1 फेब्रुवारी 2023 ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी संसदेत आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प (Union Budget) मांडला. या अर्थसंकल्पात नवीन आयकर (Income Tax) प्रणाली जाहीर करण्यात आली, जी 1 एप्रिल 2023 पासून कार्यान्वित होईल. या नवीन आयकर प्रणालीनुसार 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त(Tax Free) असून 7 लाखांपर्यंत सरसकट सूट देण्यात आली आहे. हा लाभ प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 87A अंतर्गत उपलब्ध कर सवलतीमुळे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय आणि त्याचा कोणाला फायदा घेता येतो? नव्या नियमानुसार त्यामध्ये किती वाढ करण्यात आली? चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
इन्कम टॅक्स रिबेट(Income Tax Rebate) म्हणजे काय?
इन्कम टॅक्स रिबेट(Income Tax Rebate) हा विशिष्ट परिस्थितीत आयकर विभागाकडून तुम्हाला करातून मिळणारी सूट आहे. ही कर सवलत मिळविण्यासाठी, तुम्ही तुमच्या कर दायित्व अचूक मोजणं आणि वेळेत आयकर रिटर्न भरणे आवश्यक असते.
सध्या रिबेटच्या माध्यमातून मिळणारी सवलत अशी आहे
7 लाखांच्या उत्पन्नावर सरकारकडून 50,000 रुपये मानक वजावट (Standard Deduction) मिळणार आहे. ती वजावट धरल्यावर तुमचं करपात्र उत्पन्न होतं, 6,50,000 रु. यावर कर भरताना पहिल्या 3 लाखांवर कर माफ आहे. त्यामुळे पुढच्या 3 ते 6 लाखांसाठी 5% च्या हिशोबाने 15,000 रु. आणि 50,000 वर 10% हिशोबाने आणखी 5,000 रुपये असा आयकर लागू होईल. अशा प्रकारे, एकूण देय कर 20,000 रुपये असेल. ही रक्कम सरकारने कर सवलत स्वरूपात दिल्याने 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे कर सवलत स्वरूपात पकडले जाते.
कलम 87A अंतर्गत कर सवलत कुणासाठी ?
आयकर कायद्यानुसार, कलम 87A अंतर्गत सवलत फक्त निवासी भारतीय व्यक्तींना उपलब्ध आहे. अनिवासी व्यक्ती (NRI), हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) हे कलम 87A अंतर्गत सूट मिळण्यास पात्र ठरत नाहीत. याशिवाय नव्या नियमानुसार तुमचे करपात्र उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त नसावे अशीही अट यामध्ये घालण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक जे 60 ते 80 वर्षे वयोगटातील आहेत त्यांना कलम 87A अंतर्गत सवलतीचा दावा करता येतो मात्र, ज्येष्ठ नागरिक जे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत ते 87A सवलतीचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. तसेच कृषी स्रोतांमधून कमाई करणाऱ्या निवासी व्यक्ती 87A अंतर्गत कर सवलतीसाठी दावा करू शकते.
कलम 87A अंतर्गत किती कर सवलत उपलब्ध आहे?
जुनी(Old) आणि नवीन(New) कर सवलत अशा दोन्ही कर प्रणाली या अंतर्गत उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंत, दोन्ही कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध कर सवलतीची रक्कम समान असेल. आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंत (31 मार्च 2023) कोणत्याही आर्थिक वर्षासाठी नवीन कर प्रणाली निवडणारी कोणतीही व्यक्ती 12,500 रुपयांच्या कर सवलतीसाठी पात्र असणार आहे. त्यासाठी त्यांचे करपात्र उत्पन्न आर्थिक वर्षात 5 लाखांपेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे, जुन्या कर प्रणालीच्या बाबतीतही, 5 लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नासाठी 12,500 रुपयांची कर सवलत उपलब्ध आहे.
परंतु आर्थिक वर्ष 2023-24 पासून नवीन कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध कर सवलतीची रक्कम वाढवण्यात आली आहे. याचे कारण असे की, सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 पासून नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये सुधारणा केली आहे. नवीन कर प्रणाली चांगली बनवण्यासाठी, कलम 87A अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नासाठी 25,000 रुपये सूट देण्यात आली आहे.
अशा प्रकारे, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवीन कर प्रणालीची निवड करणार्या व्यक्तीने त्यांचे करपात्र उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त नसेल, तर त्यांना शून्य कर भरावा लागणार आहे. मात्र आर्थिक वर्ष 2023-24 साठी जुन्या कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध कलम 87A अंतर्गत कर सवलतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत.