Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI's Transit Card: मेट्रो ते बस... आता प्रवास होणार कॅशलेस, SBI चे ‘हे’ कार्ड सार्वजनिक वाहतुकीत करणार मोठे बदल

SBI Nation First Transit Card

Image Source : https://www.freepik.com/

एसबीआयने Nation First Transit Card बाजारात आणले आहे. या कार्डच्या मदतीने सार्वजनिक वाहतुकीतून कॅशलेस प्रवास करण्यास मदत होईल.

भारतात गेल्याकाही वर्षात डिजिटायझेशनचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन व स्वस्तात उपलब्ध असलेले इंटरनेट यामुळे डिजिटल माध्यमातून प्रत्येक व्यवहार केला जात आहे. खासकरून, रोख रक्कमेचे व्यवहार कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचेच उदाहरण आता सार्वजनिक वाहतुकीत देखील पाहायला मिळत असून, देशातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या एसबीआयने खास Nation First Transit Card बाजारात आणले आहे. हे कार्ड नक्की काय आहे? याचा प्रवास करताना कशाप्रकारे वापर करू शकता? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

SBI's Transit Card नक्की काय आहे?

एसबीआयने काही दिवसांपूर्वीच Nation First Transit Card लाँच केले आहे. या कार्डचा वापर तुम्ही रेल्वे, मेट्रो, बस सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना करू शकता. या कार्डमुळे तुम्हाला प्रवास करताना डिजिटल तिकीट काढण्यास मदत मिळेल. थोडक्यात, रोख रक्कमऐवजी कार्डचा वापर करून अवघ्या काही सेकंदात तिकीट काढता येईल. नेशन फर्स्ट ट्रांझिस्ट कार्ड हे RuPay आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या तंत्रज्ञानावर काम करते.

SBI's Transit Card तुम्हाला कसे मिळेल?

एनसीएमसी प्रोग्राम अंतर्गत एसबीआयने याआधीही अनेक मेट्रो स्टेशनसाठी ट्रांझिस्ट कार्ड जारी केले आहेत. एसबीआय नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो नोएडा मेट्रो, चेन्नई मेट्रो आणि कानपूर मेट्रोसाठी ट्रांझिस्ट कार्ड जारी करते. आता बँकेने Nation First Transit Card लाँच केले असून, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने या कार्डसाठी अर्ज करू शकता.

ऑफलाइन पद्धतीने कार्डसाठी अर्ज करण्यासाठी जवळील एसबीआयच्या शाखेत जावे लागेल. तेथे अर्ज, आवश्यक कागदपत्रे व शुल्क दिल्यानंतर त्वरित कार्ड मिळेल. तसेच, ऑनलाइन पद्धतीने देखील लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्ही https://transit.sbi/ या वेबसाइटला भेट देऊ शकता. यासंदर्भातील माहितीसाठी 18001234,18002100,1800112211, 18004253800 या टॉल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

SBIच्या या कार्डमुळे सार्वजनिक वाहतूक होणार कॅशलेस

एसबीआयच्या Nation First Transit Card मुळे भारतातील सार्वजनिक वाहतुकीत आमुलाग्र बदल होऊ शकतो. या कार्डद्वारे बस, पार्किंग, मेट्रो सारख्या ठिकाणी डिजिटल तिकीटासाठी पेमेंट करता येईल. 

  • तुम्ही या कार्डचा वापर करून मेट्रोमध्ये कॅशलेस प्रवास करू शकता.
  • कार्डचा वापर करून मेट्रो प्रवासासाठीचे तिकीट व स्टोर पास खरेदी करू शकता.
  • एकाच कार्डद्वारे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येईल.
  • या कार्डद्वारे अगदी सुरक्षितपणे व्यवहार करता येईल.
  • तसेच, अवघ्या काही सेकंदात (Tap-and-Pay) व्यवहार पूर्ण करता येईल.

थोडक्यात, एसबीआयच्या या कार्डमुळे आता तिकीटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. यामुळे अगदी सहज एकाच कार्डने सार्वजनिक वाहतुकीसाठी तिकीट काढण्याची सुविधा मिळते.