स्थावर मालमत्तेमधील गुंतवणुकीला भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. फ्लॅट, बंगलो, जमीन, व्यावसायिक प्रॉपर्टी खरेदीसाठी नागरिक उत्सुक असतात. मात्र, रिअल इस्टेट प्रॉपर्टी सांभाळणे हे मोठे जिकिरीचे झाले आहे. तसेच तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर मालमत्ता तत्काळ विकताही येत नाही. कारण बाजारात चांगला भाव मिळत नाही. आता रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा एक नवा पर्याय गुंतवणुकदारांसाठी आला आहे. Fractional Investment असे या गुंतवणुकीचे नाव असून याबद्दल जाणून घेवूया.
Fractional Investment म्हणजे काय?
मोठमोठ्या व्यावसायिक इमारती, कॉम्पलेक्स, मॉल, आयटी पार्क, बिझनेस पार्क, डेटा सेंटर्स तुम्ही मार्केटमध्ये पाहिलेच असतील. अशा मालमत्तेत सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करता येत नाही. मात्र, Fractional Investment ने ही सुविधा गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली आहे. या मोठ्या A Grade प्रॉपर्टीचे तुम्ही भागधारक होऊ शकता. त्यास Fractional Investment असे म्हणतात. यातील तुमचा समभाग तुम्ही कधीही विकू शकता. तसेच तुम्हाला मालमत्तेचे कागदपत्रे, दुरूस्ती, देखभाल काहीही पाहण्याची गरज नाही.
Fractional Investment कशी करू शकता?
जशी म्युच्युअल फंडची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी असते त्याचप्रमाणे Fractional Investment व्यवस्थापनासाठी कंपनी असते. त्यांना Fractional Investment प्लॅटफॉर्म असेही म्हटले जाते. Strata, hBits यासह अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत. ज्याद्वारे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. या कंपनीद्वारे सर्व मॉल, बिझनेस पार्क, कॉम्पलेक्स अशा प्रॉपर्टी मॅनेज केल्या जातात. गुंतवणूकदाराला काहीही करण्याची गरज नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदार एकत्र येऊन त्यांच्या पैशाने ही कंपनी चालते.
किती रुपये गुंतवणूक करू शकता?
फ्रॅक्शनल इन्व्हेस्टमेंटमध्ये 10 लाख रुपयांपासून पुढे गुंतवणूक करता येऊ शकते. तसेच A ग्रेड प्रॉपर्टीमध्ये 25 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.
किती परतावा मिळू शकतो?
भाड्याच्या स्वरुपात 8 ते 10% परतावा मिळू शकतो. तसेच दरवर्षी मालमत्तेचे मूल्य 5-10 टक्क्यांनी वाढू शकते. तसेच दर तीन वर्षांनी 15% भाडेवाढ मिळू शकते. हा सर्व परतावा गुंतवणूकदाराला मिळेल.
उदाहरणार्थ, तुम्ही 25 लाख रुपयांची Fractional Investment मालमत्तेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 2 लाख रुपये वार्षिक भाड्यातून परतावा मिळू शकतो. तसेच मालमत्तेचे मूल्य दरवर्षी 1.25 लाखांनी वाढू शकते.
तुम्ही कधीही यातून बाहेर पडू शकता. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता येण्यास Fractional Investment मुळे मदत होत आहे. सर्वसामान्य नागरिकही मोठ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणुकीवर शुल्क लागू आहे का?
Fractional Investment कंपनीकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्यवस्थापन शुल्क लागू केले जाते. हे शुल्क एकूण गुंतवणुकीच्या 1% किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकते. तसेच गुंतवणूक काढून घेताना 8% पेक्षा जास्त वार्षिक परताव्याचा दर मिळत असेल तर 10% परफॉर्मन्स शुल्क आकारले जाते.
सध्या Fractional Investment कंपन्या बाल्यावस्थेत असून येत्या काळात मोठी वाढ अपेक्षित आहे. अनिवासी भारतीय (NRI) सुद्धा या पर्यायामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. चांगला परतावा आणि कधीही गुंतवणूक काढून घेता येत असल्याने येत्या काळात या पर्यायातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.