Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pervez Musharraf Death : परवेज मुशर्रफ यांना झालेला 'एमाइलॉयडोसिस'आजार नेमका काय आहे? त्याच्या उपचारासाठी किती खर्च येतो

Pervez Musharraf Died

Pervez Musharraf Death : रविवारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुशर्रफ दीर्घकाळापासून 'एमाइलॉयडोसिस(Amyloidosis)' या आजाराशी झुंज देत होते. या आजाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यासाठी येणार खर्च जाणून घ्या.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रविवारी (5 फेब्रुवारी 2023) दुबईतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना ही दुःखद घटना घडली. परवेझ मुशर्रफ हे एमाइलॉयडोसिस(Amyloidosis) नावाच्या आजाराने त्रस्त होते, या रोगाच्या उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी जून महिन्यात मुशर्रफ यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आजारपणाबद्दल खुलासा केला होता. एमाइलॉयडोसिस(Amyloidosis) हा एक गंभीर आणि दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे पीडित व्यक्तीच्या शरीरात प्रोटीन जमा होऊ लागतात आणि शरीरातील वेगवेगळ्या भाग यामुळे निकामी होतात. चला तर मग जाणून घेऊया या आजाराशी संबंधित लक्षणे, कारणे आणि यासाठी सर्वसाधारण किती खर्च येतो? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

'एमाइलॉयडोसिस' या आजाराबद्दल महामनीने नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबईच्या(Nanavati Max Super Specialty Hospital, Mumbai) हेमॅटोलॉजी, हेमॅटो-ऑन्कॉलॉजी अँड बीएमटी(Bone Marrow Transplantation) विभागाचे प्रमुख आणि संचालक डॉ. बाळकृष्ण पदते(Dr. Balkrishna Padate) यांच्याशी चर्चा केली आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

एमाइलॉयडोसिस नक्की काय आणि त्याची लक्षणं जाणून घ्या

एमाइलॉयडोसिस (Amyloidosis) हा एक गंभीर आणि दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे शरीरात एमाइलॉयड(amyloid) नावाचे प्रोटीन जमा होऊ लागते. हे प्रोटीन सामान्यतः मानवी शरीरात आढळत नाही. पण एमाइलॉयडोसिसमुळे किडनी, हृदय, यकृत यासह शरीराच्या इतर भागांमध्ये हळूहळू एमाइलॉयड(Amyloid) जमा होऊ लागते. त्यामुळे शरीरातील अवयव निकामी होऊ लागतात.

रुग्णाच्या शरीराचा कोणता भाग बाधित होतो यावर एमाइलॉयडोसिसच्या(Amyloidosis) आजाराची लक्षणे अवलंबून असतात. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणेही वेगवेगळी असू शकतात. डॉ. बाळकृष्ण पदते(Dr. Balkrishna Padate) यांनी खालील लक्षणे या आजारासंदर्भात सांगितली आहेत.

  • शरीराला सूज येणे 
  • वजन कमी होणे
  • दररोज ताप येणे 
  • गुडघेदुखी
  • थकवा आणि अशक्तपणा येणे 
  • त्वचेच्या रंगात बदल होणे 
  • मुंग्या येणे आणि हात आणि पाय दुखणे
  • किरकोळ दुखापतीतून रक्तस्त्राव होणे 
  • अनियमित हृदयाचे ठोके 
  • डोळ्याभोवती जांभळे डाग येणे 
  • दम लागणे आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणे

एमाइलॉयडोसिसची कोणत्या कारणामुळे होतो?

वर नमूद केल्याप्रमाणे, हा रोग शरीरात एमाइलॉयड(Amyloid) प्रोटीन जमा झाल्यामुळे होतो. हे प्रोटीन सामान्यतः मानवी शरीरात आढळत नाही. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या कारणांमुळे, हे प्रोटीन शरीरात तयार होऊ लागते. एमाइलॉयडोसिस खालील कारणांमुळे होऊ शकतो-

  • बहुतेक लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे एमाइलॉयडोसिस(Amyloidosis) होऊ शकतो
  • हा रोग दीर्घकाळापर्यंत डायलिसिस किंवा जळजळ संबंधित रोगांमुळे देखील होऊ शकतो
  • जर एखाद्या व्यक्तीला संसर्गा संदर्भात समस्या असेल, तर त्यांना एमाइलॉयडोसिस होण्याची शक्यता असते
  • किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसची गरज भासत असेल, तर अशा लोकांनाही एमाइलॉयडोसिसचा धोका संभवू शकतो

एमाइलॉयडोसिसवर उपचार पद्धती काय आहे आणि त्यासाठी खर्च किती?

नानावटी हॉस्पिटलचे संचालक आणि प्रमुख डॉ. बाळकृष्ण पदते(Dr. Balkrishna Padate)  यांनी दिलेल्या माहितीनुसार या रोगाचे निदान हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर, कीमोथेरेपी टाईप(Chemotherapy type), इमिनोथेरपी टाईप(Immunotherapy type) आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन(Bone marrow transplantation) या उपचार पद्धतीमुळे रुग्ण 15 ते 20 वर्ष चांगले आयुष्य जगू शकतात. मात्र दैनंदिन उपचार घेण्यासाठी रुग्णाला  हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.योग्य वेळेत उपचार चालू केल्यामुळे रुग्ण क्रिटीकल स्टेजपर्यंत पोहचत नाहीत.

मात्र जर या आजाराचे निदान लागण्यास उशीर झाला किंवा रुग्णाने विलंब केला तर, अवयवांना त्रास व्हायला सुरुवात होऊन अवयव निकामीही होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला एमाइलॉयडोसिसची लक्षणे जाणवत असल्यास, विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. एमाइलॉयडोसिस (Amyloidosis) बरा करणे अत्यंत कठीण आहे, परंतु त्याची लक्षणे औषधांच्या मदतीने कमी करता येतात. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि नंतर उपचार करतात.

एमाइलॉयडोसिस(Amyloidosis) हा एक गंभीर आणि दुर्मिळ आजार असून मुंबईत या आजाराच्या उपचारासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च रुग्णाचा आजार  कोणत्या टप्प्यावर आहे, यावर देखील निर्धारित होतो. त्यानुसार खर्च वाढू किंवा कमी होऊ शकतो.

'Gomedii' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार परदेशामध्ये या आजाराचा खर्च 50,000 डॉलर्स(USD) पासून म्हणजेच भारतीय चलनात 41,31,675(41लाख, 31हजार, 675 रुपये) रुपयांपासून सुरु होतो ते अगदी 100,000,00 डॉलर्स(USD) पर्यंत म्हणजे भारतीय चलनानुसार 82,63,35,000(82 कोटी, 63 लाख, 35 हजार) रुपयांपर्यंत असू शकतो. हा खर्च रुग्णाच्या आजाराचा टप्पा कोणता आहे, यावर निर्धारित असून तो कमी होऊ शकतो.