शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आपल्यापैकी अनेकांनी प्रायमरी आणि सेकंडरी असे शब्द ऐकले असतील. मात्र, अनेकांना याचा नेमका अर्थ माहिती नाहीये. वास्तविक, शेअर बाजाराचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरे म्हणजे सेकंडरी मार्केट. आज आपण सेकंडरी मार्केटबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
Table of contents [Show]
- सेकंडरी मार्केट म्हणजे काय? What is Secondary Market?
- सेकंडरी मार्केटचे प्रकार Types of Secondary Market
- प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमधील फरक (Difference between Primary & Secondary Market)
- प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये कोण व्यवहार करतो?
- सेकंडरी मार्केटची वैशिष्ट्ये (Characteristics of the secondary market)
सेकंडरी मार्केट म्हणजे काय? What is Secondary Market?
सेकंडरी मार्केट हे असे आहे जेथे गुंतवणूकदार त्यांच्या मालकीच्या सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करतात. बहुतेक लोक याला 'स्टॉक मार्केट' असे मानतात. मात्र, स्टॉकची विक्री प्रायमरी मार्केटमध्येदेखील केली जाते जेथे सर्वप्रथम ते इश्यू केले जातात. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) आणि NASDAQ सारखी राष्ट्रीय एक्सचेंज ही सेकंडरी मार्केट आहेत.
सेकंडरी मार्केट हे असे ठिकाण आहे, जिथे कंपन्यांच्या सिक्युरिटीज प्रायमरी मार्केटमध्ये जनतेसमोर आणल्यानंतर व्यवहार केले जातात. सिक्युरिटीजची म्हणजेच शेअरची किंमत कधीच स्थिर नसते ती नेहमी खाली-वर होत असते. सेकंडरी मार्केट हे सामान्यतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) सारखे शेअर बाजार आहेत.
सेकंडरी मार्केटचे प्रकार Types of Secondary Market
सेकंडरी मार्केटचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, एक स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा ओव्हर-द-काउंटर मार्केट.
स्टॉक एक्स्चेंज (Stock Exchange)
स्टॉक एक्स्चेंज हे केंद्रीयकृत प्लॅटफॉर्म आहे. जेथे सिक्युरिटीजचा व्यापार केला जातो. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात कोणताही संपर्क होत नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ही अशा प्लॅटफॉर्मची उदाहरणे आहेत. स्टॉक एक्स्चेंजमधील व्यवहार कठोर नियमांच्या अधीन असतात. स्टॉक एक्सचेंज स्वतः हमीदार म्हणून काम करत असते.
ओव्हर द काउंटर मार्केट (Over the Counter-OTC)
ओव्हर-द-काउंटर मार्केट डिसेंट्रलाइज्ड असतात. ज्यामध्ये सभासद आपापसात व्यापार करण्यासाठी जोडलेले असतात. व्यवहार करताना OTC मार्केट सहभागी सभासदांमधील फसवणुकीचा धोका कमी करण्याचे काम करते. परकीय चलन बाजार (फॉरेक्स) हे ओव्हर-द-काउंटर मार्केटचे उदाहरण आहे. ओटीसी मार्केटमध्ये हाय व्हॉल्यूम मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यामुळे सिक्युरिटीजची किंमत विक्रेत्यापासून विक्रेत्यापर्यंत बदलते. स्टॉक एक्स्चेंज आणि ओटीसी मार्केट व्यतिरिक्त, इतर प्रकारच्या सेकंडरी मार्केटमध्ये ऑक्शन मार्केट आणि डीलर मार्केटचा समावेश होतो. डीलर मार्केट हा सेकंडरी मार्केटचा दुसरा प्रकार आहे. ज्यामध्ये भिन्न डीलर्स व्यवहारांसाठी विशिष्ट सिक्युरिटीजच्या किमती दर्शवतात. परकीय चलन व्यापार आणि रोख व्यापार प्रामुख्याने डीलर मार्केटमध्ये केला जातो.
प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमधील फरक (Difference between Primary & Secondary Market)
प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हे दोन्ही एकमेकांपासून खूप भिन्न आहेत. प्रायमरी मार्केटमध्ये नवीन शेअर आल्यास खेरदीदार तो थेट कंपनीकडून सिक्युरिटीजच्या माध्यमातून खरेदी करू शकतो. मात्र, सेकंडरी मार्केटमध्ये असे होत नाही. येथे शेअर्सची खरेदी आणि विक्री स्टॉक एक्सचेंजद्वारे गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. एवढेच नव्हे तर, सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स जारी करणाऱ्या कंपनीची कोणतीही भूमिका नाही. जेव्हा कंपनीने थेट गुंतवणूकदारांना वाटप केलेले शेअर्स शेअर बाजारात खरेदी-विक्रीसाठी सूचीबद्ध करते तेव्हा प्रायमरी मार्केट हे सेकंडरी मार्केटमध्ये बदलले जाते.
प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये कोण व्यवहार करतो?
प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमधील गुंतवणूकदार एकमेकांपासून भिन्न असतात. कारण त्यांच्या अपेक्षा आणि उद्दिष्टे ही भिन्न असतात. सेकंडरी मार्केटमधील गुंतवणूकदार सिक्युरिटीज प्राइमरी मार्केटमध्ये सिक्युरिटी धारकांनी विकल्यानंतरच खरेदी करू शकतात. तर, प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा लिस्टिंग नफ्यासाठी IPO साठी अर्ज करून गुंतवणूक करू शकतात. सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांमध्ये व्यापारी आणि अल्प/दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा समावेश होतो.
सेकंडरी मार्केटची वैशिष्ट्ये (Characteristics of the secondary market)
सेकंडरी मार्केटमधेय मोठ्या संख्येने खरेदीदार असल्याने एखाद्याला लिक्विड कॅशची गरज भासल्यास गुंतवणूकदार सहजपणे त्यांचे शेअर्स विकू शकतात. सेकंडरी शेअर मार्केटच्या कठोर नियमांमुळे गुंतवणूकदारांचे फंड तुलनेने सुरक्षित असतात. गुंतवणूकदारांचे पैसे सिक्योरिटीजच्या स्वरूपात असल्याने बचत करणे सोपे होते.