इन्शुरन्स खरेदी करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. विविध प्लॅन्स बाजारात उपलब्ध असल्याने पॉलिसी घेताना गोंधळ उडतो. मात्र, एखादी पॉलिसी तुम्ही खरेदी केल्यानंतर ती रद्द करावयाची असेल किंवा त्यामध्ये काही बदल करायचे असतील, तर विमा कंपनीकडून तुम्हाला ठराविक कालावधी दिला जातो, यामध्ये तुम्ही पॉलिसीमध्ये हवे ते बदल करू शकता. एकदा लूक पिरियड समाप्त झाल्यानंतर तुम्हाला पॉलिसीमध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे जरी तुम्ही एखादी पॉलिसी घेताना काही गोष्टी बारकाईने पाहिल्या नसतील त्या तुम्ही लूक पिरियडमध्ये पाहू शकता.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया या सरकारी विमा क्षेत्र नियामक संस्थेने ही सुविधा ग्राहकांच्या सोयीसाठी आणलेली आहे. प्रत्येक विमा कंपनीमध्ये फ्री लूक पिरियडमध्ये ग्राहकाला मिळणाऱ्या सुविधांमध्ये थोडाफार बदल असू शकतो. जसे की, तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल. मात्र, तुम्ही लूक पिरियडमध्ये पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेताल. काही कंपन्या तुम्हाला आधी भरलेला पूर्ण प्रिमियम माघारी देतील. मात्र, काही कंपन्या आरोग्य चाचणीसाठी आलेला खर्च या प्रिमियममधून वजा करून घेऊ शकतात. कंपनीनुसार काही नियम वेगवेगळे असू शकतात.
फ्री लूक पिरियडमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता -
1)पॉलिसीची कागदपत्रे नीट पडताळून पाहू शकता. जर काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घेऊ शकता.
2) पॉलिसी तुमच्या गरजांची पूर्तता करत नसेल तर तुम्ही रद्द करू शकता.
3) पॉलिसीमध्ये अतिरिक्त बेनिफिट अॅड किंवा रद्द करू शकता.
पॉलिसी डाक्युमेंट तुम्ही तपासून कंपनीला चुका दुरूस्त करण्यासाठी पाठवू शकता. मात्र, जर पॉलिसी रद्द करणार असाल तर ही कागदपत्रे तुम्हाला कंपनीला पाठवावी लागतील.
4) पॉलिसी रद्द करण्यासाठी कंपनीला थेट मेल पाठवू शकता.
5) पॉलिसीबाबतच्या तुमच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे मागू शकता.
आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला लूक पिरियड मिळेल. हा कालावधी 15 ते 1 महिन्यापर्यंत असू शकतो. या काळात जर तुम्ही पॉलिसी रद्द केली तर तुम्हाला प्रिमियमचे पैसे माघारी मिळू शकतात. जर तुम्ही पॉलिसी रद्द करत असाल तर त्यासाठी तुम्हाला विमा कंपनीला कारण द्यावे लागेल. हे जास्त अवघड नाही. जर पॉलिसी तुमच्यासाठी योग्य नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसे कंपनीला मेलद्वारे किंवा ग्राहक प्रतिनिधीला सांगू शकता. यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज आकारला जात नाही.