Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Minimum Support Price: एमएसपी म्हणजे काय? एमएसपीची किंमत कशी ठरवली जाते?

msp government

उत्तम पीक येऊनही बाजारात भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण व्हावे यासाठी सरकार वेळोवेळी पिकांवर किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price - MSP) जाहीर करत असतं.

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. शेती उत्तम होण्यासाठी शेतकऱ्याला बी-बियाणे , शेतीची अवजारे, खत यावर खर्च करावा लागतो. पण शेतात उत्तम पीक घेऊनही बाजारात आपल्या शेतमालाला किती भाव मिळेल हे सांगता येत नाही. बाजारभाव चांगला नाही मिळाला तर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकाला/धान्याला किमान आधारभूत किंमत/ एमएसपी (Minimum Support Price MSP) जाहीर करतं. 


एमएसपी म्हणजे काय?

एमएसपी म्हणजे (Minimum Support Price MSP ) मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि यालाच बोलीभाषेत हमीभाव म्हणतात. सरकार एमएसपी (MSP) जाहीर करतं, म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदीसाठी ठराविक रक्कम जाहीर करतं. जर शेतकऱ्याचा शेतमाल बाजारात योग्य किमतीला विकला गेला नाही तर सरकार तो शेतमाल सरकारी खरेदी केंद्रामार्फत खरेदी करतं.  या केंद्रावर सरकारने जाहीर केलेल्या एमएसपीनुसार (MSP) शेतमाल खरेदी केला जातो. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळते.  

एमएसपी कोण ठरवतं?

शेतमालाला दिला जाणारा एमएसपी (MSP) हे कमिशन फॉर अग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस (Commission for Agricultural Cost and Prizes CACP) च्या आकडेवारीवरुन भारत सरकारचे कृषी मंत्रालय ठरवतं. संपूर्ण देशात सरकारने जाहीर केलेला एमएसपी (MSP) हा एकसमान असतो. महाराष्ट्रात ज्या किमतीत शेतमाल खरेदी केला जातो तसेच इतर राज्यातही त्याची किंमत सारखीच असते. शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल पिकवण्यासाठी किती खर्च येत असेल यावरून ही एमएसपी (MSP) ठरते.  

एमएसपी कसा ठरवतात?

उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत. उत्पादन खर्च ठरविण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने काही सूत्रं निश्चित केली आहेत.

  •  ए-2 हे पहिले सूत्र आहे. ए-2 या सूत्रानुसार बियाणे, खत, रासायनिक औषध, मजूर सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो. 
  •  ए- 2+एफ एल (फॅमिली लेबर) या सूत्रात शेतकरी आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते. 
  • सी-2. अर्थात कॉम्प्रेंसिव्ह (comprehensive) म्हणजेच व्यापक या सूत्रानुसार बियाणे,खते,रासायनिक औषध, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंब याची यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचे भाडं निश्चित करून त्याआधारे उत्पादनखर्च ठरविला जातो. हे ठरवताना सी-2 चा आधार घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव मिळतो. 
  • आपल्या देशामध्ये केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर करत ते ए-2+एफएल (FL)  या सूत्रानुसार दिला जातो.

शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेल्या एमएसपीमुळे आपल्या शेतात आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळते. कारण शेतकऱ्यांना खात्री असते की आपल्या शेतमालाला चांगला भाव नक्की मिळेल.