लग्नसराई, अक्षय्या तृतीया या सणावरांच्या निमित्ताने सर्वच घरांमध्ये आता सोन्याच्या खरेदीचा विषय सुरू असणार. सोन्याचे दर कुठे किती आहेत यानुसार कधी सोने खरेदीला जायचं याचं प्लॅनिंग आपण करत असतो. यासाठी सकाळी सकाळी सोनाऱ्यांना फोन करुन आजच्या दराबाबत विचारणा करणे ही कायमच पाळली जाणारी पद्धत. याशिवाय वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांच्या बातम्यावरून आजचे दर जाणून घेतले जातात.
पण आजच्या यूगात सोने खरेदीच्या विचारसरणीत वा सोन्यामधील गुंतवणूकीत जर आपण वेगळा आधुनिक दृष्टिकोन ठेवत असू तर मग सोन्याच्या किंमती पाहण्यासाठी तीच ती जूनी पद्धत का? आज सोन्याचे दर हे वेगवेगळ्या मोबाईल ॲप च्या माध्यमातून समजू शकतात. तेव्हा पाहुयात हे ॲप कोणते आहेत.
Table of contents [Show]
गोल्ड प्राईस लाईव्ह
गोल्ड प्राईस या संकेतस्थळाने गोल्ड प्राईस लाईव्ह हे ॲप तयार केलं आहे. या ॲपमध्ये आपण सर्व जगातील सोन्याचे दर पाहू शकतो. या ॲपमध्ये आपण देश व त्या-त्या देशाची करन्सी निवडल्यावर आपल्याला तेथील दर पाहायला मिळतात. यामध्ये दर मिनीटाला सोन्याचे दर हे अपडेट होत राहतात. हे ॲप आपल्याला ॲन्ड्रॉईड आणि आयफोनवर सुद्धा उपलब्ध होते.
मनीकंट्रोल मार्केट
मनीकंट्रोल या आर्थिक घडामोडींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे हे ॲप आहे. या ॲपवर आपल्याला सोन्याच्या दरासह इतर बाजारभाव जसे की, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केटचे दर सुद्धा पाहायला मिळतात. हे ॲपसुद्धा आपल्याला गूगल प्ले-स्टोरवर मिळते.
आयबुलियन ॲप
या मोबाईल ॲपवर सुद्धा आपल्याला सोन्याचे लाईव्ह दरांविषयी माहिती मिळते. यामध्ये सुद्धा जगभरातल्या दरांची माहिती असते. त्यासाठी आपल्याला फक्त भारतातले दर जाणून घ्यायचे असतील तर ॲपच्या सेंटिग मध्ये जाऊन आपण देश आणि चलन निवडू शकतो. त्यानुसार मग आपल्यापुढे आपल्या देशातील सोन्याच्या दराविषय सविस्तर माहिती मिळू शकते. ॲन्ड्रॉइड ॲप मार्केटमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. मात्र, याच्या वापरासाठी आपल्याला कालांतराने पैसे मोजावे लागतात.
केकास्ट गोल्ड लाईव्ह
केकास्ट गोल्ड लाईव्हमध्ये सुद्धा जागतिक पातळीवरील ॲप आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला जगभरातील मौल्यवान धातूच्या दरांची लाईव्ह माहिती मिळते. हे ॲप आयफोन, ॲन्ड्रॉईड आणि ब्लॅकबेरी ओएसमध्ये डाऊनलोड करता येते.