कर्ज घेणे ही काही साधी प्रक्रिया नाही. ज्या कुठल्या बँकेकडे तुम्ही कर्ज घेण्यासाठी जाता ती बँक तुमच्याविषयी, तुमच्या कामाविषयी, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी सर्व काही जाणून घेत असते. तुम्हाला दिलेले कर्ज तुम्ही व्यवस्थित भरू शकता असा विश्वास जेव्हा बँकांना तुमच्यावर येतो तेव्हाच त्या तुम्हाला कर्ज देऊ करतात. तुमची क्रेडिट पात्रता (कर्ज घेण्याची पात्रता) निश्चित करण्यासाठी साजहिकच क्रेडिट तपासणी (Credit Inquiry) केली जाते. ही तपासणी मुख्यत्वे दोन पद्धतीने केली जाते, सॉफ्ट तपासणी (Soft Inquiry) आणि एक कठोर तपासणी (Hard Inquiry). आता या दोन पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणे देखील गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात या दोन क्रेडिट तपासणीमध्ये नेमका फरक काय असतो आणि त्याचा आपल्या कर्जावर.क्रेडिट स्कोअरवर आणि क्रेडिट इतिहासावर (Credit History) काय परिणाम होतो.
सॉफ्ट क्रेडिट तपासणी (Soft Credit Inquiry)
सॉफ्ट क्रेडिट तपासणीमध्ये तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेऊ इच्छिता ती बँक तुमच्याशी निगडीत काही गोष्टींची चौकशी करते जी तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करत नाही.
सॉफ्ट क्रेडिट तपासणीला, सॉफ्ट पुल (Soft Pull) असेही म्हणतात. या प्रकारच्या तपासणीत वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था/बँका/पतसंस्था तुमची क्रेडिट इतिहासाबद्दल मूलभूत माहिती मिळविण्यासाठी याआधी तुम्ही कुठले कर्ज घेतले होते का? ते वेळेत फेडले होते का? क्रेडिट कार्ड ऑफर कधी घेतली होती का? याची माहिती घेते. व्यक्ती स्वतःचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी सॉफ्ट इन्क्वायरी करू शकतात, ज्यामुळे आजवर आपण केलेले क्रेडीट व्यवहार आणि त्यासंबंधी इतर माहिती आपल्याला जाणून घेता येते.
सॉफ्ट क्रेडिट तपासणीची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:
- क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी पूर्व-मंजूरी ऑफर घेतली आहे का?
- तुम्हाला नियमित रोजगार आहे का?
- तुम्ही मागितलेले कर्ज आणि आणि तुमचा मासिक पगार याचा ताळमेळ लागतो का?
- तुम्ही याआधी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज घेतले होते का?
या सगळ्या प्रश्नांची चौकशी वित्त पुरवठा करणारी संस्था अर्जदाराला करते, ज्यातून सदर व्यक्ती कर्जास पात्र आहे किंवा नाही याची कल्पना त्यांना येते.या चौकशीने किंवा तपासणीने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काहीही परिणाम होत नाही.
हार्ड क्रेडिट तपासणी (Hard Credit Inquiry)
हार्ड क्रेडिट तपासणी, ज्याला हार्ड पुल (Hard Pull) किंवा हार्ड क्रेडिट चेक (Hard Credit Check) देखील म्हणतात.कर्जाची मागणी करणाऱ्या अर्जदाराची ही एक व्यापक स्वरूपाची तपासणी असते जी तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकते. हार्ड क्रेडिट तपासणीत कर्जदाराने गहाण ठेवलेली संपत्ती (घर, जमीन, सोने इत्यादी), गृहकर्ज किंवा वाहन कर्ज आणि त्याचे हप्ते भरण्याची तुमची आर्थिक शिस्त तपासली जाते. या प्रकारच्या तपासणीत तुम्हाला वित्त पुरवठा करणारी कंपनी तुमचा आजवरचा सविस्तर क्रेडिट इतिहास तपासते.
यात जर काही अनियमितपणा जाणवल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. या तपासणीनंतर पुढील 12 महिने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम कायम राहू शकतो.
गहाण, कार कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यांसारख्या क्रेडिटसाठी अर्जाचा भाग म्हणून सावकार किंवा धनको तुमचा क्रेडिट इतिहास तपासतो तेव्हा कठोर चौकशी होते. प्रत्येक कठोर चौकशी तुमचा क्रेडिट स्कोअर काही गुणांनी कमी करू शकते, जरी प्रभाव सामान्यतः तात्पुरता असतो आणि सामान्यतः 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. प्रत्येक हार्ड क्रेडिट तपासणी तुमचा क्रेडिट स्कोअर काही गुणांनी कमी करू शकते, म्हणूनच गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करू शकणार्या अनावश्यक हार्ड क्रेडिट तपासणी टाळणे गरजेचे आहे.