• 02 Oct, 2022 08:16

शेअर्स बायबॅक म्हणजे काय?

shares stock buy sell buyback

बजाज ऑटो कंपनीने नुकताच 2,500 कोटी रूपयांच्या शेअर्सचा बायबॅक (buyback of shares) जाहीर केला आहे. चला तर जाणून घेऊयात बायबॅक म्हणजे नेमकं काय? (what is buyback of shares?)

बजाज ऑटो कंपनीने सोमवारी (दि. 27 जून) 2,500 कोटी रूपयांच्या शेअर्सचा बायबॅक (buyback of shares) जाहीर केला आहे. दुचाकी निर्मिती क्षेत्रातील या मोठ्या कंपनीने 54.53 लाख शेअर्सचे बायबॅक 4,600 प्रति शेअर या दराने जाहीर केला आहे. यावरून तुमच्या मनात नक्कीच प्रश्न उपस्थित झाला असेल; बायबॅक म्हणजे काय? चला तर जाणून घेऊयात बायबॅक म्हणजे नेमकं काय? (what is buyback of shares?)

प्रत्येक कंपनीचा मुख्य उद्देश आपला व्यवसाय वाढवणे हाच असतो. यासाठी लागणारे भांडवल कंपनी अनेक मार्गांद्वारे जमा करत असते. या अनेक मार्गांमध्ये प्रमुख मार्ग म्हणजे कंपनीच्या काही भागाची मालकी लोकांना एका ठराविक दरात विकणे. यालाच कंपनीचे शेअर्स विकणे (Company Share) असे म्हटले जाते. हे शेअर्स स्टॉक एक्सचेंज मध्ये आयपीओ (IPO - Initial Public Offering) या प्रक्रियेद्वारे विकले जातात. लोकांनी हे शेअर्स विकत घेतल्यानंतर ते कंपनीच्या ठराविक भागाचे मालक बनतात. विकलेल्या या शेअर्समधून मिळालेले पैसे कंपनी अनेक नव्या उपक्रमांसाठी व कंपनीच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी  वापरते. कंपनीच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपला विकलेला भाग म्हणजेच शेअर्स लोकांकडून पुन्हा खरेदी करू शकते. या शेअर्स खरेदीच्या प्रक्रियेलाच बायबॅक (buyback) म्हणजेच परत खरेदी असे म्हटले जाते.


शेअर्स बायबॅक करण्याचा निर्णय कंपन्या का घेत असतील? बायबॅकसारखे निर्णय कंपनी अनेक कारणांमुळे घेऊ शकते. त्यातील काही प्रमुख कारणे आपण समजून घेऊया.

मोठी रोख रक्कम साठा, परंतु मर्यादित उपक्रम गुंतवणूक

अनेक मोठ्या कंपन्यांकडे , मोठी रोख रक्कम जमा असते. काही कंपन्यांचा व्यवसाय इतर कंपन्यांनी दिलेल्या उपक्रमांवर आधारित असतो. जसे की माहिती व तंत्रज्ञान (Information & Technology) क्षेत्रातील कंपन्या. या अशा कंपन्यांकडे मोठी रोख रक्कम जमा असते. परंतु गुंतवणूक करण्यासाठी नवे उपक्रम मर्यादित असतात. अशावेळी कंपनी बायबॅकचा निर्णय जाहीर करते.

बायबॅक डिव्हीडंड (लाभांश) पेक्षा जास्त कर प्रभावी 

डिव्हीडंड (लाभांश) म्हणजे कंपनीचे शेअर्स विकत घेणाऱ्या लोकांना कंपनीच्या फायद्यातून दिला जाणारा हिस्सा. 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Central Budget) 10 लाख रूपयांच्या वार्षिक डिव्हीडंडवर (लाभांश) 10 टक्के कर लावण्यात आला होता. मोठमोठ्या गुंतवणूकदारांना व प्रवर्तकांना या 10 टक्के कराचा फटका बसू लागला. बायबॅक हे डिव्हीडंडपेक्षा (लाभांश) जास्त कर प्रभावी असल्यामुळे अनेक कंपन्या बायबॅक जाहीर करतात.

सिद्धांतिकदृष्ट्या बायबॅकमुळे कंपनीचे मूल्यांकन वाढते 

कंपनीने बायबॅक जाहीर केल्याने कंपनीने विकण्यास ठेवलेला भाग म्हणजेच शेअर्स कमी होतात. त्यामुळे कंपनीचा Earnings per share -EPS (एका शेअरसाठी कंपनीने कमावलेला फायदा ) व Return On Equity -ROE ( रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीचा फायदा व गुंतवणूकदारांचा फायदा यातील संबंध होय) सुधारतो.

बायबॅकद्वारे कंपनी विश्वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न करते

बायबॅक जाहीर केल्याने कंपनी मोठी व विश्वासू आहे, असा भास लोकांमध्ये निर्माण होतो. ज्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्यमापन वाढलेले असावे असा संकेत लोकांमध्ये पसरतो.

बायबॅकद्वारे शेअर धारकांना पैसे परत दिले जाऊ शकतात

अनेकवेळा कंपनी उरलेले व जास्तीचे भांडवल चुकीच्या ठिकाणी गुंतवते. ज्याने कंपनीच्या प्रतिष्ठेस हानी होऊ शकते. या उर्वरित भांडवलाला कंपनीच्या शेअर धारकांना देणे सोयीचे व कंपनीच्या प्रतिष्ठेस हानी न पोहोचविणारे ठरू शकते. त्यामुळे कंपनी बायबॅकद्वारे शेअर धारकांना पैसे देणे पसंत करते.

कंपनीतील हिस्सा एकत्रित करण्यास मदत होते

अनेकवेळा प्रवर्तक कंपनीतील कमी होत असलेल्या आपल्या हिश्श्यामुळे चिंतेत असतात. जर प्रवर्तकांची तयारी असेल तर कंपनी बायबॅक जाहीर करते. ज्यामुळे प्रवर्तकांना कंपनीतील त्यांचा हिस्सा वाढविता येतो.

काही वेळा बायबॅकमुळे कंपनीकडे वाढीसाठी फायदेशीर संधी नाहीत, अशी छाप देखील गुंतवणूकदारांकडून निर्माण होते. ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर पाहायला मिळतो. बायबॅकचे जसे फायदे आहेत; तसे तोटेही आहेत. म्हणून कंपनीच्या शेअर्स बायबॅकमध्ये भाग घ्यायचा की नाही, याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या अधिकृत आर्थिक सल्लागाराची नक्की मदत घ्या.