Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam : केतन पारेख घोटाळा नक्की काय होता? जाणून घ्या!

Ketan Parekh scam

Ketan Parekh Scam : भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून त्यांना फसवणारे अनेक जण होऊन गेले. अशाच लोकांच्या विश्वासाचा खेळ करून लाखो-करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे केतन पारेख (Ketan Parekh). चला तर मग जाणून घेऊयात काय आहे केतन पारेख यांची गोष्ट आणि काय होता केतन पारेख घोटाळा.

तुम्ही कधी एका मोठ्या गुंतवणूकदाराने ‘हा स्टॉक घ्या चांगला आहे’, असे सांगितलेले ऐकून त्याच स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे का? अनेकांनी असे नक्कीच केले असेल आणि असे करणे चुकीचेही नाही. पण एखाद्या मोठ्या गुंतवणूकदारावर एवढा विश्वास का ठेवला जातो? अर्थात याचे उत्तर म्हणजे त्यांनी शेअर मार्केटमध्ये मिळवलेले यश आणि न चुकणारा त्यांचा गाढा अभ्यास यावरून त्यांच्यावर सहज विश्वास ठेवला जातो. पण या विश्वासाचा गैरफायदा घेणारे बरेच जण आहेत. भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात अशाचप्रकारे लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून त्यांना फसवणारे अनेक जण होऊन गेलेत. अशाच लोकांच्या विश्वासाचा खेळ करून लाखो-करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे केतन पारेख (Ketan Parekh). चला तर मग जाणून घेऊयात काय आहे केतन पारेख यांची गोष्ट आणि काय होता केतन पारेख घोटाळा (Ketan Parekh Scam)

कोण आहे केतन पारेख? Who is Ketan Parekh?

केतन पारेख हे मूलतः चॅटर्ड अकॉउंटन्ट (Chartered Accountant) होते. 1980 पासून ते त्यांच्या कौटुंबिक एन.एच. सिक्युरिटीज (N.H. Securities) नावाच्या फर्मध्ये स्टॉकब्रोकिंगचे काम करत होते. हे काम करत असताना त्यांनी संपूर्ण मार्केटचा आतून - बाहेरून सखोल अभ्यास केला. गुंतवणूकदार स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना कशी मानसिकता बाळगतात. याचा त्यांनी मानसशास्त्रीय अभ्यास करण्यास सुरूवात केली. मार्केटमधल्या त्यांच्या या वेगळ्या पैलूवर लोकांचा विश्वास बसू लागला. गुंतवणूकादर पारेख सांगतील त्या कंपनीमध्ये डोळे बंद करून गुंतवणूक करू लागले होते. शेअरमार्केट बरोबरच त्यांचे बॉलीवूड, राजकीय पक्ष आणि मोठमोठ्या बिझनेसमॅनसोबतचे संबंध वाढत होते. यातूनच त्यांनी केरी पॅकर (Kerry Packer) या ऑस्ट्रेलियन मिडिया उद्योजकासोबत भागीदारी सुरू केली होती. केरी आणि केतन यांनी के.पी.व्ही वेंचर्स (K.P.V. Ventures) नावाची फर्म सुरू करून नवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली होती.

केतन पारेख स्कॅम! Ketan Parekh Scam!

केतन पारेख हे हर्षद मेहता यांचे शिष्य होते. हर्षद मेहता यांच्या 1992 च्या स्कॅममध्ये केतन पारेख देखील सहभागी होते. पण कोणतेही पुरावे न सापडल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. हर्षद मेहतांच्या अटकेनंतर त्यांनी मेहतांच्या पंप-अॅड-डंप (Pump and Dump) सिस्टिमचा चांगलाच अभ्यास केला. मेहता बेकायदेशीरपणे बँकांकडून पैसे गोळा करत त्यानंतर त्या पैशांचे स्टॉक्स विकत घेऊन कंपनीची किंमत आकाशात नेत असत. मार्केट आकाशात असतानाच ते त्यांच्याकडचे स्टॉक्स विकून मोठा फायदा मिळवत होते. लोकांचा मेहतांवर भरपूर विश्वास होता. मेहतांच्या याच नीतिचा वापर केतन पारेख यांनी केला.


केतन पारेख यांची आयसीई सेक्टरला पसंती!

केतन पारेख यांची पहिली पसंत नेहमीच आयसीई सेक्टरवर (ICE - Information, Communication, and Entertainment) होती. त्यांनी याच सेक्टरमधल्या अनेक कंपन्यांची किंमत पंप केली, म्हणजेच कंपनीच्या मूल्यापेक्षा जास्त वर नेऊन ठेवली. त्यातून ते भरपूर फायदा मिळवत होते. पण हा खेळ त्यांना आणखी एक लेव्हल वर न्यायचा होता. त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना टार्गेट करण्याऐवजी मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्सना (Institutional Investors) त्यांनी सांगितलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर म्हणजे अशा संस्था ज्या त्यांचे क्लाएन्टस किंवा मेंबर्सचे पैसे त्यांच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टरचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual Fund). केतन पारेख यांचे इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स निवडण्यामागचे एकच उद्देश्य होते ते म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्सना समजावणे हे इतर गुंतवणूकदारांना समजवण्यापेक्षा सोपे होते. पण इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टरकडून इन्व्हेस्टमेंट मिळवणे हे वाटते तितके सोपे नव्हते. इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर हाय ट्रेडिंग व्हॉल्युम (High Trading Volume) असणाऱ्या आणि मीडियाचे लक्ष असणाऱ्या स्टॉक्स मधेच गुंतवणूक करतात. त्यांच्या या नियम व अटी ब्रेक करण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर सर्क्युलर ट्रेडिंग स्कीमचा (Circular Trading Scheme) वापर केला.  

सर्क्युलर ट्रेडिंगची मोडस ऑपरेंडी!

सर्क्युलर ट्रेडिंग स्कीममध्ये एक ब्रोकर स्टॉक घेतो व दुसऱ्याला विकतो त्यानंतर दुसरा तो स्टॉक तिसऱ्या ब्रोकरला विकतो. तिसर्याकडून पुन्हा चौथ्याकडे व पुन्हा पाचव्यापर्यंत तो स्टॉक जातो त्यानंतर पाचवा ब्रोकर तोच स्टॉक पुन्हा पहिल्या ब्रोकरला विकतो. हे सगळं होत असताना त्या स्टॉकच्या किमतीत मॅनिप्युलेशन होत असल्याने किमतीत सारखा बदल येत राहतो. याचा परिणाम स्टॉकच्या व्हॉल्युममध्ये दिसतो. केतन पारेख यांचे साथीदार आयटी (IT- Information Technology), मीडिया (Media) आणि टेलिकॉम (Telecom) अशा वेगाने वाढणाऱ्या सेक्टर्समध्ये सतत सर्क्युलर ट्रेडिंग करत होते. या स्टॉक्सवर गुंतवणूकदार आणि मिडियाचे लक्ष होते. त्यामुळेच केतन पारेख इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्सना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी झाले. 

केतन पारेख यांचे K-10 स्क्टॉक्स!

केतन यांचे ‘K-10 स्टॉक्स’ मार्केटमध्ये प्रसिद्ध होते. यामध्ये झी टेलिफिल्म्स (Zee Telefilms), टिप्स (Tips), अफटेक इन्फोसिस (Aftek Infosys), मुक्ता आर्ट्स (Mukta Arts), हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन लि (Himachal Futuristic Communication Ltd), पेंटामीडिया ग्राफिक्स (PentaMedia Graphics) इत्यादी स्टॉक्सचा समावेश होता. K-10 स्टॉकमध्ये केतन मोठ्या प्रमाणात मॅनिप्युलेशन करत असत. त्यांनी पेंटामीडिया ग्राफिक्स (PentaMedia Graphics)चा 175 रुपयांचा स्टॉक 2,700 पर्यंत नेला होता तर ग्लोबल टेलीसिस्टम्स (Global Telesystems) चा स्टॉक 185 वरून 3100 वर नेला होता. केतन त्यांच्या सर्व ट्रेडिंग अणि इन्वेस्ट्मेन्ट्ससाठी कलकत्ता स्टॉक एक्सचेंजचा (Calcutta Stock Exchange) वापर करत. त्यावेळी या एक्सचेंजमध्ये कठोर नियम नव्हते ज्याचा फायदा केतन पारेख यांनी उचलला. 

स्टॉक मॅनिप्युलेट, इनसायडर ट्रेडिंग आणि बॅंकांमधून बेकायदेशीर रकमेची जमवाजमव!

केतन आपल्या गुरू प्रमाणेच अधिक लोभी होते. त्यांना स्टॉक मार्केटमध्ये लावण्यासाठी पैसे कमी पडत होते. तेव्हा त्यांनी, ते ज्या कंपन्यांचे स्टॉक मॅनिप्युलेट करत त्याच कंपन्यांच्या प्रोमोटर्सकडे (Promoters) म्हणजेच कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारकांकडे जाऊन पैसे गोळा करणे सुरू केले. प्रोमोटर्सदेखील भरपूर पैसे कमावता येतील या उद्देश्याने केतन यांच्यासोबत हाथ मिळवणी करत होते. केतन पारेख यांना कंपनीच्या आतील बातम्या मिळत होत्या. त्यानुसार ते स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होते. त्यामुळे यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचे (Insider Trading) देखील आरोप आहेत. त्यांनी बॅंकांकडूनही बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले. RBI च्या नियमानुसार स्टॉक ब्रोकर्सना बँक फक्त 15 कोटी रुपयांचे कर्ज देऊ शकत होती. पण केतन पारेख यांनी ग्लोबल ट्रस्ट बँकेकडून 100 कोटी तर माधवपुरा मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेकडून 800 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतले होते.

बॅंक ऑफ इंडियाद्वारे स्कॅम उघडकीस आला!

केतन पारेख यांचा स्कॅम सर्वप्रथम मार्केटमध्ये बँक ऑफ इंडिया (Bank of India) च्या मुंबई ब्रांचने केलेल्या आरोपानंतर सर्वांच्या नजरेत आला. केतन पारेख यांनी बँक ऑफ इंडियाचा 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेने केला. आरोप झाल्यानंतर सुचेता दलाल यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) माध्यमातून संपूर्ण स्कॅम जगासमोर आणला. केतनय यांच्या स्कॅममुळे संपूर्ण मार्केट हादरले व 2001 साली मार्केट कोसळले. त्यानंतर केतन यांची चौकशी RBI द्वारे करण्यात आली. केतन पारेख यांना इनसायडर ट्रेडिंग, सर्कुलर ट्रेडिंग, पंप आणि डंप आणि बँकांकडून बेकायदेशीरपणे कर्ज घेण्यासाठी CBI द्वारे अटक करण्यात आली व त्यांच्यावर 2017 पर्यंत ट्रेडिंग बॅन लावण्यात आला. केतन पारेख यांनी एकट्याने जवळ जवळ 40 हजार कोटी रुपयांचा स्कॅम केला.