“अभिनंदन, सर. आपली पॉलिसी झाली आहे. पॉलिसी नंबर पडला आहे. आता पॉलिसीचे डॉक्युमेंट्स माझाकडे आले की मी तुम्हाला पाठवून देतोच.” महिन्याभराचे विचारमंथन, एजंटसोबत चर्चांच्या फैरी, “हो-नाही”, “आज-उद्या” करता करता भरलेला भलामोठा पॉलिसीसाठीचा प्रपोजल फॉर्म, बऱ्याच सह्या, नंतर मेडिकल, मग ब्लड-प्रेशर जास्त म्हणून पुन्हा एक मेडिकल, मग वाट पहाणे आणि अखेरीस एजंटचा आलेला most-awaited असा “पॉलिसी झाल्याचा कॉल”. हायसं वाटणारा क्षण.
वास्तविक इन्शुरन्स (Insurance) पॉलिसी काढणे हा इतर कोणत्याही उत्पादने आणि सेवांचा समावेश असलेल्या व्यवहारापेक्षा थोडा वेगळा प्रकार असतो. याचे मुख्य कारण म्हणजे प्रीमियम पेमेंट करण्याच्या बदल्यात आपल्याला काहीही ठोस मिळत नाही. अर्थात इन्शुरन्स हे पॉलिसीच्या अटी व शर्तींवर आधारित विमाकर्त्या इन्शुरन्स कंपनीने पॉलिसीधारकाला दिलेले वचन असते. आणि पॉलिसी डॉक्युमेंट हे त्या हमीचे, वचनाचे अस्तित्वात आलेले पहिले लिखित दस्तऐवज.
पॉलिसी डॉक्युमेंट म्हणजे कंपनी आणि आपल्यातील महत्त्वाचा करार!
पॉलिसी डॉक्युमेंट हातात आले की जबाबदारी संपली, असे नाही. पॉलिसी डॉक्युमेंट हे पॉलिसीधारक म्हणून आपले अधिकार, जबाबदाऱ्या आणि दायित्व (rights, responsibility and accountability) स्पष्ट करणारा आणि कायदेशीर आव्हान देता येण्यायोग्य असा अत्यंत महत्त्वाचा करारनामा असतो. तेव्हा त्यामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक तपशीलाची म्हणजे आपण प्रपोज केलेला कव्हरेज, पॉलिसीचे फायदे, पॉलिसीचे मूल्य (Sum assured), एवढेच नव्हे तर कव्हर न केल्या जाणाऱ्या बाबी (exclusions) यांची देखील नीट काळजीपूर्वक पडताळणी करणे आवश्यक असते.
पॉलिसी डॉक्युमेंट हातात आल्यावर पुढील गोष्टींची खातरजमा करून घेणे अत्यावश्यक
- पॉलिसी डॉक्युमेंट हा विमा-करार अस्तित्वात आल्याचा औपचारिक दस्तावेज असल्याने तो भारतीय स्टॅम्प ऍक्ट, 1899 नुसार स्टॅम्प केलेल्या स्वरूपात असणे आवश्यक आहे.
- पॉलिसी मिळताच योग्य तीच पॉलिसी आल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. पॉलिसीची मुदत, पॉलिसी प्रारंभ आणि समाप्त होण्याची तारीख, पॉलिसीचे मूल्य, प्रीमियमची रक्कम, PPT - Premium Payment Term (म्हणजे प्रीमियम भरण्याचा वास्तविक कालावधी), भरणा करावयाची तारीख आणि PPM - Premium Payment Mode (मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक अथवा वार्षिक वारंवारता / Frequency), तसेच पॉलिसीसोबत घेतले असल्यास रायडर्सचा तपशील या सर्व गोष्टी योग्य असल्याचे तपासून घ्याव्यात.
- पॉलिसीधारकाचे नाव, वय, व्यवसाय, निवासी पत्ता, संपर्क क्रमांक, शिक्षण, मेडिकल हिस्ट्री, रोजगार तपशील अचूकपणे नमूद केला गेलेला असणे आवश्यक आहे. पॉलिसी डॉक्युमेन्टवर नमूद केलेला पॉलिसी क्रमांक ही आपली इन्शुरन्स कंपनीकडे असलेली कायमस्वरूपी नोंद असते. कारण भविष्यामधले इन्शुरन्स कंपनीसोबतचे सर्व व्यवहारांमध्ये हा पॉलिसी क्रमांकच आपली ओळख असणार आहे.
- पॉलिसीधारकाच्या माहितीसोबतच नॉमिनीची माहिती, नॉमिनीचे पॉलिसीधारकासोबतचे नाते, पॉलिसीधारकाचा बँकेचा तपशील, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस, यांचा तपशील खात्री करून घ्यावा. आपली नॉमिनी असणारी व्यक्ती आपली/आपला जोडीदार, आपले अपत्य अथवा आपले पालक असू शकतात. तेव्हा नॉमिनी व्यक्तीला पॉलिसीची माहिती, तिचे स्वरूप, मूल्य, क्लेमची रक्कम आणि मिळण्याची पद्धत (lump sum amount किंवा ठराविक कालावधीने मिळणारे उत्पन्न) याची माहिती देऊन ठेवणे आवश्यक असते.
- पॉलिसीचा “फ्री-लूक कॅन्सलेशन कालावधी” ही देखील महत्वाची तरतूद असते. आपल्याला पॉलिसीचे स्वरूप योग्य न वाटल्यास तसे कारण नमूद सरून 15 दिवसांच्या आत आपण पॉलिसी परत करू शकतो. ऑनलाइन खरेदी केली असल्यास हा कालावधी 30 दिवसांपर्यंत असतो.
- याव्यतिरिक्त मध्यस्थामार्फत किंवा थेट कंपनीकडून पॉलिसी खरेदी केली असल्यास संबंधित तपशील नमूद केला असल्याची खात्री करून घेणे जरुरीचे आहे. तसेच आयकर कायद्याच्या सेक्शन 80C आणि सेक्शन 10 (10D) ची तरतूद दस्तऐवजात नमूद केले असल्याचे तपासून घेणे देखील गरजेचे आहे.
- पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये इन्शुरन्स कंपनीचे नाव, मुख्यालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेलची माहिती घोषित केलेली असणे बंधनकारक आहे. तसेच प्राप्त झालेल्या डॉक्युमेंटवर प्राधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी असल्याचे देखील निश्चित करून घ्यावे. तसेच पॉलिसी डॉक्युमेंट हे कंपनीच्या ओरीजिनल लेटरहेडवर मुद्रित असल्याची खात्री करून घ्यावी.
यापैकी कोणत्याही तपशिलांमध्ये काही विसंगती आढळून आल्यास तात्काळ इन्शुरन्स कंपनीसोबत ईमेलद्वारे अथवा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर संपर्क करून योग्य तो सुधार करून घेणे गरजेचे असते.
पॉलिसी डॉक्युमेंट हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. पॉलिसीची मूळ प्रत गहाळ झाल्यास आपण इन्शुरन्स कंपनीकडे दुय्यम प्रतीसाठी (Duplicate Copy) अॅप्लिकेशन करू शकतो. दुय्यम प्रत देत असताना इन्शुरन्स कंपनी पॉलिसी डॉक्युमेंटच्या पुनर्छपाईकरिता (Reprinting of the document) म्हणून माफक रक्कम आकारते. मात्र इन्शुरन्स कंपनीला पॉलिसी डॉक्युमेंट गहाळ झाल्याचे तात्काळ सूचित क्रमावे लागते. सोबत आपल्याला स्वाक्षांकित (self-signatured) इंडेम्निटी बॉंड (क्षतिपूर्ती प्रतिज्ञापत्र) जोडावा लागतो. तसेच आपल्याला नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणी FIR (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करावा लागतो.