गेल्याकाही वर्षात भारतात विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने करोना व्हायरस महामारीनंतर अनेकजण आरोग्य विमा, जीवन विमा खरेदी करत आहेत. याचा फायदा विमा कंपन्यांसोबतच विमा एजंटला देखील होत आहे.
एजंट लोकांना वेगवेगळ्या विमा पॉलिसीबद्दल सल्ला देणे, गैरसमज दूर करून नवीन पॉलिसी खरेदी केल्यास काय फायदा होऊ शकतो, याबद्दल माहिती देतात. यामुळे अनेकांचा विमा एजंट म्हणून काम करण्याकडे कल वाढला आहे.
विमा एजंट कसे बनू शकता व यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? याविषयी जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
कोण असतो विमा एजंट?
विमा सल्लागार अथवा एजंट हा लोकांपर्यंत पॉलिसीची माहिती पोहोचविण्याचे काम करतो. एक प्रकारे तो विमा कंपनी आणि ग्राहकांमधील दुवा म्हणून काम करत असतो. तो ग्राहकांना विमा पॉलिसीबद्दल माहिती देणे, त्याचे फायदे समजून सांगणे, विम्याचे प्रीमियम आणि क्लेमच्याबाबतीत ग्राहकांना मदत करणे, फॉर्म भरण्यास मदत करणे इत्यादी कार्य करतो.
विमा एजंट म्हणून करिअरची निवड का करावी?
विमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. एजंट म्हणून काम करताना तुम्हाला 9 ते 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही काम करू शकता. याशिवाय, या कामातून उत्पन्न देखील जास्त मिळते. तुम्हाला पगाराव्यतिरिक्त विमा पॉलिसी विक्री केल्यास कमिशन देखील मिळते. अशाप्रकारे, तुम्ही पगार व कमिशनच्या माध्यमातून महिन्याला 3 ते 5 लाख रुपयांची कमाई करू शकता.
पात्रता
विमा एजंट म्हणून नेमणूक करण्यासाठी प्रत्येक कंपनीला नियमावलीचे पालन करावे लागते. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा एजंटसाठी ठराविक पात्रता निश्चित केली आहे.
- विमा एजंट बनण्यासाठी व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
- दहावी पास असलेली कोणतीही व्यक्ती विमा एजंट म्हणून काम करू शकते.
- तुमच्याकडे पॅन कार्ड व शिक्षणाशी संबंधित इतर महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- IRDAI च्या माध्यमातून दिले जाणारे 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
विमा एजंट म्हणून कशी होईल निवड?
सल्लागार अथवा एजंट म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला संबंधित संस्थेकडे अर्ज करावा लागेल. तुम्ही जर पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्यास प्रशिक्षणानंतर एक परिक्षा द्यावी लागेल. या परिक्षेत पास झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र/परवाना दिला जाईल. एजंट म्हणून काम करण्याचा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही ग्राहकांना विमा पॉलिसीची विक्री करू शकता.