व्हाट्सअॅपनं (Whatsapp) स्मार्टवॉचसाठी स्टँडअलोन अॅप (Standalone app) लॉन्च केलं आहे. कदाचित स्मार्टफोनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हाट्सअॅप असेल. आता याच सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅपला स्मार्टवॉचची साथ मिळाली आहे. आतापर्यंत या दोन्हींशिवाय काही गोष्टी अपूर्ण होत्या. म्हणजे स्मार्टवॉचमध्ये फक्त व्हाट्सअॅप नोटिफिकेशन्स यायचे. फार तर तुम्हाला ओके किंवा येस असं उत्तर दिलं जाऊ शकत होतं. पण आता असं होणार नाही. कारण व्हाट्सअॅपची मालकी असलेल्या मेटानं (Meta) यासाठी एक अॅप लॉन्च केलं आहे.
मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इन्स्टा चॅनलवर याची घोषणा केली. त्यांनी अँड्रॉइड स्मार्टवॉचचा एक छोटा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून या फीचरवर काम करत होती. आता हे फीचर लाइव्ह आहे आणि जर तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टवॉच असेल तर येत्या काही दिवसात तुम्हाला हे फीचर वापरता येणार आहे.
quick-reply from the wrist?⌚️ yes plshttps://t.co/w9h7ddYqGX
— WhatsApp (@WhatsApp) July 19, 2023
नव्या अॅपचं वैशिष्ट्य काय?
नव्या अॅपच्या सहाय्यानं तुम्ही स्मार्टवॉचवरून थेट मेसेजेसना रिप्लाय देऊ शकणार आहात. तसंच व्हॉइस मेसेज ऐकणं आणि रेकॉर्ड करणंदेखील शक्य होणार आहे. याच्या मदतीने व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल करणंही शक्य होणार आहे. मात्र, यासाठी तुमच्या स्मार्टवॉचमध्ये गुगल विअर ओएस 3 (Google Wear OS 3) असणं गरजेचं आहे.
इतरही अॅप्स होतील लॉन्च
तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे. सध्यातरी व्हाट्सअॅपनं आपलं अत्याधुनिक फीचर्स असलेलं अॅप आणलं आहे. त्यासोबत भविष्यात इतर अॅप्सबाबतदेखील अशीच सुविधा मिळणं शक्य होणार आहे. कदाचित असंही होईल, की स्मार्टफोनऐवजी हातातलं घड्याळच सर्व काम करेल. त्यामुळे स्मार्टवॉच विकणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा होणार आहे. या अॅपमुळे स्मार्टवॉचचा खप आणखी वाढणार आहे, जो भविष्यातही कायम राहील.