Home Loan Application: डिजिटल बँकिंगमुळे आता सर्वकाही शक्य आहे. घराच्या बाहेर पाऊल न टाकता तुम्ही अनेक कामे ऑनलाइन करू शकता. गृहकर्जासाठी ऑनलाइन अर्जसुद्धा करता येईल. सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करून लोन मिळवता येईल. बँकेच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करण्याचा ऑफलाइन पर्यायही तुमच्याकडे आहे. यातील योग्य कोणता ते पाहूया.
एचडीएफसी, आयसीआयसीआय सह काही आघाडीच्या बँका अर्ज करण्यापासून ते लोन मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करतात. लोनसाठी तुमची पात्रता आहे की नाही? व्याजदर, इएमआय किती येईल हे तपासता येईल.
कर्जाची पात्रता ऑनलाइन पाहता येईल
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना कर्जाची पात्रता काही मिनिटात तुम्हाला समजेल. मात्र, ऑफलाइन मोडने बँकेत जाऊन लोन ऑफिसरशी चर्चा केल्यानंतर माहिती मिळेल. घर घेण्यासारखी मोठी गोष्ट करताना अनेकांचा ऑनलाइन प्रोसेसवर विश्वास नसतो. त्यांना स्वत: बँकेच्या शाखेत जाऊन चर्चा करून सविस्तर माहिती घेतल्यानंतर विश्वास बसतो. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असते. ऑनलाइन काही मिनिटांत तुम्हाला माहिती मिळू शकते.
कागदपत्रांची आवश्यकता
जेव्हा तुम्ही ऑनलाइन अर्ज करत असता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा ऑनलाइन अपलोड करावे लागते. विविध शुल्कांची माहितीही ऑनलाइन दिलेली असते. मात्र, जर तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करत असाल तर सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. लोन फाइलसाठी अनेक कागदपत्रे लागत असल्याने एखादे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय स्वीकारतात.
ऑनलाइन प्रक्रिया करा घरबसल्या
डिजिटल टेक्नॉलॉजिमुळे गृहकर्जासाठी अप्लाय करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. तुम्ही अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरू शकता. अन्यथा तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन पेमेंट करावे लागेल. तुमच्याकडे बँकेच्या शाखेत जाण्यासाठी वेळ नसल्यास ऑनलाइन अर्ज करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी होम लोन अधिकारी तुमच्या घरी माहिती देण्यासाठी येऊ शकतो. किंवा तुम्ही बँक प्रतिनिधीशी ऑनलाइन चॅट करून माहिती घेऊ शकता.