आपण एखाद्या कंपनीत काम करत असताना त्या कंपनीचा प्रचंड नफा व्हावा असे आपल्याला वाटत असते. कंपनीचा नफा झाला तर कर्मचाऱ्यांना देखील चांगलाच फायदा होतो. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. तसेच त्यांना बोनस, प्रोत्साहनपर पैसे कंपनीकडून दिले जातात. पण प्रत्येक कंपनी आपल्या नफ्यातून आपल्या कर्मचाऱ्यांना काही भाग देतेच असे नाही. काही कंपन्या केवळ कर्मचाऱ्यांचे शोषण करतात आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या फायद्याचा आपल्या भविष्यासाठी विचार करतात. त्यामुळे कर्मचारी देखील कंपनीत काम करताना 100 टक्के योगदान देत नाहीत. आपल्याला कोणताही फायदा होणार नसताना आपण मेहनत का घ्यायची असा अनेक कर्मचाऱ्यांचा समज होतो. त्याचमुळे आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक चांगले काम केले पाहिजे यासाठी अनेक कंपन्या युक्त्या योजत असतात. एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन ही त्यातलीच एक योजना आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
ईसॉपमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. कारण ईसॉप अंतर्गत कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीचे शेअर विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देते. या शेअरची किंमत ही बाजारभावापेक्षा खूपच कमी असते. बाजारात लोकांना शेअर ज्या किमतीत मिळतात, त्यापेक्षा कितीतरी कमी किमतीत हे शेअर्स कर्मचाऱ्यांना कंपनीकडून विकले जातात. कंपनीचे शेअर कर्मचाऱ्यांनी घेतल्याने त्यांना तर फायदा होतो. त्याचसोबत कंपनीला ही फायदा होता. कंपनीचे शेअर घेतल्यानंतर आपल्या कंपनीची प्रगती व्हावी आणि त्याद्वारे शेअरची किंमत वाढावी यासाठी कर्मचारी अधिकाधिक प्रयत्न करत असतात.
ईसॉप कोणासाठी आहे?
- ईसॉप ही योजना फक्त कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असते.
- भारतात किंवा भारताबाहेर काम करणारा कंपनीचा कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतो.
- कंपनीचा पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ संचालक याचा लाभ घेऊ शकतो.
- भारतात किंवा भारताबाहेर काम करणारा साहाय्यक कंपनीचा कर्मचारी ही योजना घेऊ शकतो.
ईसॉपचे काम कशाप्रकारे चालते?
एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन अंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ठराविक शेअर ठराविक किमतीत विकत घेण्याचा पर्याय देते. या शेअरची किंमत ही बाजारमूल्यापेक्षा कमी असते. ईसॉप ही योजना भारतात स्टार्ट अप कंपन्या मोठ्या प्रमाणात वापरतात. या योजनेद्वारे कंपनीना पैसे गोळा करण्यासाठी एक चांगला पर्याय मिळतो.
ईसॉपचा कंपनीला असा होतो फायदा
कंपनीतील कर्मचारी कंपनीचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. कंपनीच्या शेअरची किंमत वाढण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. ईसॉपमुळे कर्मचारी आपल्या कामाबाबत अधिक जागरूक होतात असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. तसेच मॅनेजमेंटविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात अधिक विश्वास निर्माण होतो. त्यामुळे त्यांची कामाची गुणवत्ता वाढते असे देखील या अभ्यासात दिसून आले आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे
ईसॉपमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीकडून चांगला पगार मिळतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना शेअर्सद्वारे अधिक पैसे कमावण्याची संधी मिळते. तसेच कर्मचारी या शेअरचा उपयोग कधीही करू शकतो. उतारवयात त्यांना या शेअर्सद्वारे चांगले पैसे मिळू शकतात.
ईसॉपमुळे कर्मचारी कंपनीच्या अनेक निर्णयांमध्ये सहभाग घेतात. कंपनी आपल्याबद्द्ल विचार करते, आपल्याला महत्त्व देते अशी कर्मचाऱ्यांमध्ये भावना निर्माण होऊन ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात.
ईसॉपवर लागणारा टॅक्स
ईसॉपवर दोन प्रकारे टॅक्स लावला जातो. पहिल्यांदा शेअर विकत घेताना आणि दुसऱ्यांदा शेअर विकताना टॅक्स भरावा लागतो. शेअर विकत घेताना टॅक्सच्या रूपाने तुमचा टीडीएस (TDS) कापला जातो. तसेच शेअर विकताना शेअर खरेदी आणि विक्रीमध्ये झालेल्या फायद्यावरही टॅक्स भरावा लागतो.