ई कॉमर्स वेबसाईटवरून सणासुदी निमित्त विविध ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे याकाळात अनेकजण ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. तसेच ऑनलाईन खरेदीवर (Online Shopping) मोठी सूट देखील मिळत असल्याने तुम्ही महागड्या वस्तूंची खरेदीदेखील ॲमेझॉन (Amazon) सारख्या संकेतस्थळावरूनच करता. दरम्यान, अलीकडच्या काळात ऑफरसाठी लावलेले नियम अटी, तसेच महागड्या वस्तूंच्या बाबतीत डिलिव्हरी बॉयकडून होणारी फसवणूक असे प्रकार घडतात. तसेच तुम्ही मागवलेली एखादी वस्तू डिलिव्हरीच्या काळात डॅमेज होण्याचीही शक्यता वाढते, तसे झाल्यास तुमचा वेळ आणि काही वेळा पैसा देखील वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे ॲमेझॉन अथवा इतर कोणत्याही वेबसाईटवरून खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण जाणून घेऊयात..
प्रोडक्टच्या किमती पडताळून पाहा-
सणासुदीनिमित्त अॅमेझॉनवरून खरेदी करत असताना तुम्हाला मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या उत्पदनांच्या किंमतीच पडताळणी करणे आवश्यक आहे. कारण काही वेळा डिस्कॉऊंट ऑफर या काही विशिष्ट ग्राहकासाठी असतात.त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची इतर संकेतस्थळावर किंवा त्या उपकरणाच्या मातृ कंपनीच्या संकेतस्थळावर त्याची मूळ किंमत किती आहे याची पडताळणी करा. त्यामुळे तुम्हाला योग्य किंमतीत प्रोडक्ट खरेदी करता येईल.
डिलिव्हरी चार्जेस आणि नियम अटी
कोणत्याही उत्पादनासाठी ऑफर देत असताना नियम व अटी लागू असतात. त्यामध्ये ऑफर फक्त ठराविक बँकेचे क्रेडिट कार्ड धारकांसाठी विशिष्ट ऑफर दिल्या जातात. तसेच नियम अटी नुसार शहरी भागात काहीवेळा डिलिव्हरी चार्जेस घेतले जात नाहीत. मात्र, तालुक्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागतात आणि हे प्रोडक्ट डिलिव्हरी वेळी सांगितले जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर डिलिव्हरी चार्जेस आकारले जातात. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची खात्री करा की, तुमच्या रहिवाशी भागात त्याची डिलिव्हरी मिळते का? त्यासाठी फ्री डिलिव्हरी आहे का? कॅश ऑन डिलिव्हरीसाठी किती चार्जेस आकारले जातात यासर्व बाबींची खात्री करा.
प्रोडक्ट तपासून घेण्याची सोय-
ॲमेझॉन अथवा कोणत्याही इ कॉमर्स संकेतस्थळावरून तुम्ही जर एखादी महागडी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करत असाल तर यावेळी तुम्ही एका गोष्टीची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणजे तुम्ही प्रोडक्ट खरेदी करत असताना, त्या प्रोडक्टच्या डिलिव्हरीच्या पर्यायामध्ये ती वस्तू डिलिव्हरीच्या वेळी उघडून तपासणी करण्यास पात्र आहे का? म्हणजेच 'Eligible for Open Box Inspection' हा पर्याय उपलब्ध आहे का याची खात्री करून घ्यावी. हा पर्याय उपलब्ध असेल तर महागडे उत्पादन खरेदीस प्राधान्य द्यावे.यामुळे तुम्हाला तुमची वस्तू तपासून घेता येईल. ती खराब असेल तर परत पाठवणे शक्य होईल, किंवा तुम्ही मागवलेलीच वस्तू आहे याची खात्री करता येते, तसेच या पर्यायामुळे आपली होणारी फसवणूकदेखील टाळता येऊ शकते.