Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unit Linked Insurance Plan: विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचा एकत्र फायदा देणाऱ्या युलिप योजनांचे फायदे-तोटे माहीत आहेत का?

Unit Linked Insurance Plan

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनद्वारे (ULIP plan) गुंतवणूकही करता येते आणि जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. मात्र, या पॉलिसीचा प्रिमियम निव्वळ जीवन विमा पॉलिसींपेक्षा जास्त असतो. तुम्ही भरत असलेला प्रिमियम युलिपकडून भांडवली बाजारात गुंतवला जातो. त्यातून मिळणारा परतावा गुंतवणूकदाराला दिला जातो. या योजनेचे फायदे तोटे काय आहेत ते पाहूया!

Unit Linked Insurance Plan: बाजारामध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. त्यापैकी एक म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP plan). विमा आणि गुंतवणूक असे दोन वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र, युलिप प्लॅनमध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र करण्यात आल्या आहेत. जीवन विम्यासोबत गुंतवणूक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. पारंपरिक जीवन विमा पॉलिसींपेक्षा युलिप योजनांचा प्रिमियम जास्त असतो. कारण, याद्वारे गुंतवणुकदाराला परतावा दिला जातो. तर निव्वळ जीवन विमा(टर्म इन्शुरन्स) मध्ये कोणताही परतावा मिळत नाही.

युलिपद्वारे मिळणारा प्रिमियम डेट, इक्विटी, हायब्रीड अशा फंडामध्ये गुंतवणूक करण्यात येतो. तसेच कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करायची याचे स्वातंत्र्यही पॉलिसीधारकाला देण्यात येते. मात्र, हे बाजारभावाच्या अधीन असते. यावरील परतावा हा शेअर मार्केटच्या स्थितीवर अवलंबून असतो. नावातच युनिट लिंक्ड असे असल्याने पॉलिसीधारकाला गुंतवणुकीचे युनिट दिले जातात.

प्रिमियम आणि पॉलिसी टर्म किती? (ULIP plan Term)

युलिप योजनांचा प्रिमियम भरण्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे एकरकमी प्रिमियमही भरू शकता. तसेच निश्चित कालावधी म्हणजे दोन किंवा पाच वर्षांतून एकदा प्रिमियम भरण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. तुम्ही रेग्युलर म्हणजे मासिक, त्रैमासिक, अर्थवार्षिकही प्रिमियम भरू शकता. प्रत्येक कंपनीच्या योजनेनुसार यामध्ये बदल असू शकतो. युलिप योजनांची पॉलिसी टर्म सहसा 5 ते 30 वर्ष असू शकते.

युलिप योजनेचे फायदे काय? (Benefit of ULIP plan)

पॉलिसीधारकाचा मुदत कालावधीदरम्यान मृत्यू झाला तर ठराविक रक्कम नॉमिनीला मिळते. गुंतवणुकीचा परतावा जर वेळोवेळी घेतला असेल तर ती रक्कम वजा करून पैसे दिले जातात. मात्र, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला नाही तर प्रिमियम आणि त्यावरील परतावा मुदत संपल्यानंतर मिळतो. ही रक्कम एकाचवेळी काढता येते किंवा टप्प्याटप्प्यानेही काढता येते. या गुंतवणुकीवर करवजावटही मिळते. 

लॉकइन पिरिअड असतो का? (Lock in period of ULIP)

युलिप योजनांना लॉकइन परियड सहसा पाच वर्षांचा असतो. पॉलिसीनुसार हे बदलू शकते. जर तुम्ही पाच वर्षांच्या आत पॉलिसी बंद करत असाल तर तुम्हाला विविध शुल्क भरावे लागतील. पहिल्याच वर्षी पॉलिसी बंद करत असाल तर फंड व्हॅल्यू आणि प्रिमियमच्या काही प्रमाणात रक्कम वजा केली जाते. जशी वर्ष वाढत जातात तसे शुल्क कमी होत जाते. पाच वर्षानंतर पॉलिसी बंद करत असाल तर कोणतेही शुल्क लागू होत नाही. 

युलिप योजना चांगला पर्याय आहे का? (Is ULIP plan Better Option for Investment?)

गुंतवणूक आणि विमा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. म्हणजेच प्युअर टर्म इन्शुरन्स तुम्हाला खूप कमी किंमतीमध्ये मिळू शकतो. उदाहरणार्थ, 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स 25 वर्षाच्या व्यक्तीला वार्षिक दहा ते बारा हजार रुपये प्रिमियम भरून मिळू शकतो. मात्र, 10 लाख रुपयांच्या युलिप कव्हर प्लॅनचा प्रिमियम 50 हजार रुपयांपेक्षाही जास्त असू शकतो. त्यामुळे फक्त टर्म प्लॅन पॉलिसी काढून इतर पैसे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. इतर योजनांच्या तुलनेत युलिप योजनेत विविध प्रकारची शुल्क गुंतवणुकीतून कापून घेतली जातात. फंड स्विचिंग चार्ज, मॉरटॅलिटी चार्ज, फंड चार्ज, पॉलिसी बंद करण्यासाठीचे शुल्क असे विविध शुल्क लागू असतात. त्यामुळे या पॉलिसीत गुंतवणूक न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड, ULIP, SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)