दोन व्यक्ती एकत्र येतात, सहजीवनाचा निर्णय घेतात, असंख्य अडचणींना सामोरे जातात आणि त्यांच्यावर मात देखील करतात. ‘And they lived happily ever after’ असा सुखांत म्हणजे “Happy Ending” होतो. पण एखाद्या चित्रपटाचा प्लॉट वाटावा, अशा घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडतीलच, याची शाश्वती नसते. काही वेळा, काही कारणास्तव, विवाहित जोडीदाराच्या नातेसंबंधात अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत आणि ते जोडपे घटस्फोटाचा निर्णय घेणेच, त्यांच्या हिताचे आहे, असे ठरवतात. अर्थातच, हा निर्णय कधीच सोपा नसतो आणि घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडताना, दोन्ही भागीदार भावनिक उलथापालथीला सामोरे जात असतात.
Table of contents [Show]
घटस्फोटाचा नॉमिनेशनवर कसा परिणाम होतो?
घटस्फोटाच्या बाबतीत, भागीदारांना त्यांच्या माजी जोडीदाराला त्यांच्या मृत्यूचा फायदा मिळावा असे वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये, पॉलिसीधारकाच्या टर्म / लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची “नॉमिनी” म्हणून ‘विमायोग्य हित’ (Insurable Interest) असलेल्या दुसर्या व्यक्तीचे नाव (उदाहरणार्थ - आई-वडील किंवा अपत्य) सुधारित केले जाते. योग्य वेळेत, नॉमिनीचे डिटेल्स अद्ययावत न केल्यास, पॉलिसी-धारकाच्या अकाली निधनाचा फायदा माजी जोडीदारास मिळत राहील. पॉलिसीधारकाने जर आपल्या अल्पवयीन मुलांना “नॉमिनी” म्हणून ठेवले असेल, तर दुसऱ्या प्रौढ व्यक्तीला (शक्यतो रक्त-संबंधातील) “विश्वस्त” (Trustee) नियुक्त करणे आवश्यक आहे, जो मुले सज्ञान होईपर्यंत त्यांच्या “हितसंबंधांची काळजी घेणारी व्यक्ती” म्हणून काम करेल.
महिला मालमत्ता कायद्याची भूमिका काय असते?
Married Women Protection Act हा विवाहित स्त्रीला आर्थिक संरक्षण प्रदान करणारा कायदा आहे. MWP अंतर्गत टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बेनिफिशिअरी (लाभार्थी) म्हणून केलेली तरतूद पॉलिसीधारक स्वतःदेखील बदलू शकत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्सच्या क्लेमची संपूर्ण रक्कम ही पत्नी/माजी पत्नी आणि मुलांची मालमत्ता असते. आणि घटस्फोटानंतरही पत्नी / अपत्यांना पॉलिसीचे बेनिफिट्स मिळतात.
असाईनी (Assignee)
असाइनी म्हणजे पॉलिसी-धारकाच्या पॉलिसीचा लाभ आणि दायित्व या दोन्हीसाठी नियुक्त केलेली व्यक्ती. सामान्यत:, पती/पत्नी त्यांच्या जोडीदाराला पॉलिसीचा असाइनी म्हणून सेट करते. टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही वेगळी मालमत्ता मानली जाते आणि त्यामुळे घटस्फोटाच्या वेळी पती-पत्नीमध्ये विभागली जाऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीचा जोडीदार त्याच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीची Assignee म्हणून नियुक्त केलेला असेल, तर घटस्फोटादरम्यान तो पॉलिसी पुन्हा नव्याने असाइन करण्याची विनंती (reassigned) करू शकतो.
जॉईंट लाईफ पॉलिसीज् (Joint Life Policy)
जेव्हा जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसींचा विचार केला जातो, तेव्हा जोडप्याने घटस्फोट घेतल्यास पॉलिसीचा उद्देशच संपुष्टात येतो. त्यामुळे या जोडप्याला त्यांची पॉलिसीसंदर्भात नेमके काय करावे ? हे समजून घेण्यासाठी दाम्पत्याने कायदेशीर सल्ला घेणे उचित ठरेल.
विमा पॉलिसीचे रोख मूल्य (Cash Value)
मनीबॅक आणि संपूर्ण आयुष्य पॉलिसींना (Whole Life Insurance) मृत्यूच्या फायद्यांसह, जगण्याचेही फायदे असतात, म्हणजे, पॉलिसीच्या कालावधीत रोख मूल्य जमा होते. भरलेल्या लाईफ इन्शुरन्स प्रीमियमचा एक भाग “रिटर्न्स”देणार्या गुंतवणुकीत जातो. पॉलिसीधारकाला “डेथ-बेनिफिट्स” सोडून देण्याची आणि पॉलिसीचे रोख मूल्य (Cash Value) घेण्याची परवानगी असते. घटस्फोटाच्या बाबतीत, अशा पॉलिसीज् कॅश-आउट करणे आणि फायनान्शिअल सेटलमेंटचा भाग म्हणून पती-पत्नींमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेणे, चांगले आहे.
संयुक्त मालमत्ता खरेदी केलेली असल्यास
जर जोडप्याने घरासारखी मालमत्ता संयुक्तरित्या खरेदी केली असेल, ज्यासाठी ते अद्याप गृहकर्ज भरत आहेत, तर त्यांच्याकडे MRTA (मॉर्टगेज रिड्यूसिंग टर्म ॲश्युरन्स) पॉलिसी असण्याची शक्यता आहे. ही पॉलिसी, विशेषतः गृहकर्ज कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेले “लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट” आहे. जर जोडपे कर्जाचे सह-कर्जदार असतील, तर MRTA ही दोन्ही जोडीदारांना कव्हर करणारी संयुक्त-जीवन पॉलिसी असते. घटस्फोटाच्या वेळी, मालमत्ता मिळविणारा भागीदार कर्जाची फेड पुढे चालू ठेवतो. पॉलिसी संयुक्त असल्याने, दुसर्या भागीदाराच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेत, इन्शुरन्सची रक्कम अजूनही उर्वरित कर्जाची पुर्तता करण्यासाठी बँकेकडे जाईल.
अपत्यांचा प्रश्न असल्यास
घटस्फोटाच्या निर्णयाचे वेळी, जोडप्याला अपत्ये असल्यास, एका भागीदाराला पोटगी आणि/किंवा मुलांच्या पालन-पोषणासाठीची रक्कम (Alimony/Maintenance and/or Child Support) देणे आवश्यक असते. तेव्हा तो जोडीदार पोटगी आणि बाल समर्थन देयकांच्या उद्देशाने पॉलिसी सुरू ठेवण्याची निवड करू शकतो. घटस्फोटात, पती-पत्नींना अपत्यांचा संयुक्त ताबा मिळू शकतो, किंवा एकाच जोडीदाराला एकमात्र ताबा मिळू शकतो. अशा वेळी विशेषत: “नॉन-कस्टोडियल पालक” जर प्राथमिक कमावणारी व्यक्ती असेल, तर टर्म इन्शुरन्स पॉलिसी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे लाईफ-कव्हर कस्टोडियल पती/पत्नी आणि मुलांना, त्या प्राथमिक कमावणार्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, आर्थिक सुरक्षितता प्रदान करते.
विवाहित जोडपे एकत्र असताना घेतलेल्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज्, तसेच इतर सेविंग्ज प्लॅन्स, वैवाहिक मालमत्तेचे विभाजन करण्याच्या प्रक्रियेचा अनिवार्य भाग असतो. दोन्ही पक्ष असमाधानी राहून, फॅमिली-कोर्टामधील न्यायाधीशांनी निर्णय घेण्यापेक्षा, सद्भावनेने मालमत्तेचे विभाजन करणे, अधिक समाधानकारक असू शकेल.