टर्म इन्शुरन्स घेताना त्यामध्ये अधिकच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारचे रायडर्स घेता येतात. जसे की, अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट, परमनंट डिसॅबिलीटी बेनिफिट, क्रिटीकल इलनेस बेनिफीट असे अनेक रायडर उपलब्ध असतात. तुम्हाला जर अधिकचे सुरक्षा कवच हवे असेल तर टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियम शिवाय अधिकची रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. जेवढ्या जास्त रकमेचा रायडर तुम्ही घेत असाल तेवढा जास्त प्रिमियम तुम्हाला द्यावा लागेल. या सर्व रायडरमधील क्रिटिकल इलनेस हा रायडर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
टर्म इन्शुरन्सचे फायदे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना मिळतात. जसे की, १ कोटींचा टर्म प्लॅन असेल तर तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबातील वारसदाराला ही रक्कम मिळेल. मात्र, टर्म इन्शुरन्स काढताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्यापेक्षा गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. समजा तुम्ही 30 वर्षाचे असताना टर्म इन्शुरन्स घेतला तर 60 वर्ष वयानंतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. जसे की उतार वयात कॅन्सर, ब्रेन, हॅमरेज, हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी लाखो रुपये खर्च तुम्हाला येऊ शकतो. जर टर्म प्लॅन सोबत तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर तुम्हाला गंभीर आजार झाल्यास तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे या रकमेसाठी दावा करू शकता.
हे आपण उदाहरणामार्फत समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स घ्यायचे ठरवले आहे. मात्र, गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी त्यासोबत 15 लाखांचा क्रिटिकल इलनेस रायडर देखील घेतला आहे. त्यासाठी अतिरिक्त प्रिमियम देखील भरत आहे. पॉलिसी लागू असताना समजा 55 व्या वर्षी कॅन्सर आजाराचे निदान झाले तर त्यावेळेस उपचाराच्या खर्चासाठी हा रायडर कामी येईल. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.
टर्म इन्शुरन्समध्ये हा रायडर का महत्त्वाचा -
टर्म इन्शुरन्स घेताना जर तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेतला तर त्याचा प्रिमियम पूर्ण पॉलिसी पिरियडमध्ये तेवढाच राहिल. त्यामध्ये वाढ होणार नाही. मात्र, जर तुम्ही दरवर्षी आरोग्य विमा काढत असाल तर त्याचा प्रिमीयम दरवर्षी वयानुसार वाढतच राहील. गंभीर आजाराचे निदान झाल्यास फक्त आरोग्य विमा पुरेसा ठरेलच असे नाही. कारण, वाढत्या वयानुसार आरोग्य प्रिमियम देखील जास्त असतो. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा काढतो. मात्र, गंभीर आजाराचे निदान झाल्यास ही रक्कम पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे जर टर्म इन्शुरन्स घेताना तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेऊन ठेवला असेल तर भविष्यात गंभीर आजारात त्याची मोठी मदत होईल.
गंभीर आजाराचे निदान झाल्यास कदाचित तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. अशा परिस्थितीत तुमची बचत वैद्यकीय खर्चासाठी संपून जाईल. अशा वेळी टर्म इन्शुरन्समधील रायडरची रक्कम तुमचा खर्च भागवेल. गंभीर आजार झाल्याची कागदपत्रे तुम्हाल विमा कंपनीला सादर करावी लागतील त्यानंतर तुम्हाला एकाच वेळी रायडरची जेवढी रक्कम असेल तेवढी मिळून जाईल. तसेच या रायडरसाठी तुम्ही अतिरिक्त खर्च करता त्याला करातून सुटकाही आहे.
क्रिटिकल इलनेस रायडर निवडताना कोणती काळजी घ्यावी
सर्वच कंपन्या टर्म इन्शुरन्ससोबत क्रिटिकल इलनेसचा रायडर उपलब्ध करून देतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कव्हर अमाऊंट निवडू शकता. मात्र, प्रिमियम किती रुपये वाढत आहे हे तपासून घ्या. कोणते आजार समाविष्ट आहेत आणि कोणते नाहीत याची सखोल माहिती घ्या. त्या संबंधित तरतूदी नीट वाचून घ्या. अन्यथा ऐनवेळी एखादा आजार तुमच्या रायडरमध्ये उपलब्धच नसल्याचे लक्षात येईल. तुमची आरोग्याची अचूक माहिती विमा घेतेवेळी द्या. कोणतीही खोटी माहिती देऊ नका. रायडर लागू होण्यास काही वेटिंग पिरियड आहे का? हे तपासून पाहा. व्यवस्थित माहिती पाहिल्याशिवाय काहीही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.