जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये NAV काय आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंडमधील एनएव्हीच्या मदतीने तुम्ही तुमचा नफा व तोटा सहज समजून घेऊ शकता. NAV काय आहे? आणि म्युच्युअल फंडमध्ये एनएव्हीचं महत्त्व काय आहे; हे आपण समजून घेणार आहोत.
एनएव्ही किंवा नेट अॅसेट व्हॅल्यू (Net Asset Value-NAV) ही म्युच्युअल फंड योजनेतील युनिटची किंमत आहे.
- म्युच्युअल फंडची खरेदी किंवा विक्री ही एनएव्हीच्या आधारे केली जाते.
- म्युच्युअल फंडमधील एनएव्हीची किंमत दररोज बदलते.
- एनएव्हीची किंमत शेअर मार्केट बंद झाल्यावर संबंधित म्युच्युअल फंड हाऊस जाहीर करतात.
- म्युच्युअल फंड योजनेच्या व्यवस्थापनावरील खर्च म्हणजेच टोटल एक्सपेन्स रेशो (Total Expense Ration-TER) वजा करून त्या फंडची एनएव्ही ठरवली जाते.
आता आपण एनएव्ही म्हणजे काय? हे पाहिलं. पुढे आपण एका उदाहरणांमधून एनएव्ही कशाप्रकारे मोजला जातो हे समजून घेणार आहोत.
म्युच्युअल फंड कंपन्या (AMC) न्यू फंड ऑफरिंगद्वारे (NFO) मार्केटमध्ये नवीन योजना आणतात. त्या एनएफओ योजनेतील प्रत्येक युनिट्सची किंमत 10 रुपये आहे, असे आपण समजू. आता या योजनेत वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून सुमारे 1,000 कोटी रुपये जमा झाले. आता गुंतवणूकदारांसाठी एनएफओची किंमत 10 रुपये निश्चित केल्यामुळे, म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्याकडे जमा झालेल्या एकूण रकमेच्या आधारे गुंतवणूकदारांना युनिट्सचे वाटप करते. या उदाहरणात, एनएफओमध्ये रु. 1,000 कोटी जमा केले जातात आणि एनएव्ही रु 10 आहे. इथे आपण उदाहरण म्हणून पाहतोय की, एएमसीकडे 100 कोटी युनिट्स जमा झाले. आता या युनिट्समधून कंपनी गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या आधारे युनिट्सचे वाटप करते. जर तुम्ही या NFO मध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10,000 युनिट्सचे वाटप केले जाईल. तर अशाप्रकारे एनएव्ही मोजला जातो.
एनएव्हीमध्ये वाढ किंवा घट कशी होते?
एनएफओमध्ये जमा केलेली 1 हजार कोटी रुपयांची रक्कम त्या योजनेच्या उद्दिष्टानुसार गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये गुंतवली जाते. गुंतवणूक केलेल्या उत्पादनांची किंमत मार्केटनुसार दररोज बदलत असते. त्यानुसार एएमसीतील गुंतवणुकीचे मूल्य 1 हजार कोटीवरून 1020 कोटीपर्यंत वाढले, असे आपण समजू. तर त्या फंडची एनएव्ही 10.2 रुपये होणार. म्हणजेच तुमची त्या NFO मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक होती, ती आता 1,02,000 (10,000 युनिट x रु 10.20 NAV) झाली.
त्यामुळे NAV म्हणजे काय?त्याचे सध्याचे मूल्य काय आहे? हे माहित असणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळी या एनएव्हीबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो. त्यांचा असा समज असतो की, ज्या फंडाचे एनएव्ही जास्त आहेत, त्या फंडाची कामगिरी चांगली असते; पण ते तसे नसते. म्हणून आपली म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरावी यासाठी म्युच्युअल फंडाशी संबंधित गोष्टींची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.