बूम आणि बस्ट सायकल (Boom & Bust Cycle) ही अर्थशास्त्रातील आर्थिक विस्ताराची आणि आकुंचनाची एक प्रक्रिया आहे; जी आर्थिक घडामोडीत वारंवार घडत असते. बूम आणि बस्ट सायकल हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तेजीच्या काळात म्हणजेच बूमदरम्यान अर्थव्यवस्था वाढते. मार्केटमध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता निर्माण होते. पण त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच बस्ट कालावधीत अर्थव्यवस्था मंदावते. म्हणजेच शेअर मार्केटमधील, बाजारातील आर्थिक रेलचेल मंदावते. व्यवहारांची संख्या कमी होते. लोकांकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे राहत नाहीत. या परिस्थितीमुळे लोकांच्या नोकऱ्या जातात तर गुंतवणूकदार आपले पैसे गमावतात. तर अशा पद्धतीने बूम-बस्ट सायकल (Boom-Bust Cycle)चे चक्र अर्थव्यवस्थेत थोड्याथोड्या अंतराने बदलत असते.
देशाची आर्थिक प्रगती होत असताना हे असे बूम-बूस्ट सायकल का घडून येत असावेत? या प्रश्नाचे उत्तर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीवर पूर्णत: अवलंबून असते. देशाची अर्थव्यवस्था जेव्हा तेजीमध्ये असते. म्हणजेच बूममध्ये असते तेव्हा आरबीआय (RBI) बॅंकांना कमी व्याजदराने कर्ज देऊन सर्वसामान्यांसाठी कर्ज स्वस्त करते. परिणामी बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढते. यातून काही जणांना चांगला परतावा मिळतो आणि अर्थव्यवस्थाही वाढते.
अशा स्थितीत मार्केटमध्ये जेव्हा व्याजदर खूपच कमी असतो आणि त्यातून कर्ज मिळवणं आणखी सोपं होतं. तेव्हा अधिकाधिक गुंतवणूक होते. पण यामुळेही अडचण निर्माण होते. जेव्हा अशाप्रकारे जादा गुंतवणूक होते. तेव्हा त्या गुंतवणुकीला “माल-इन्व्हेस्टमेंट (Malinvestment)” म्हणतात. मग अशावेळी भविष्यासाठी केलेल्या तरतुदींना पुरेशी मागणी मिळत नाही. परिणामी मार्केटमध्ये मंदीचे वातावरण तयार होऊ लागतं, म्हणजेच बस्ट सायकल सुरू होते. उदाहरणार्थ, एखाद्या शहरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू होते. परिणामी सर्व बिल्डरांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दर कमी केले जातात. त्यामुळे एकूणच घरांच्या किमती कमी होऊ लागतात. ज्या गोष्टींमध्ये जास्त गुंतवणूक होऊ लागली की त्याची किंमत कमी होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांचे मूल्य कमी होते. ग्राहकांकडून खरेदी कमी होऊ लागते आणि कंपन्यांमधून नोकऱ्या ही कमी होऊ लागतात.
बूम आणि बस्ट सायकलमधील अतिरिक्त घटक
घसरणारा आत्मविश्वास देखील बस्ट सायकलमध्ये योगदान देणारा ठरतो. जेव्हा शेअर मार्केट पडते किंवा अगदी घसरणीला लागते तेव्हा मोठमोठे गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य लोकदेखील घाबरतात. गुंतवणूकदार त्यांच्या पोझिशन्स विकतात आणि सुरक्षित अॅसेट्स मध्ये गुंतवणूक करतात ज्यांचे मूल्य पारंपरिकपणे कमी होत नाही. जसे की रोखे (Bonds), सोनं इत्यादी. कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकल्यामुळे, लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतात आणि आवश्यक वस्तुंशिवाय खरेदी करणं टाळतात. यामुळे पुन्हा मार्केटमधील स्थिती बदलण्यास मदत होते.
अशाप्रकारे जेव्हा वस्तुंच्या किमती खूप कमी होतात. तेव्हा ज्या गुंतवणूकदारांकडे पुरेसे पैसे आहेत; ते गुंतवणूक करत राहतात. तेव्हा ही बस्ट सायकल थांबण्यास सुरुवात होते. गुंतवणूकदारांना पुन्हा पैसे गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी भरपूर वेळ लागू शकतो. गुंतवणूकदारांमध्ये व सर्वच लोकांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सरकार आणि आरबीआय पुन्हा ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्यापरीने पाऊले उचलत असतात. सरकार व आरबीआय दोघे मिळून गुंतवणुकीवरील खर्चाच कपात करतात. यामुळे सर्वसामान्यांसह कंपन्याही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होते. परिणामी या सर्व घटकांचे बूम आणि बस्ट सायकलमध्ये योगदान लाभतं.