कमी किमतीच्या शेअरची निश्चित अशी परिभाषा नाही. मात्र एखाद्या शेअरचा भाव जर 10 ते 50 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला पेनी स्टॉक (Penny Stocks) किंवा स्वस्त शेअर असे म्हटले जाते. पश्चिमेकडील देशांत 1 डॉलरपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सना पेनी स्टॉक म्हटले जाते.
हल्ली यूट्युबवर किंवा विविध संकेतस्थळांवर पेनी स्टॉक खरेदी करण्याविषयी आवाहन करणारे व्हिडिओज व माहिती मुबलक उपलब्ध आहे. याकडे सामान्य गुंतवणूकदार चटकन आकर्षितही होतात. याचे कारण त्यांचा अत्यल्प असलेला भाव. एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव पाच रुपये असेल आणि आपल्याकडे 1 हजार रुपये असतील तर त्या कंपनीचे 200 शेअर खरेदी करु शकतो. याउलट रिलायन्स, एमआरएफ, हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा एक समभाग 2000 रुपयांच्या पुढे मिळतो. साहजिकच गुंतवणूकदार 200 शेअर्स या संख्येला भुलून पेनी स्टॉकची खरेदी करतात.
वडापावपेक्षा कमी किंमतीत मिळणारे शेअर कालांतराने बंपर कमाई देऊ शकतात, हे वास्तव आहे; परंतु त्याची हमी नसते. त्यामुळे पेनी स्टॉकमध्ये झटपट फायदा मिळेल, या आशेने गुंतवणूक किंवा ट्रेड करु नये. सदर कंपनीची माहिती घेऊनच आणि खातरजमा करुनच शेअर खरेदीचा निर्णय घ्यावा.
पेनी स्टॉक्सची किंमत खूपच कमी असल्यामुळे त्यात मॅन्यूपुलेशनला वाव असतो. बाजारातील काही दलाल या कमी किमतीच्या मोहाने धावणार्या गुंतवणूकदारांना चकवा देऊ शकतात. एखाद्या पेनी स्टॉकची किंमत आज एक रुपये असेल आणि त्यास दोन रुपयांवर नेल्यास गुंतवणूकदारांना निश्चितच शंभर टक्के परतावा मिळतो. या आधारावर एखादा पाच रुपयाचा शेअर वर्षभरात पन्नास रुपयांपर्यंत पोचत असेल तर त्याने एका वर्षात दहापट परतावा दिला, असे गृहित धरले जाते. अशा स्थितीत रिलायन्स किंवा टीसीएससारख्या कंपनीकडून पाच वर्षात तरी एवढा परतावा मिळेल, याची खात्री देता येत नाही. पेनी स्टॉकचे हे वैशिष्ट्ये आहेच; मात्र एखादा पेनी स्टॉक एका वर्षात दहा पट खालीही घसरु शकतो.
पेनी स्टॉक खरेदी करताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे
- सर्वप्रथम सदर शेअर हा पेनी स्टॉक कशामुळे झाला आहे, याची माहिती घ्या.
- संबंधित कंपनीचे भविष्य आणि व्यवस्थापनाचे आकलन करा.
- याखेरीज स्टॉकची किंमत कमी ठेवण्याचे कारण काय, हेही समजून घेतले पाहिजे. स्टॉकच्या कंपनीत प्रोमोटरचा वाटा किती आहे, हे पाहवे.
- गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित कंपनीवर किती कर्ज आहे, त्याची परतफेड करण्यासाठी कंपनी कितपत सक्षम आहे, हे जाणून घ्यावे.
- जर कंपनी अनेक अंशदानावर काम करत असेल तर व्यवस्थापनात अडचणी येऊ शकतात हे लक्षात घ्यावे.
थोडक्यात पेनी स्टॉकमध्ये झटपट फायदा मिळवण्यासाठी किंवा लालसेपोटी पैसा टाकू नये. संपूर्ण तपासणीअंतीच गुंतवणूकीचा निर्णय घ्यायला हवा. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची गुणवत्ता ही कोणत्याही कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आधार असते. काही पेनी स्टॉक्सवर फसवणुकीचे आरोप केलेले असतात. त्यांचे व्यवस्थापन पारदर्शी नसल्याचे सांगितले जाते. ते आपल्या गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती देत नाहीत, असेही म्हटले जाते. म्हणूनच ठोक किंवा किरकोळ गुंतवणूकदारांनी कोणतेही पेनी स्टॉक खरेदी करताना या गोष्टीचा विचार करायला हवा.