MJPJAY: राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना माफक दरात आरोग्य उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली. महाराष्ट्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत किंवा माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवली जाते. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती. 2020 पासून या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना असे करण्यात आले. ही योजना सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारने 14 डिसेंबर, 2020 रोजी शासन निर्णय काढून जुन्या राजीव गांधी जीवनदायी योजने (Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana) काही बदल करून ही योजना नवीन नावाने सुरू केली. सध्या या योजनेद्वारे राज्यातील 2.22 कोटी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 प्रकारचे उपचार केले जातात. त्यातील 131 प्रकारचे उपचार हे फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये केले जातात. याची सविस्तर माहिती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या संकेतस्थळावर देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 28 जून, 2023 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवरील खर्चाची मर्यादा 1.50 लाखावरून 5 लाख रुपये केली आहे. तसेच ही योजना यापूर्वी फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी उपलब्ध होती. पण आता ती राज्यातील 12 कोटी नागरिकांना लागू करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत काय लाभ मिळतो?
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केद्राची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, नागरिकांना प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.
- मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब 4.50 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील एका व्यक्तीला किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांना घेता येतो. म्हणजे योजनेंतर्गत मिळणारी एकूण 1.50 लाख किंवा 5 लाख रुपयांची रक्कम एका व्यक्तीवर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये वाटून खर्च करता येते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोणाला?
- पिवळे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजनेचे कार्ड, अन्नपूर्णा योजना कार्डधारक आणि केशरी रेशनकार्डधारकांसह सर्वांना याचा लाभ घेता येणार
- सरकारी अनाथालय, आश्रमशाळेतील मुले, सरकारी महिला आश्रमशाळेतील महिला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक
- सरकारने घालून दिलेल्या निकषात बसणारे पत्रकार आणि त्यांच्या अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेले कामगार व त्यांचे कुटुंब
- तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- शहरातील कचरावेचक, भिक्षुक, गटई कामगार, सफाई कामगार, माळी, सुरक्षा रक्षक, हातगाडी ओढणारे तर ग्रामीण भागातील भूमिहिन कुटुंबे, मजूर, दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेच्या पात्रतेचे निकष
- लाभार्थ्यांकडे अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना रेशनकार्ड तसेच पिवळे, केशरी आणि पांढरे रेशनकार्ड देखील चालणार आहे.
- अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्यासह महसुल अधिकाऱ्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
या योजनेच्या लाभार्थी कुटुंबाच्या इन्शुरन्सचा हप्ता महाराष्ट्र सरकारच्या राज्य आरोग्य हमी सोसयटी तर्फे भरला जातो. या योजनेचा जास्तीजास्त लाभ राज्यातील नागरिकांना घेता यावा यासाठी सरकारतर्फे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी या योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात पाठवले जाते.