाच्या राजकारणावर पुस्तक लिहिणारे कदाचित पहिले लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आज्ञापत्र (Adnyapatra) असं होतं. या पुस्तकात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला होता
- राजा आणि सरकारची कर्तव्ये
- राज्यासाठी महसूल किती महत्त्वाचा आहे
- सैन्याचे महत्त्व आणि सर्व क्षेत्रातील विद्वान आणि तज्ञांचे महत्त्व
- प्रधानांचे शिक्षण, त्यांचे महत्त्व आणि कर्तव्ये
- ब्रिटिश फ्रेंचशी संबंधित परराष्ट्र धोरण
- न्यायपालिकेच्या धोरणांचे महत्त्व
- नैसर्गिक साधनसंपत्ती बाबत धोरण
या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असलेल्या या ऐतिहासिक ग्रंथाची तुलना कौटिल्याच्या अर्थशास्त्राशी केली जाते. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची तत्त्वे आणि कार्यपद्धती सांगितल्याचे सांगण्यात येते. हे पुस्तक लिहून 300 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजच्या काळातही तो ग्रंथ प्रासंगिक आहे असेही म्हटले जाते. 1716 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी रामचंद्र पंतांचे निधन झाले. पन्हाळा किल्ल्यामध्ये मराठा साम्राज्यासाठी मुघलांविरुद्ध लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली.
कसं होतं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ?
स्वराज्याची घडी नीट बसवण्यासाठी महाराजांनी कामाचं व्यवस्थान करण्याचं ठरवलं आणि त्यातून अष्टप्रधान मंडळ जन्माला आलं. विशेष म्हणजे या मंडळात कोणीही वंश परंपरागत पद्धतीने घेण्यात आलं नव्हतं किंवा जहागिरी प्रथा सुद्धा नव्हती.
आठ लोकांच्या या मंत्रिमंडळात पंतप्रधान म्हणजेच पेशवा म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे कार्यरत होते. तर स्वराज्याचे आर्थिक व्यवहार अर्थमंत्री म्हणून रामचंद्र निळकंठ बावडेकर पाहत होते. सचिव म्हणजेच सुरनीस या पदावर अण्णाजीपंत दत्तो कार्यरत होते. वाकनीस म्हणून दत्ताजीपंत त्रिंबक आणि सेनापत्री म्हणून हंबीरराव मोहिते स्वराज्याच्या संरक्षणाची धुरा सांभाळत होते. सुमंत म्हणजेच परराष्ट्र मंत्री म्हणून रामचंद्र त्रिंबक आणि न्यायाधीश म्हणून निराजीपंत रावजी कार्यरत होते. पंडित दानाध्यक्ष या पदावर रघुनाथ पंडित काम करत होते. हे सर्व मंत्री महाराजांना राज्यकारभारात काम करताना मदत करत होते.