आरोग्य विमा ही तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. कारण, कधी कोण आजारी पडेल आणि रुग्णालयात जाण्याची वेळ येईल सांगता येत नाही. ऐनवेळी बचत केलेले पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य विमा घेतल्याचा निर्णय कधीही योग्यच ठरेल. मात्र, विमा घेताना त्यामध्ये अनेक अटी आणि नियम असतात, जे सर्वसामान्य व्यक्तीला समजत नाहीत. जेव्हा गरज पडते तेव्हा अडचण नको म्हणून आधीच माहिती असावी. आरोग्य विमा घेताना काही पॉलिसीमध्ये को-पेमेंट म्हणजेच सह-देयक हा क्लॉज असतो. हा क्लॉज म्हणजे काय, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
को-पेमेंट म्हणजे काय? (What is co-payment)
को-पेमेंट म्हणजे आरोग्य विमा घेताना काही ठराविक टक्के खर्च (रुग्णालयात झालेला खर्च) उचलण्याचे मान्य करता. वैद्यकीय खर्चाची काही रक्कम तुम्हाला खिशातून भरावी लागेल तर काही रक्कम विमा कंपनी भरेल. मात्र, किती टक्के पैसे तुम्ही भरणार आहात हे विमा काढताना ठरलेले असते. त्यानुसार तुमचा प्रिमियम ठरतो. जर को-पेमेंट जास्त असेल तर प्रिमियमही कमी असतो.
समजा तुम्ही 3 लाखांचे संरक्षण असणारी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केलेली आहे. या पॉलिसीमध्ये २० टक्के को-पेमेंटचा क्लॉज आहे तर ८० टक्के रक्कम विमा कंपनी भरेल असा नियम आहे. काही दिवसांनंतर आजारी पडल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली. पाच दिवस रुग्णालयात राहिल्याचा खर्च २ लाख रुपये आला. तुम्ही विमा कंपनीकडे दावा केला तर को-पेमेंटच्या नियमानुसार तुम्हाला ४० हजार रुपये तुमच्या खिशातून भरावे लागतील. तर उर्वरित १ लाख ६० हजार रुपये विमा कंपनी भरेल.
जर तुमच्या पॉलिसीमध्ये किती टक्के को-पेमेंटची अट आहे याची तुम्हाला माहिती नसेल तर ऐनवेळी तुम्ही विमा कंपनीशी हुज्जत घालाल. याचा तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे विमा खरेदी करताना ही अट व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. जर रुग्णालयाचे बील खूप मोठे झाले असेल तर ही को-पेमेंटी रक्कम काही लाखांमध्ये जाईल. तसेच तुम्ही प्रिमियमही भरलेला असेल किंवा भरत असाल. अशा वेळी आरोग्य विमा असण्याचा पुरेपुर फायदा तुम्हाला मिळणार नाही.
जर तुमचा कॅशलेस आरोग्य विमा असेल तर विमा कंपनी को-पेमेंटची रक्कम भरणार नाही. ती रक्कम तुम्हाला रुग्णालयात भरावी लागेल. सहजा, वयोवृद्ध नागरिकांसाठी विमा कंपन्यांनी तयार केलेल्या पॉलिसीमध्ये को-पेमेंट क्लॉज असतो. कारण, वाढत्या वयानुसार जोखीमही वाढत जाते. अशा पॉलिसीसाठी प्रिमीयमही जास्त असतो आणि को-पेमेंटचीही अट असते. सर्व गोष्टींची खात्री केल्याशिवाय आरोग्य विमा खरेदी करू नका. को-पेमेंटशिवाय इतरही अनेक बाबी आहेत, ज्या तुम्ही नीट तपासून घेतल्या पाहिजे.