Nobel Prize: जगातील सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्काराची गणना होते. या पुरस्कारासाठी जगातील कोणत्याही देशातून लोकांची निवड केली डाते. त्यामुळे याचे महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे.
नोबेल पुरस्काराप्रमाणेच त्याची निवड, त्याचा सोहळा आणि बक्षिस याचीही महती काही कमी नाही. नोबेल पुरस्कार हा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, मेडिकल किंवा बायोलॉजी आणि अर्थशास्त्र या 5 वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. स्वीडनमधील शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्युपत्रात (Will) नमूद केल्याप्रमाणे वरील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. नोबेल यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी म्हणजे 1901 पासून नोबेल पुरस्कार (Nobel Prize) देण्यास सुरूवात केली.
नोबेल पुरस्काराची रक्कम किती?
नोबेल पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला सन्मानपूर्वक सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्रक आणि 10 लाख युरो (8 कोटी 80 लाख भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाते. या रकमेत यावर्षी वाढ करण्यात आली आहे. स्वीडीश चलनाचा दर कमी झाल्याने नोबेल फाऊंडेशनने पुरस्काराच्या रकमेत यावर्षी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिला पुरस्कार कधी देण्यात आला
अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यूपत्रात नमूद केल्यानुसर 1895 मध्ये नोबेल पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. तर 1901 मध्ये 5 क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विल्हेल्म कॉनराड (भौतिकशास्त्र), जेकोबस हेन्रिकस व्हॉफ (रसायनशास्त्र), एमिल फॉन बेहरिंग (मेडिकल), सुली प्रुधोमे (साहित्य) आणि हेन्री ड्युनंट (शांतता) यांचा समावेश होता.
किती भारतीयांना नोबेल पुरस्कार प्राप्त
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतातील 13 जणांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. या 13 व्यक्तींमध्ये 5 प्रत्यक्ष भारतीय नागरिक आणि 8 भारतीय वंशाचे किंवा भारतात राहणारे आहेत. नोबेल पुरस्कार मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते. 1913 मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. तर सी. व्ही रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मदर तेरेसा (शांतता, 1979), अमर्त्य सेन (आर्थिक विज्ञान, 1998), कैलाश सत्यार्थी (शांतात, 2014) आणि राजेंद्र के पचौरी (शांतता, 2007) या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
भारतात जन्म झालेले अन इतर देशात राहणारे किंवा जन्म इतर देशात झालेले आणि भारतात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हरगोविंद खुराना (1968, अमेरिका), सुब्रह्मण्यन चंद्रशेखर (1983, अमेरिका), वेकटरामन रामकृष्णन (इंग्लंड, 2009), अभिजित बॅनर्जी (अमेरिका, 2019) तसेच रोनाल्ड रॉस (इंग्लंड, 1902), रुडयार्ड किपलिंग (इंग्लंड, 1907), 14 वे दलाई लामा (भारत, 1989).