Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Universal Life Insurance: युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे जाणून घ्या!

What is Universal Life Insurance

Universal Life Insurance: युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही बेसिक लाईफ इन्शुरन्स प्लॅनपेक्षा थोडी वेगळी आहे. यामध्ये लाईफ कव्हर सोबतच सेव्हिंग्स बेनिफिट्स (Saving Benefits) देखील मिळतात.

What is Universal Life Insurance: आपण ULIP अर्थात युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनबद्दल नेहमी चर्चा होत असताना पाहतोच. युलिप प्लॅन्स हे इन्शुरन्स + इन्वेस्ट्मेन्ट्सचे कॉम्बिनेशन (ULIP Plans are Insurance + Investment Plan) असते. पण तुम्ही युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल (Universal Life Insurance)  ऐकले आहे का? हा देखील लाईफ इन्शुरन्स प्लॅनचाच एक प्रकार आहे; जो पॉलिसीधारकाच्या हयात असेपर्यंतच्या संपूर्ण काळासाठी चालू राहतो. या प्लॅनला Cash Value Life Insurance म्हणजेच रोख मूल्य जीवन विमा असेही म्हणतात.

रोख मूल्य जीवन विमा योजनेनुसार, आपण पॉलिसीधारक म्हणून दरमहा भरलेल्या प्रीमियमच्या रकमेचा एक भाग बचत खात्यात (Savings Account) हस्तांतरित होत असतो. विशिष्ट कालावधीनंतर जेव्हा आपल्या कॉर्पसचे रोख मूल्य एका निश्चित मर्यादेच्या पलीकडे जाते, तेव्हा आपण ते प्राप्त करून घेऊ शकतो. थोडक्यात, या प्लॅनमध्ये लाईफ कव्हर सोबतच सेव्हिंग्स बेनिफिट्स (Saving Benefits) देखील मिळतात.

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही बेसिक लाईफ इन्शुरन्स प्लॅनपेक्षा थोडी वेगळी असते. इन्शुरन्स पॉलिसीचा हा प्रकार डेथ बेनिफिट्सच्या  (मृत्यू लाभ) पे-आउटच्या बाबतीत अधिक लवचिक (flexible) असतो. त्यामुळे आपण आपल्या फिटनेस आणि प्राधान्यानुसार क्लेमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतो. अर्थात असे असले तरी देखील, जर आपल्याला इन्शुरन्सचा कव्हर वाढवायचा असेल, तर मात्र मेडिकलला सामोरे जावे लागते. आपले लाईफ कव्हरेज कमी करायचे असल्यास, संपूर्ण पॉलिसी सरेंडर न करताही, फक्त समर्पण शुल्क (Surrender Charges) भरावे लागते.

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्सची वैशिष्ट्ये

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियमचे पेमेंट करण्याबाबत खूपच फ्लेक्सिबल आहे. आपण भरलेल्या प्रिमिअमच्या रकमेचा एक भाग आवश्यक लाईफ कव्हरसाठीची  किमान रक्कम वळविण्यात येते आणि उर्वरित अतिरिक्त रक्कम ही आपल्या बचत खात्यामध्ये ठेवली जाते. या ठेवी इन्शुरन्स कंपनीने ठरवलेल्या दराने वाढतात. अर्थात, काही वेळा या वाढीवर बाजारातील परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो.

अशाप्रकारचा लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेतल्यास, सुरुवातीच्या काही वर्षांत आपण जास्तीत जास्त प्रीमियम भरला तर पॉलिसीधारक एक चांगली रक्कम (Cash Value) जमा करू शकतो. ज्याचा तो नंतर भविष्यातील प्रीमियम भरण्यासाठी वापर करू शकतो. जमा झालेला हा निधी (Cash Value) पॉलिसीधारकाच्या हयातीत वापरला जातो. पण  पॉलिसीधारकाचे निधन झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून थकबाकी वजा करून उर्वरित लाभ हा नॉमिनीला डेथ बेनिफिट्स म्हणून दिला जातो.

अशाप्रकारचा इन्शुरन्स साधारणपणे वयाच्या शंभरीपर्यंतच्या किमतीची हमी देतो. हे वय ओलांडल्यानंतरही पॉलिसी सुरू ठेवायची असल्यास जास्तीचा प्रीमिअम भरावा लागतो. प्रीमियम भरणे बंद केल्यास, तसेच कॅश व्हॅल्यू कमी केल्यास पॉलिसी आपोआप संपुष्टात येते.

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्सचे प्रकार

इंडेक्स्ड युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स (Index Universal Life Insurance)

या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये आपल्या गुंतवणुकीचे रोख मूल्य बाजारातील कामगिरीवर अवलंबून असते. जेव्हा मार्केट चांगले चालत असते, तेव्हा कॅश व्हॅल्यूचे मूल्य वाढते. पण जेव्हा मार्केटमध्ये घसरण होते तेव्हा कॅश व्हॅल्यूचे मूल्य घसरते. परिणामी त्याचा परिणाम पॉलिसीच्या प्रीमियमवर होतो.

गॅरंटीड युनिव्हर्सल लाइफ इन्शुरन्स (Guaranteed Universal Life Insurance) 

या प्रकारच्या पॉलिसीमध्ये व्याज दर निश्चित केलेला असतो आणि प्रीमियम संपूर्ण कालावधीसाठी समान राहतो. जोपर्यंत पॉलिसीधारक प्रीमियमची रक्कम नियमितपणे भरत असतो, तोवर पॉलिसी सुरू राहते. पण या पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट्य पॉलिसीधारकाला आयुष्यभर लाईफ कव्हरेज देणे हा असल्याने, याचा अधिक भर हा कॅश व्हॅल्यू वाढविण्यावर असतो.

व्हेरिएबल युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स (Variable Universal Life Insurance) 

या प्रकारामध्ये पॉलिसीधारकाला आयुष्यभर कव्हरेज देण्याबरोबरच रोख मूल्याचा भाग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवला जातो. त्यातून मिळणारे व्याज हे मार्केटमधील परिस्थितीवर अवलंबून असते. तसेच यासाठी पॉलिसीधारकाकडून शुल्क आकारले जाते.

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्सचे फायदे

  1. या इन्शुरन्स प्रकारामध्ये आपल्याला लाईफ कव्हर आणि सेव्हिंग बेनिफिट्स मिळविण्यासाठी दोन वेगवेगळ्या रकमा भरण्याची आवश्यकता नाही.
  2. या प्लॅन्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे Adjustable Death Benefits म्हणजे आपण आपली इन्शुरन्सची रक्कम आपल्या गरजेनुसार कमी अधिक करू शकतो. जी सुविधा इतर टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये नाही.
  3. युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीध्ये प्रीमिअम भरण्याचा पर्याय असल्यामुळे निश्चित केलेल्या लाईफ कव्हरकरीता प्रीमियमची रक्कम सोयीनुसार भरू शकतो.
  4. युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स स्कीम आपल्याला निश्चित व्याज दर देते आणि त्यामुळे पॉलिसीची कॅश व्हॅल्यू वाढत राहते.
  5. एकाच वेळी अनेक विमा आणि गुंतवणूक योजनांसाठी प्रीमियम भरत राहण्याची गरज नाही.

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या मर्यादा 

युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्सचा मुख्य तोटा असा आहे, यातील गुंतवणुकीची योजना मार्केटमध्ये खराब कामगिरी करू लागली, तर चांगले रिटर्न (Financial Returns) मिळण्याची आशा धूसर होते. त्यामुळे पॉलिसीधारकाला कॅश व्हॅल्यू जास्तीत जास्त ठेवण्यासाठी प्रीमियमवर जास्तीची रक्कम खर्च करावी लागते. त्याचबरोबर युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्सच्या बचत भागामध्ये (Savings Part) काही जोखीम असते. पण Flexibility यालाच आपले प्राधान्य असेल तर युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी निवडणे योग्य ठरू शकते.