Multiple Savings Account: पैसे बॅंकेत ठेवायचे म्हटल्यावर, जास्तीतजास्त लोक सेव्हिंग्ज अकाउंटचा म्हणजेच बचत खात्याचा पर्याय निवडतात. कारण, महत्वांच्या गरजांसाठी हे खाते खूप उपयोगी पडते. केव्हाही आपण या खात्यातून पैसे सहज काढू शकतो. मग तुम्ही म्हणाल मल्टिपल खात्याचा काय वापर? तेही बरोबर आहे. पण, तुम्ही जर मल्टिपल खात्याचा वापर ध्येय ठेवून केल्यास, तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही जास्त बचत करून त्यावर चांगले व्याज मिळवू शकता. तसेच, तुमचे महत्वाचे फायनान्शिअल ध्येय सहज पूर्ण करू शकता. यामुळे तुम्ही मल्टिपल खाते उघडायचे ठरवत असल्यास, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही 3 खाते सहज उघडू शकता. ते मॅनेज करायला ही तुम्हाला अवघड जाणार नाहीत.
Table of contents [Show]
मुख्य खाते (Main Account)
तुमचे एक मुख्य खाते असणे आवश्यक आहे. यामधून तुम्ही तुम्हाला रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे काढू शकता. तसेच, हे खाते तुमच्या EMI पेमेंट्स, घरभाडे, म्युच्युअल फंड आणि इतर ज्या गोष्टी ऑटोमेटेड आहे त्याच्याशी लिंक असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाचा अंदाजा लागेल. त्यानुसार प्रत्येक महिन्याला लागणारा खर्च तुम्ही या खात्यात ठेवू शकता.
सॅलरी खाते (Salary Account)
तुम्हाला महिन्याची सॅलरी मिळत असल्यास, त्यासाठी तुमचे वेगळे खाते असणे आवश्यक आहे. हे खाते तात्पुरते असले तरी चालते, जेव्हा तुम्ही नोकरी सोडाल तेव्हा ते बंद ही करता येते. त्यामुळे या खात्यातून तुम्ही तुमच्या मुख्य खात्यात जेवढे गरजेचे आहे तेवढे पैसे ट्रान्सफर करू शकता. असे केल्याने बाकीचे पैसे तुमच्या खात्यात सेव्ह राहू शकतात. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
संयुक्त खाते (Joint Account)
वरील खात्यात तुम्ही अजून एक भर करू शकता. ते म्हणजे संयुक्त खाते, यात तुम्ही इमर्जन्सी, मुलांचे शिक्षण आणि फिरायला जाण्यासाठी पैसे साठवून ठेवू शकता. ते तुम्ही तुमच्या पत्नी किंवा मुलांसह उघडू शकता. यामुळे महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी लागणारा पैसा तुम्ही या खात्यातून सहज काढू शकता.
इमर्जन्सीत राहणार नाही टेन्शन
कमीतकमी हे तीन खाते जरी तुम्ही उघडलेत तर तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. कारण, या खात्यावरून तुम्हाला व्याज मिळणार आहे. तसेच, इमर्जन्सीत मुख्य खात्याच्या डेबिट कार्डची लिमिट संपली तर तुम्हाला इतर खात्यांचा वापर करता येईल. त्यामुळे तुम्हाला अशावेळी पैसे जमा करण्याचा ताण राहणार नाही. त्याचबरोबर तुमच्या ध्येयानुसार तुम्ही पैसे जमा करू शकता. गोष्टी वेगवेगळ्या केलेल्या असल्यामुळे त्यांच्यावर ट्रॅक ठेवायला तुम्हाला सोपे जावू शकते आणि ठरवलेले ध्येय तुम्ही सहज गाठू शकता.
'या' गोष्टींवर हवे लक्ष!
आता मल्टीपल खाते महटल्यावर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. जसे की, बॅंक मिनिमम बॅलन्स व मेंटेनन्सवर किती चार्ज आकारते. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ते नसल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. कारण, बॅलन्स कमी झाल्यास तुम्हाला त्यासाठी चार्ज द्यावा लागू शकतो. त्याचबरोबर जी बॅंक सेव्हिंगज खात्यावर जास्त व्याज देते अशाच बॅंकेची निवड करा. तेव्हाच मल्टीपल खाते उघडण्याचा तुम्हाला अधिक फायदा होवू शकतो.