Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CDSL CVL पोर्टल काय काम करते? भांडवली बाजारात गुंतवणूक करताना KYC कशी केली जाते?

CDSL CVK KYC

Image Source : www.cvlindia.com

म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ग्राहकाची KYC द्वारे ओळख पटवली जाते. ब्रोकर्स, फंड हाऊस आणि संबंधीत वित्तसंस्था या CDSL CVL शी जोडलेल्या असतात. ग्राहकाची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकीचे व्यवहार करता येतात.

CDSL CVL KYC: म्युच्युअल फंड, शेअर मार्केटसह इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या सर्वांची सुरुवात KYC (Know your customer) पासून होते. केवायसीचा सोपा अर्थ म्हणजे ग्राहकाची ओळख पटवणे होय. जेव्हा तुमची ओळख पटवली जाते त्यानंतरच तुम्हाला गुंतवणूक करता येते. CDSL CVL ही सेबी अधिकृत KYC संबंधीत कामे करणारी कंपनी आहे. 

KYC ची गरज का पडते?

कोणतेही आर्थिक व्यवहार करताना ते बनावट, दुसऱ्या व्यक्तीच्या नावे झालेले नसावे याची दक्षता घेतली जाते. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायदा आल्यानंतर KYC चे महत्त्व अधोरेखित झाले. सर्वप्रथम सरकारी अधिकृत कागदपत्रांद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते. त्याचे नाव, पत्ता, उत्पन्नाचे मार्ग आणि इतर वैयक्तिक माहिती KYC साठी गरजेची असते. आता आधार आणि पॅनद्वारे इ-केवायसी देखील केली जाते.  

तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिलेली माहिती अधिकृत असेल तरच KYC पूर्ण होते. अन्यथा तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. डिमॅट खाते सुरू करताना, म्युच्युअल फंड, बाँड्स आणि इतर योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाची KYC मध्यस्थ ब्रोकर कंपनीद्वारे केली जाते. बँकेत खाते सुरू करतानाही केवायसीची गरज पडते. तसेच ही माहिती CVL द्वारे अपडेटही केली जाते. 

CDSL CVL पोर्टल काय काम करते?

Central Depository Services Limited ही एक सेबी अधिकृत कंपनी आहे. या कंपनीची CDSL Ventures Limited (CVL) ही सहयोगी कंपनी आहे. या कंपनीद्वारे KYC ची कामे केली जातात. बँका, स्वतंत्र ब्रोकर कंपन्या, फंड हाऊसेस हे CDSL CVL शी जोडलेले असतात. प्रत्येक ग्राहकाची माहिती KYC प्रक्रिया करण्यासाठी CVL कडे पाठवली जाते. एकदा केवायसी केल्यास प्रत्येक वेळी करण्यास गरज पडत नाही. तसेच तुम्ही आधी दिलेली माहिती अपडेटही करू शकता. CDSL कडे सुमारे साडेचार कोटी नागरिकांची डिजिटल केवायसीची माहिती जमा आहे. 

बँकिंग अॅपद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 

KYC करण्यासाठी पॅनकार्ड, आधार, रहिवासी पुराव्यासाठी पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्रे लागतात. जर तुम्ही बँकेतर्फे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमची KYC बँकेद्वारे तुम्ही आधी जमा केलेल्या कागदपत्रांद्वारे केली जाते. तुम्हाला पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. मात्र, त्यात 10 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. बँकेद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तोपर्यंत SIP साठी खात्यातून पैसे कट होत नाहीत. 

थेट फंड हाऊसद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 

जर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या फंड हाऊसकडे थेट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला KYC ची कागदपत्रे जमा करावी लागतील. व्हिडिओ कॉलद्वारेही KYC केली जाते. फंड हाऊसच्या पोर्टवलवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन कागदपत्रे जमा करावी लागतील. KYC झाल्यानंतर तुमची SIP सुरू होईल. 

ऑनलाइन की ऑफलाइन 

मध्यस्थ आणि ब्रोकर संस्थांकडून KYC ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केली जाते. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता. ऑनलाइन केवायसीचा पर्याय सहसा निवडला जातो. तुम्हाला फक्त ऑनलाइन कागदपत्रे जमा करावी लागतात. जर तुम्ही ऑफलाइन पर्याय निवडला तर वित्तसंस्थेच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करावी लागतात.