• 03 Oct, 2022 23:27

शेअर मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय?

Share Market Manipulation

Stock Market manipulation : स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो.

स्टॉक मार्केटमध्ये नक्की होतं काय? आपण शेअर्स विकत घेतो आणि ते जास्त किमतीत विकतो. पण खरंच स्टॉक मार्केट एवढं सोप्पं आहे का? आतापर्यंत कितीतरी रुपयांचे घोटाळे आपण शेअर मार्केटमध्ये झालेले ऐकले आहेत. 1992चा हर्षद मेहता घोटाळा, केतन पारेख घोटाळा, सत्यम घोटाळा असे कितीतरी घोटाळे होताना आपण पहिले आहेत. जर स्टॉक मार्केटमध्ये फक्त स्टॉकची खरेदी आणि विक्री होत असेल तर हे घोटाळे होतात तरी कसे? या सर्व घोटाळ्यांमागे असलेले मुख्य कारण म्हणजे मार्केटमधील ‘लूपहोल्स’ (Loopholes). लूपहोल म्हणजे एका प्रणालीमधील अपुरेपणा. असाच एक लूपहोल म्हणजे स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन (Stock Market manipulation). आज आपण स्टॉक मार्केटमधील मॅनिप्युलेशन (हातचलाखी) काय आहे हे जाणून घेणार आहोत.


शेअर मार्केटमध्ये असे अनेक मोठे गुंतवणूकदार व कंपन्या असतात ज्या शेअर मार्केट मॅनिप्युलेट करू शकतात. असे गुंतवणूकदार साध्या गुंतवणूकदारांना फसवून त्यांच्या गुंतवणुकीचा वापर स्टॉकची किंमत वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरतात. यालाच स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन, असं म्हटलं जाते. एक गुंतवणूकदार म्हणून मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय? व ते कसं होतं? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

मॅनिप्युलेशन म्हणजे काय? What is Manipulation?

स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणला जातो. हा बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो. ज्यामुळे शेअर किंवा कंपनी गुंतवणूक करण्यासाठी अगदी उत्तम आहे, असं भासवलं जातं. त्यानंतर जेव्हा सर्व गुंतवणूकदार आपले पैसे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा हे फसवणूक करणारे गुंतवणूकदार त्या शेअर्सची विक्री करून मोठा नफा मिळवतात. शेअर मार्केटमध्ये शेअर्सच्या किमतीवर असे अनेक घटक परिणाम करत असतात. अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करणं सेबीसारख्या (SEBI) बाजार नियामक संस्थांनाही काही वेळेस अवघड जातं. पण सेबी अशा प्रकारांवर लक्ष ठेवून असते.

मार्केट मॅनिप्युलेशन होते कसे?

मॅनिप्युलेट करणारे गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी ते शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. इतर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी ते शेअर्सचा व्हॉल्युम वाढवण्याचा प्रयत्न करतात. ज्यासाठी ते वेगवेगळ्या ब्रोकर्सकडून त्याच शेअर्सची समान प्रमाणात खरेदी-विक्री करतात. तसेच त्याच प्रमाणात निर्माण होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या ऑर्डर्स एकमेकांमध्ये कॅन्सल करतात. यामुळे शेअर्सचा व्हॉल्युम वाढतो. शेअर मार्केटची कमी माहिती असणारे गुंतवणूकदार अशाप्रकारे वाढलेल्या व्हॉल्युमला एक चांगला संकेत मानून त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. ज्यामुळे शेअर्सची मागणी आणखी वाढते. मागणी वाढत असल्यामुळे शेअर्सच्या किमतीही वाढतात. नेमक्या त्याचवेळी फसवणूक करणारे गुंतवणूकदार वाढलेल्या किमतीचा फायदा घेत आपल्याकडचे सर्व शेअर्स विकतात. ज्यामुळे पुन्हा शेअर्सची किंमत कमी होते. परिणामी, कंपनीचा नुसता वाढता व्हॉल्युम पाहून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मात्र मोठा तोटा होतो. 

स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन हा एक गुन्हा आहे; आणि तो करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते. मार्केटमध्ये होणारे मॅनिप्युलेशन ओळखणं कठीण असते. म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. मार्केटचा आणि कंपन्यांचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश करावा. ज्यामुळे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांमध्ये आपल्या कष्टाची कमाई दुसऱ्याच्या खिशात जाणार नाही.