प्रत्येक कमावणाऱ्या आणि न कमावणाऱ्या व्यक्तीचं बॅंकेत खातं असतेच. त्याद्वारे बॅंकेच्या नियमानुसार त्यांना अंदाजे 2.50% ते 5.50% व्याज त्यांच्या पैशांवर मिळतो. याचबरोबर भारतात इतरही बॅंकींग प्राॅडक्ट आहेत. ज्यामध्ये डिबेंचर्स, शेअर्स किंवा गोल्डचा नंबर लागतो. हे असूनही भारतात सर्वांत जास्त भर फिक्स्ड डिपाॅझीटवर (Fixed Deposit) असतो. कारण, ते सुरक्षित असून त्यातून चांगला रिटर्न मिळतो आणि ते उघडायला ही सोपं आहे. यामुळे लोक FD मध्येच गुंतवणूक करतात. पण, बचत खात्यामध्ये तुम्हाला FD सारखाच व्याजदर मिळाल्यावर तुम्ही काय करणार? बचत खात्यावरच गुंतवणूक करणार ना, फक्त यासाठी एक गोष्ट करावी लागते. ती आहे ऑटो स्वीप फॅसिलिटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या बचत खात्यामध्ये ही सुविधा सुरू करावी लागेल. ही सुविधा काय आहे? ती कशी सुरू करायची? ते आपण पाहूया.
ऑटो स्वीप फॅसिलिटी काय आहे?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की बचत खात्यात एफडीसारखे व्याज कसे काय मिळेल? पण हे खर आहे. ऑटो स्वीप फॅसिलिटी म्हणजे बचत खाते आणि फिक्स्ड डिपाॅझीटचे काॅम्बीनेशन आहे. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या बचत खात्यात ही सुविधा सुरू केल्यास, तुम्हाला दोन्ही फायदे मिळू शकतील. फक्त यासाठी तुम्हाला एक लिमिट सेट करावी लागेल. ती सेट केल्यानतंर जे पैसे उरतील, ते थेट तुमच्या फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर होतील.
पैसे होतील एफडीमध्ये ट्रान्सफर
उदा. तुमच्याजवळ ऑटो स्वीप फॅसिलिटीचे बचत खाते आहे. त्यात तुम्हाला कमीतकमी 5000 रुपये बॅलन्स म्हणून ठेवावे लागतात. जर समजा तुम्ही 30000 रुपये जमा केलेत आणि थ्रेशोल्ड लिमिट 10000 रुपये सेट केली. एकदा लिमिट सेट केल्यावर त्या लिमिटच्या वर खात्यात पैसे जमा झाल्यास ते आपोआप एफडी खात्यात ट्रान्सफर केले जातात. म्हणजेच उरलेल्या 20000 रुपयांची थेट एफडी होते. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही खात्यांवरून व्याज मिळते. ही सुविधा तुम्ही ज्या बॅंकेत घेता, ते तुम्हाला त्याचवेळेस वारंवार पैसे न काढण्याचा सल्ला देतात. कारण, असे केल्यास त्याचा बचतीवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही ही सुविधा सुरू करायचा विचार करत असल्यास ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.
FD तोडायची गरज नाही!
तुम्हाला तुमच्या FD खात्यातून पैसे काढायचे असल्यास ती तोडायची गरज नाही. जर तुमच्या बचत खात्याची बॅलन्स लिमिट कमी झाल्यास, ते पैसे आपोआप एफडी खात्यातून बचत खात्यात ट्रान्सफर होतील. पण मग त्यावर एफडीचे व्याज मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला बॅंकवाले वारंवार पैसे न काढण्याचा सल्ला यासाठीच देतात. पण, यामुळे एक फायदा आहे पैशांची गरज असल्यास ते तुमच्या खात्यात आपोआप ट्रान्सफर होतील. याचबरोबर स्वीप फॅसिलिटी तुम्हाला लिक्विडीटीचा आणि EMI ची मुदत निवडायचाही लाभ प्रदान करते. बऱ्याच बॅंकामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बचत खाते उघडताना तुम्ही स्वीप फॅसिलिटीविषयी बॅंकेत विचारणा करू शकता किंवा तुमच्याकडे बचत खाते असल्यास बॅंकेत जावून तुम्ही ही सुविधा सुरू करू शकता.