• 02 Oct, 2022 08:00

Cyrus Mistry Death: 30 बिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या शापूरजी पालनजी समूहाचे काय होणार?

Cyrus Mistry Death

Cyrus Mistry Death: बांधकाम क्षेत्रात मागील तीन दशकांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या शापूरजी पालनजी समूहाचे नेतृत्व करणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. (Cyrus Mistry MD of S.P Group) सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Cyrus Mistry Death: तब्बल 157 वर्षांचा वारसा लाभलेल्या शापूरजी पालनजी समूहाचे दोन आधारस्तंभ निखळले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झाल्याने कॉर्पोरेट क्षेत्राला प्रचंड धक्का बसला आहे. यापूर्वी 28 जून 2022 रोजी सायरस यांचे वडील आणि शापूरजी पालनजी समूहाचे सर्वेसर्वा पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले होते. दोन महिन्यात दोन मोठ्या कर्तृत्वान व्यक्तींच्या जाण्याने 30 बिलियन डॉलरची उलाढाल असलेला शापूरजी पालनजी समूहात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. सायरस यांच्या तडकाफडकी जाण्याने  मिस्त्री कुटुंबियांची कधीही न भरुन निघणारी हानी झाली.

सायरस मिस्त्री यांचे आजोबा पालनजी मिस्त्री यांनी 1865 मध्ये लिटलवुड पालनजी अँड कंपनीची स्थापना केली होती.130 बिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा समूहात मिस्त्री कुटुंबियांची 18.6% हिस्सेदारी आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार शापूरजी पालनजी समूहाची एकूण मालमत्ता 30 बिलियन डॉलर इतकी आहे.    

शापूरजी पालनजी समूह बांधकाम, अभियांत्रिकी, स्थावर मालमत्ता, ग्राहकोयोगी वस्तू आणि सौर ऊर्जा क्षेत्रात विस्तारलेला आहे. दिडशे वर्षांचा वारसा लाभलेल्या या कंपनीने भारतातील अनेक आयकॉनिक बिल्डिंग उभारल्या आहेत. 50 हून अधिक देशांमध्ये शापूरजी पालनजीचा विस्तार आहे. 50,000 हून अधिक कर्मचारी आहेत. 1991 मध्ये सायरस मिस्त्री शापूरजी पालनजीमध्ये सक्रिय झाले. 20 वर्षात सायरस यांनी एस.पी ग्रुपला नव्या उंचीवर नेले. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सायरस हे ठरवून शापूरजी पालनजी ग्रुपमधून बाहेर पडले होते. पुन्हा ते 2017 मध्ये शापूरजी पालनजीमध्ये सक्रिय झाले. आता या संपूर्ण कारभाराची मुख्य जबाबदारी पालनजी मिस्त्री यांची ज्येष्ठ चिरंजीव आणि सायरस मिस्री यांची थोरले बंधू शापूर मिस्त्री यांच्यावर असेल.

शापूरजी पालनजी समूहावर 23,500 कोटींचे कर्ज  

सायरस मिस्त्री यांची टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी आणि कोव्हीडमुळे ठप्प झालेला व्यवसाय याचा फटका शापूरजी पालनजी समूहाला बसला होता. या काळात समूहातील अनेक कंपन्यांची कामगिरी खालावली. कर्ज फेडण्यासाठी मिस्त्री कुटुंबियांनी टाटा सन्सचे शेअर तारण ठेवून पैसा उभा केला होता. त्याला टाटा सन्सने आक्षेप घेतला होता. सायरस मिस्त्री यांनी या काळात काही कटु निर्णय घेत शापूरजी पालनजी समूहावरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक वर्ष 2022 च्या सुरुवातीला शापूरजी पालनजी समूहावर 37,000 कोटींचे कर्ज होते. ते 13,500 कोटींनी कमी झाले. यासाठी युरोका फोर्ब्स आणि स्टर्लिंग अँड विल्सन या कंपन्यांची विक्री करण्यात आली आणि कर्जफेड करण्यात आली. त्यामुळे कर्जाची रक्कम 23,500 कोटींपर्यंत कमी झाली.

नव्या पिढीला व्हावे लागेल सक्रिय

सायरस मिस्त्री यांच्या पश्चात पत्नी रोहिका छागला आणि दोन मुले फिरोज आणि झहान असा परिवार आहे. सायरस यांच्या दोन्ही मुलांना आता शापूरजी पालनजी समूहात सक्रिय व्हावे लागले. शापूरजी पालनजी कंपनीचे अध्यक्ष शापूर मिस्त्री यांचे चिरंजीव पालन यांची नुकताच संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली होती. समूहासाठी दिर्घकालीन गुंतवणूक आणि रणनीती ठरवण्याचे निर्णयाच्या प्रक्रियेत पालन मिस्त्री यांचा समावेश आहे. शापूर मिस्त्री यांची कन्या तानया ही समूहातील ‘सीएसआर’ची जबाबदारी सांभाळत आहे.

देशातील सर्वात मोठे बोर्डरुम बॅटल 

सायरस मिस्त्री यांनी 2012 ते 2016 या काळात टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषविले, मात्र पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळासोबत मतभेत आणि सायरस यांनी केलेले आरोप यावरुन हे प्रकरण चांगलेच गाजले. कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रकारे संचालक मंडळातील मतभेद आणि त्यावरील कायदेशीर लढाईने हे बोर्डरुम बॅटल चर्चेचा विषय ठरले होते. या प्रकरणात टाटा सन्समधील संचालकांच्या मनमानीला सायरस यांनी विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय कंपनी लवादाकडे या खटल्यांची सुनावणी झाली होती. मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायायलाने टाटा सन्सच्या बाजूने कौल दिला होता. मात्र या निर्णयालाही सायरस मिस्त्री यांनी आव्हान दिले होते, ज्यामुळे न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. 

Image Source : Twitter