Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बातम्या आणि शेअर मार्केटचा संबंध काय? त्याचा परिणाम कसा होतो?

News Impact on Share Market

News Impact on Share Market : शेअर मार्केटच्या खाली-वर होण्यामागे मागणी आणि पुरवठा हे एक कारण तर असतेच. पण महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास (Share Market Up-Down) जबाबदार असतात.

News Impact on Share Market : भाजी मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जाताना आपण कांद्याची किंमत कधी खूप जास्त असताना अनुभवतो तर कधी खूप कमी. जेव्हा घाऊक बाजारात (Wholesale Market) शेतकरी भरपूर कांदे घेऊन येतात तेव्हा संपूर्ण मार्केटमध्ये कांद्याचा पुरवठा जास्त होतो. ज्यामुळे शेतकरी आपल्याकडचा कांदा कमी किमतीत विकण्यासाठी मांडतात. तसेच जेव्हा घाऊक बाजारात कांदा कमी प्रमाणात येतो; तेव्हा त्याची मागणी वाढते व त्यामुळे घाऊक व्यापारी जास्त किमतीमध्ये कांदे विकत घेतात. 

कोणत्याही वस्तुच्या किमतीच्या वाढीमागे मागणी आणि किमतीच्या उतारामागे पुरवठा हे कारण असते. या घाऊक बाजाराच्याजागी आपलं शेअर मार्केट (Share Market), कांद्याच्या जागी कंपनीचे शेअर्स आणि घाऊक व्यापाऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहा. जेव्हा शेअर्सची मागणी वाढते, म्हणजेच लोक मोठ्या प्रमाणात शेअर्स घेऊ घेऊ लागतात. तेव्हा शेअर्सची किंमत वाढते. तसेच जेव्हा शेअर्सचा पुरवठा वाढतो म्हणजेच लोक मोठ्या प्रमाणात शेअर्स विकायला लागतात तेव्हा शेअर्सची किंमत कमी होते.

शेअर्सच्या हालचालींमागे हे एकच कारण असते असे नाही. महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास जबाबदार असतात. आजच्या या लेखात आपण बातम्या आणि मार्केट यांचा संबंध समजून घेणार आहोत.

बातमीचा मार्केटवर परिणाम कसा होतो?

समजा एखाद्या कंपनीने आपले तिमाही अहवाल जाहीर केले. तर ही एक चांगली बातमी आहे; पण या अहवालातील आकडे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले नसतील तर मार्केट या बातमीला वाईट समजते आणि त्यानुसार नकारात्मक प्रतिक्रिया देते. निराशजनक तिमाही अहवाल, कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटी, आर्थिक आणि राजकीय अनिश्चितता आणि दुर्दैवी घटना अशा नकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदारांवर विक्रीचा दबाव निर्माण होतो. ज्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर्स विकू लागतात. तर चांगले आणि सकारात्मक तिमाही अहवाल, नवीन उत्पादनाची घोषणा, कॉर्पोरेट संपादन आणि सकारात्मक आर्थिक निर्देश यांसारख्या सकारात्मक बातम्या गुंतवणूकदारांवर खरेदीचा दबाव निर्माण करतात. ज्यामुळे लोक शेअर्स खरेदी करू लागतात. 


व्यावसायिक गुंतवणूकदार त्यांचा भरपूर वेळ पुढील बातम्यांचा अंदाज लावण्यात खर्च करतात. ज्यामुळे ते बातमी प्रकाशित होण्याआधीच आपले व्यवहार करून घेतात. अशाप्रकारच्या अंदाजासाठी गुंतवणूकदार अनेक प्रकारच्या स्रोतांचा वापर करतात. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करण्याबरोबरच बातम्यांचा आढावा घेणं हे देखील तितकंच गरजेचे आहे. कारण त्याचा कळत-नकळत परिणाम मार्केटवर होत असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा कोणतीही बातमी टीव्ही, न्यूजपेपर किंवा वेबसाईटवरून पहाल, तेव्हा ती शेअर मार्केटवर कसा परिणाम करू शकते याचा विचार नक्की करून पहा.