हॅकर ही संज्ञा सर्वप्रथम कॉम्प्युटरसाठीची मल्टिटास्क मेनफ्रेम सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींसाठी वापरली जात होती. मात्र, आता अधनिकृतपणे ऑनलाइन माहितीची चोरी करण्यात सराईत असेल्या गुन्हेगारांसाठी ही संज्ञा वापरली जाते. बँका, आर्थिक संस्था, कंपन्या आपला ऑनलाइन स्टोअर असलेला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सर्व्हरवर स्टोअर असलेल्या या सुरक्षित डेटामधील कमकुवत दुव्यांचा वापर करून काही व्यक्ती माहितीची चोरी करतात.
मुख्यत्वेकरून आर्थिक लाभ, कंपनीला नुकसान पोहचवणे, माहितीची चोरी करणे अशा उद्देशाने जे माहितीची चोरी करतात त्याना हॅकर्स असे म्हणतात. ही सर्व्हरवरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी संस्था अधिकृतरित्या या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करते. त्यांच्याद्वारे कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्यात येतो, त्यांना एथिकल हॅकर असे म्हणतात.
एथिकल हॅकर्सचे काम काय असते?
कंपनीच्य विविध वेबसाइस्ट, सर्व्हर, कॅम्युनिकेशन प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी सतत उपाययोजना करण्याचे काम एथिकल हॅकर्स करतात. इंटनेटवर कंपनीची संवेदनशील माहिती सुरक्षित राहिली पाहिजे, हा त्यांचा काम करण्याचा उद्देश असतो. व्हायरसपासून यंत्रणेला सुरक्षित ठेवणे, सुरक्षेशी तडजोड होईल अशा गोष्टींचा अटकाव घालणे, डेटा सेफ्टीसाठी स्टँडर्ड प्रोसेसेस लागू करणे, नेटवर्कमधील अडथळे दूर करण्याचे काम एथिकल हॅकर्स प्रामुख्याने करतात. त्यांना सायबर सिक्युरिटी इंजिनियर असे देखील म्हटले जाते.
संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न
इंटरनेटवरती लाखो वेबसाइट्स आहेत. यामधील सर्व डेटा सर्व्हरवर ठेवलेला असतो. मात्र, काही कंपन्या आणि संस्थांकडे असलेला डेटा खूपच संवेदनशील असतो. जसे की, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे देशातील कोट्यवधी ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती आहे. ही माहिती जर चोरी गेली तर ग्राहकांच्या खात्यातील पैसे हॅकर्स काढून घेऊ शकतात. बँकेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे डेटा सुरक्षेसाठी कंपन्या एथिकल हॅकर्सची नेमणूक करतात.